Dr.Smita Datar

Inspirational Others

1.0  

Dr.Smita Datar

Inspirational Others

दे दान

दे दान

3 mins
8.5K


 दे दान, सुटे गिराण......अवयवदान

       “ दे दान सुटे गिराण “ , ग्रहणानंतर हमखास ऐकू येणारी आरोळी. ग्रहणानंतर पुण्यप्राप्ती साठी दान केलं जातं. पण जेव्हा एखाद्याच्या आयुष्यालाच ग्रहण लागतं, तेव्हा त्याला मिळणारे दान किती महत्वाचं ठरत असेल? हे दान किती तरी स्वरूपात केलं जाऊ शकतं. धन दान करून, श्रम दान करून रक्त दान करून , तर कधी कधी अवयव दान करून सुद्धा. पोथ्या पुराणात , प्राचीन ग्रंथ, शास्त्रात या अवयव दानाचे, अवयव प्रत्यारोपणाचे संदर्भ येतात, जे आपण पुराणातली वानगी म्हणून हसून सोडून देतो. पण विश्पलेला लावलेलं नाक, गणपतीला लावलेलं हत्तीच डोकं, कदाचित शंकराचा तिसरा डोळा ही त्या काळची जीव वाचवण्यासाठी केलेली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नसेल कश्यावरून ? त्या काळी युध्दभूमीवर सैनिक जखमी व्हायचे , तेव्हा त्यांच्यावर या अश्या शस्त्रक्रिया झाल्याचे दाखले सुश्रुत संहितेत सापडतात. आजही या दानाची समाजाला गरज आहे.

      अवयवदान मृत किंवा जीवित व्यक्ती सुद्धा करू शकते. जीवित व्यक्ती रक्तदान करू शकते, तसेच जिवंतपणी आपले मूत्रपिंड दान करू शकते. जिवंत व्यक्तीच्या यकृताचा एक छोटा भाग सुद्धा दुसऱ्या व्यक्तीत प्रत्यारोपित करता येतो. या छोट्या भागापासून पुढे संपूर्ण यकृत निर्माण होऊ शकते.

     सर्वात मोठं दान आपण मृत्यूपश्चात करू शकतो. त्यासाठी ती व्यक्ती ब्रेन डेड ( मस्तिष्क स्तंभ मृत ) घोषित होण आवश्यक असतं. व्यक्ती ब्रेन डेड घोषित करण्याच्या काही चाचण्या असतात. बुब्बुळांच्या प्रकाश संवेदना नाहीश्या होणे, तळपायाला संवेदना नसणे, व्यक्ती स्वतःहून श्वास न घेणे इत्यादी. चार डॉक्टरांची टीम दर सहा तासांनी तपासणी करून मस्तिष्क स्तंभ मृत्यू चा निर्णय जाहीर करते. नातेवाईकांनी अवयवदानासाठी होकार दिला तर, महत्वाचे अवयव डॉक्टर वाचवू शकतात. तशी माहिती ZTCC ( झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी) ला कळवतात. अवयवदानासाठी रजिस्टर असलेलीच हॉस्पिटल ही प्रक्रिया करू शकतात. आज तरी ही सुविधा शहरी रुग्णालयातच उपलब्ध आहे. अवयव मिळवण्यासाठी सुद्धा रुग्णांची नोंदणी व यादी पद्धतशीर पणे केली जाते.

     एक ब्रेन डेड व्यक्ती मृत्यू पश्चात अनेक व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. मृत व्यक्तीचे यकृत , दोन मूत्रपिंड ( किडनी ) , हृदय , २ नेत्रपटल , फुफ्फुस , त्वचा , इतके अवयव किमान सात आठ व्यक्तींना नवीन जीवन देऊ शकतात. ते ही कोणत्याही स्वरूपाच वैरुप्य त्या मृत देहाला न आणता. कारण त्या नश्वर देहात सुद्धा जवळच्या माणसांच्या भावना गुंतलेल्या असतात. या पैकी किडनी २४ तासापर्यंत, यकृत बारा तासापर्यंत, हृदय चार तासापर्यंत काढण आवश्यक असतं. हृदय नेणाऱ्या रुग्ण वाहिकेसाठी सरकार ग्रीन कोरीडोर ( जलद मार्ग ) उपलब्ध करून देतं .त्वचा आणि नेत्र पटल घरी जाऊन काढणं ही शक्य असतं । त्वचादान केलं जातं हे तर अनेकांना माहीत नसतं पण भाजलेल्या जखमांवर मानवी त्वचा लावल्यास जखमा लगेच भरून येतात आणि ही त्वचा , त्वचापेढीत काही वर्ष जतन करता येते.

     तरीही अवयवांची उपलब्धता आवश्यकतेपेक्षा खूप कमी आहे . हे प्रमाण वाढेल जनजागृतीने, सरकारी यंत्रणेने आणि आपल्या इच्छाशक्तीने. मोक्ष मिळण्याच्या भाबड्या समजुतीनी काही वेळा या अवयव दानाच्या विचारांना ग्रहण लागत. म्हणूनच समंजस आणि विवेकी मनाने अवयवदान करा, पुण्याचं दान आपोआप तुमच्या खात्यावर जमा होईल.

                                                                                             

      


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational