यू आर माय सोनिया
यू आर माय सोनिया


केविनने लॅपटॉपच्या स्क्रीन मधून एका तासाने डोकं बाहेर काढलं. पेशींच्या पारदर्शक पटलातून आतबाहेर करणारे प्रवाही पदार्थ वेगळ्या प्रकारे कंट्रोल करता येतील का , पटलात काही बदल करता येतील का, या प्रश्नाची उकल करण्याऱ्या प्रोजेक्ट वर सध्या तो काम करत होता. त्रेपन्न वेळा त्यासाठीचा कोड लिहून झाला होता.आधी उत्तम चालणारा कोड आज फारच त्रास देत होता. आधीच्याच गणिताची आज वेगळीच उत्तरं येत होती, त्याच्या जीवनासारखीच. आकड्यांच्या आणि अगम्य सूत्रांच्या जंजाळातून त्याला दहा मिनिटे विश्रांती हवी होती. एकसारखं बसून पाठीचे स्नायू आखडून गेले होते.डोळे जणू लॅपटॉपची स्क्रीन झाले होते. हाताच्या बोटांच्या गाठी संधिवात झाल्यासारख्या दुखायला लागल्या होत्या. केविन ने चष्मा काढला. डोळे ताणून डोळ्यांचा व्यायाम केला. एक वाफाळती कॉफी पिण्यासाठी त्याने केफेटेरीयाकडे पावलं वळवली . त्याच्या डोळ्यातली बुब्बुळ दरवाज्याच्या आय स्कॅनर वर स्थिरावली. लेब च्या दरवाज्याने त्याला ओळखलं आणि दार उघडून दिल.
कॅफेटेरीयात आज कसली तरी इवेंट चालू होती. एक पाठमोरी तरुणी त्या गर्दीला मेनेज करत होती. “ सो गर्ल्स अँड गाईज , वी हॅड अ लॉट ऑफ फन टू डे. फोर युवर फ्री गिफ्ट्स , लेट अस मीट नेक्स्ट फ्रायडे . सेम टाईम , सेम वेन्यू.” असं म्हणून तिने गर्दीला टाटा केला आणि इवेंट संपवून ती वळली. केविन ची तिच्याशी नजरानजर झाली. तिचे सोनसळी रेशमी केस आणि हिरवे निळसर डोळे केविनच्या मनात भरले. तिने वाईन कलरचा ब्लेझर घातला होता. तिचा आकर्षक बांधा तिच्या ट्राउजर , ब्लेझर या वेशात अधिकच उठून दिसत होता. तिची थोडी जास्त असलेली उंची त्याच्या मनात भरली. “ हाय, मी सोनिया “... हिरव्या निळ्या डोळ्यांनी हात पुढे केला होता. केविन ने मंत्रमुग्ध होऊन तिचा हात हातात घेतला. “ के ....के...केविन....मायसेल्फ केविन . “ केविन ने स्वतःची ओळख त्याच क्षणी सोनिया ला सुपूर्द केली. सोनिया बरोबर शुक्रवारी संध्याकाळी प्यायलेली ती कॉफी त्याला मद्याच्या नशेपेक्षा जास्त धुंद करून गेली. ऑफिस मधला ताण, रिसर्च पेपर च्या डेड लाईन्स , मनाला झालेल्या जखमा , बॉसेस च राजकारण......केविन त्या क्षणी सगळ विसरला होता.
हवा पाण्याच्या गप्पांवरून गाडी ओळखी पर्यंत आली. “ मी ह्युमन मेनेजमेंट करते. इवेंट मधलं क्राउड पुलिंग , क्राउड प्लानिंग , सिनियर सिटिझन्स ना कंपनी देण, त्यांच्या सहली नेण , कोर्पोरेट मिटिंग्ज च्या मेनेजमेंट वर देखरेख करण , हे माझ काम आहे. “ सोनिया स्वतः विषयी सांगत होती. “ लॉंग ड्राईव्ह ला जाणं , म्युझिक ऐकण हा माझा छंद आहे.” सोनिया उत्साहाने भराभर बोलत होती. बोलता बोलता मध्येच खळखळून हसत होती. हसताना तिच्या गालावर लोभसवाणी खळी पडायची . केविनला आपला दिवस रात्रीचा लेब चा पत्ता बदलून तिच्या खळीत घर करावंस वाटायला लागलं.
गाठी भेटी वाढायला लागल्या. “ आय लव, द चेनस्मोकर्स मुझिक . डू यू लाईक मुझिक ? “ सोनियाने केविन ला विचारलं. मुलींकडून वाईट प्रकारची दोन तीन रिजेक्शन्स , dad चं मैत्रिणीकडे कायमचं राहायला जाणं आणि हे रिसर्च चं काम , केविन त्याचे छंद जवळ जवळ विसरूनच गेला होता. “ ये.....स , येस. आय डू . मी ....मी गिटार वाजवतो ....वाजवायचो.” “आणि मुवीज ? “ केविनच्या उत्तराची वाट न बघता सोनिया च चिवचिवत राहिली. “ डंकर्क जबरदस्त मूवी होती. क्रिस्तोफर नोलान ग्रेट आहे .अभिनेत्यांमध्ये मला क्रिस हेम्सवर्थ पण आवडतो. तुला ? “ केविन तिच्या लांबसडक पापण्यात अडकला होता. “ अ.... मी ....मला... कधी कधी एमा स्टोन ..पण नाही ..नाही..” केविन च पुढच वाक्य सोनिया च्या हास्याच्या लकेरीत विरघळून गेलं. “ अरे, ठीक आहे. कोणी आवडायलाच पाहिजे असं नाही. मी बघतेय, तुझा बोलण्याचा अक्सेंट ब्रिटीश आहे .” सोनिया म्हणाली. “ हो, माझी मॉम ब्रिटीश आहे. Dad अमेरिकन. “ Dad विषयी बोलताना केविन च्या नजरेतला पीळ सोनियाला जाणवला, असं उगीच केविन ला वाटलं. “ तू ऑड्री हेपबर्न सारखी दिसतेस “ केविन ने विषय बदलला. “ हो , सगळे असंच म्हणतात .” सोनिया लाजली.
वीकेंड ला सोनिया बरोबर लॉंग ड्राईव्ह ला जाणं सुरु झालं. ती गुणगुणायला लागली की केविन गिटार वाजवायचा. केविन ला गीटारीस्ट हे करीयर सुद्धा चालल असतं , या सोनियाच्या शब्दांमुळे केविन चा आत्मविश्वास भलताच वाढला होता. तिच्या सोनसळी केसात गुंतता गुंतता लेब मधले कोड चे गुंते भराभर सुटायला लागले. केविन च दिवसेंदिवस चालणारे प्रोजेक्ट च काम ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हायला लागलं. केविन नीट नेटका राहायला लागला. अनेक विषयात रस घ्यायला लागला. त्याच चेस खेळण परत चालू झालं. दोघे एकमेकांना भेटायला उत्सुक असायचे . केविन आनंदी राहायला लागला. कधी सोनिया आली नाही तर कासाविशी वाढायची.. केविन ला खात्री होती , आपण प्रेमात पडलोय. सोनिया आणि तो एकमेकांना समजून घेत होते. चांगलं आणि वाईट दोन्ही वाटून घेण म्हणजेच प्रेम, एकमेकांना साथ देण, एकमेकांबरोबर मोठ होण म्हणजेच तर प्रेम. प्रेम चिमटीत पकडता कुठे येते ? प्रेम मोजता कुठे येत ? पण एकाला दुसऱ्यामुळे येणारी परिपूर्णता म्हणजेच तर प्रेम. केविन प्रेमाची प्रमेय सोडवत होता.
सोनिया त्याच्या मनाचे कप्पे हळुवारपणे उघडत होती. मॉम केविन चा जीव कि प्राण होती. डॅडने या वयात मैत्रिणीकडे जाणं केविन ला रुचल नव्हत. त्याच्या अवती भवती अशी उदाहरणं तो बघत असला तरी त्याचं, मॉम च आणि डॅडचं घर अस्थिर झाल्याने त्याला धक्का बसला होता. या धक्क्याने तो वाक्यांची सुरुवात अडखळत करतो असं त्याच्या सायकीयाट्रीस्ट चं म्हणण होत.आज ऑफिस मागच्या बे वर दोघ कॉफी चे कप घेऊन बसले होते. सोनिया म्हणाली , “ केविन, डॅडकडे एक माणूस म्हणून बघ. मग कदाचित त्यांनी या वयात केलेल्या कृतीचा तुला उलगडा हेईल. डॅड लिसा बरोबर राहतोय. पण त्याचं तुझ्यावरच , मॉम वरच प्रेम कमी झालंय का ? लिसा आणि डॅड कुठल्या परिस्थितीत भेटले हे तुला माहीत आहे का ? डॅड च्या मनातली वादळे तुझ्या ओळखीची आहेत का ? त्याला एक बाप म्हणून नाही , एक माणूस म्हणून समजून घे. प्रेमात पडलेल्याला सगळ माफ असत. “ सोनिया ची खळी मुग्ध हसली असा केविन ला भास झाला. त्याच्या मनातली जळमटे हळूहळू स्वच्छ होत होती. बॉस एकदा म्हणाला ,” केविन तू आता चाचरत नाहीयेस, कामातली तुझी प्रोडक्टीविटी वाढलीये. तू एक नवा, आत्मविश्वास पूर्ण , सक्षम व्यक्ती झालायेस.” , तेव्हा केविन ला त्याच्यातल्या बदलांचा शोध लागला. त्याला आमूलाग्र बदलवणाऱ्या, जीवनाच्या प्रेमात पाडणाऱ्या सोनियावर त्याचं प्रेम त्याला उधळून द्यायचं होत. तिच्यासाठी कुठलही दिव्य करायला तो तयार होता.
थँक्स गिविंगचा सण जवळ येत होता. त्याच दिवशी प्रपोज करायचं सोनियाला , केविन न मनाशी ठरवलं. सोनियानेच कधीतरी सांगितलेल्या तिच्या आवडीच्या रेसिपीज त्याने मॉमला दिल्या. टर्किश सायप्रस सांडविच विथ हलूमी , ग्रीक सलाड, आणि कॉफी मूस. कॉफी मूस तो स्वतः करणार होता. डॅड आणि लिसाला पण त्याने बोलावलं . केविन आणि मॉम ने एव्हाना डॅडला समजून घेतलं होत. सोनियाला आई वडील दोघही नव्हते. तिची भावंड बिना आणि जूल कामानिमित्त वेगळ्या देशात रहात होते. सोनिया पार्टी ला एकटीच येणार होती.
केविन ने आज गार्डन मध्ये सोनियाच्या आवडीचे बारीक, लुकलुकणारे दिवे लावले होते. सगळीकडे पांढरे गुलाब आणि पांढऱ्या लिली ची सजावट, तिच्या आवडीचं संगीत , तिला आवडणारे कॅबोतीन परफ्युम गिफ्ट बॉक्स मध्ये तयार होत.मम्मीला त्याने सगळ सांगितलं होत. सफाईदार नृत्य करणाऱ्या सोनियाच्या नाजूक कंबरेवर त्यान हात वेटाळला , ओठावर ओठ टेकवले. तिच्या इतक्या जवळ तो या आधी कधीच गेला नव्हता. केविन ने तिच्या कानाशी कुजबुज केली. “ सोनिया, माझं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर. मला खात्री आहे, माझ्या भूतकाळावर तुझं उत्तर अवलंबून नाहीये. हे सांगण्याच धैर्य आधी माझ्यात नव्हत. मला लहानपणी झालेल्या एका अपघातात माझी कमरेखालची एक जागा अधू झाली आहे. पण त्यामुळे माझ्या पुरुषत्वात काही फरक होत नाही. सोनिया, तू माझी होशील ना ? “ आणि इतका वेळ रुणझुणणा री सोनिया एकदम अडखळली . नुसतीच केविन कडे भावनाशून्य बघत राहिली. केविनला हेच नको होत. ह्यालाच तो घाबरत होता. भूतकाळातले तीन नकार त्याच्या भोवती मधमाश्यांसारखे घोंगावायला लागले. सोनियाने ही त्याला समजून घेतलं नव्हत. माझं प्रेम, माझं मन, माझी उजवी बाजू पुरेशी नाहीये का प्रेम मिळवायला ? केविन चा स्वतःच्या मनावरचा ताबा सुटला. त्याने सोनियाला रागाने दूर ढकललं. सोनिया कोलमडली आणि काटे, चमचे , सुरया ठेवलेल्या टेबलावर पडली. एक सुरी कचकन तिच्या आरपार झाली. केविन ने घाबरून सुरी उपसली आणि बाहेर पडायला लागली वायरींची भेंडोळी, ट्रान्समीटर , सेन्सर्स . पार्टी स्तब्ध झाली आणि केविन हतबुद्ध.
सोनिया एक हुमनोईड होती. माणसाच रूप दिलेला, चेहऱ्या वर ६२ भावना दाखवू शकणारा रोबोट. केविनच्या बॉस ने हनसोन कंपनी कडून घेतलेला. बॉस ने चलेंज घेतलं होत की माणसाच्या जीवनात प्रेम आलं की माणूस अधिक कार्यक्षम बनतो.त्याचा आत्मविश्वास वाढतो. केविन हुशार होता पण त्याची क्षमता त्याला जाणवून द्यायला हवी होती. बॉस ने पहिला प्रयोग केविन वर करायचं ठरवलं. सोनिया हुमनोईड चा प्रयोग. १९ एप्रिल ला २०१५ ला जन्माला आलेल्या सोनियाने शास्त्रज्ञांनी तिच्यात फीड केलेली सगळी माहिती , सगळीप्रश्नोत्तर बरोबर वापरली होती. ऑड्री हेपबर्न चा चेहरा लाभलेली , रूप, रस, गंध, स्पर्श, बुद्धी याने परिपूर्ण सोनिया , Artificial Intelligence , visual data processing आणि facial Recognition या तत्वांवर काम करणारा रोबोट होती. डोळ्यातल्या केमेऱ्याने ती आरपार पाहू शकायची. एलिझा प्रोग्रामने ती गाडी चालवणे, नृत्य करणे आणि बाकीच्या सफाईदार हालचाली करायची. स्पीच प्रोसेसर ने ती बोलायची. डोक्यातल्या क्लाऊड नेटवर्क ने ती स्टोक मार्केट पासून फिलोसोफी पर्यंत मत व्यक्त करायची. बिझिनेस मिटिंग च समायोजन, रुग्णांची आणि वृद्धांची काळजी, मोठ्या गर्दीच नियोजन या साठी शास्त्रज्ञांनी तिला जन्माला घातली. बिना आणि जूल हे छोटे रोबोट तयार केले. अफ्रोडाईट ही प्रेम आणि सौंदर्याची देवता जशी स्त्री रूपात प्रकट झाली , तसं हुमनोईड ला स्त्री रूपात आणावस वाटलं त्यांना. पण वायरींच जाळे असलेली सोनिया , भावनांच्या गुंत्यात अडकायला असमर्थ होती. प्रेम शारीरिक वैगुण्यावर मात करू शकत का , याच उत्तर ती देऊ शकली नव्हती. कारण ती ह्युमन नव्हती , ह्युमानोईड होती म्हणून ? का आधीच्या तीन वेळा सारखीच चूक केविन ने परत केली होती म्हणून ? केविन माणूस असून समोरच्याला समजून घेण्यात कमी पडला होता का? ? प्रेमातला विश्वास, पारदर्शकता केविन मध्ये नव्हती का ? केविन ला स्वतःच्या चुकांचा पश्चाताप झाला. पण माणसे जे करू शकली नव्हती ते एका हुमनोईड ने केलं होत,केविनला माणसात आणलं होत.
पुनर्वसन केंद्रातून बाहेर पडलेला केविन खूप सावरला होता. बॉस चा आलेला राग आता कृतार्थातेत बदलला होता. सोनियाने दिलेल्या नव्या ओळखीने, उमेदीने, आत्मविश्वासाने, त्याने परत कामाला सुरुवात केली होती. स्वतःवर प्रेम करयला तिनेच तर शिकवलं होत. “मी असंच प्रेम करत राहीन तुझ्यावर आणि स्वतःवर सुद्धा." , केविन स्वतःशीच बोलला.” मला खात्री आहे माझ्यावर प्रेम करणारी कोणीतरी लवकरच शोधत येईल मला. तरीही , आय विल लव यू सोनिया फोरेवर “ .