Dr.Smita Datar

Inspirational

4.8  

Dr.Smita Datar

Inspirational

अँड द विनर इज

अँड द विनर इज

10 mins
875


                                                           ' ऑन युवर मार्कस , गेट सेट गो ...' हवेत गोळीचा आवाज झाला. सविताचा पाय स्टार्टिंग ब्लॉक पासून सुटला. तिच्या पायाने हवेत उंच झेप घेतली. अंगात भरलेल्या वीजेनं सविताला हवेत झेपावलं आणि ती बाणाच्या वेगाने ट्रॅकवरच अंतर कापायला लागली. सविताच्या कानात फक्त आणि फक्त डॉक्टर देवेंद्रांचा आवाज घुमत होता. " कम ऑन सविता, यू कॅन  डू इट. ' 

      सविताला आठवली ती पहिली पावलं, जी तिने हॉस्पिटलच्या लॉनवर ठेवली होती. डॉक्टर देवेन्द्रनी हिम्मत दिल्यावर तिने टाकलेली ती नंतरची ठाम पावलं. तिला आठवली तिची डगमगणारी पावलं जी तिने जुहूच्या समुद्रकिनारी वाळूत घट्ट रोवली होती, डॉक्टर देवेन्द्रांच्या मदतीने. 

      " नाही नाही डॉक्टर, मला मरायचय , माझा पाय ..ओह नो ... मी माझ्या पायांशिवाय जिवंतच राहू शकत नाही. मला का वाचवलत डॉक्टर ? " सविताचा आक्रोश सिंदिया हॉस्पिटलच्या भिंती भेदून जात होता. सविता मुदलीयार ... सगळा देश जिच्या आगामी ऑलिंपिक पदकाकडे डोळे लावून बसला होता, ती फ्लाइंग क्वीन, सविता मुदलीयार . जी धावायला लागली की तिचे पाय जमिनीला टेकतात की नाही हे बघायला कॅमेरा तिच्या पायांवर झूम केला जायचा, ती सविता मुदलीयार .400 मीटर राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. संपूर्ण भारतात तिने दोनदा पहिला नंबर पटकावला होता. राज्यातल्या अनेक स्पर्धा ती जिंकत होती. बीकॉम च्या शेवटच्या वर्षाला असणार्‍या सविताला देश ऑलिंपिकच्या ज्योतीसह बघायला उत्सुक होता. आगामी स्पर्धांच्या आधी, भारतातल्या टॉप ब्रॅंडच्या बुटांची जाहीरात जिच्या बरोबर करायला कंपन्या धडपडत होत्या, ती सविता मुदलीयार तिच्या उजव्या पायाला बांधलेल्या रक्ताळलेल्या बॅंडेजकडे बघून किंचाळत होती. तिला लावलेल्या सलाईन च्या नळया तिच्या गदगद्णार्या शरीराबरोबर हिंदोळत होत्या. आज 24 जुलै. सविता चार दिवसांनी शुद्धीवर आली होती. डॉक्टर देवेंद्रांनी आज तिला वास्तव समजावून दिलं होतं . डॉक्टर चार दिवस तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते. 

              20 जुलै... मध्यरात्री मुंबईत पाऊस कोसळत होता. मध्य आणि दक्षिण मुंबईतला सखल भाग अर्धा अधिक पाण्याखाली होता. मुख्य रस्ते सुदैवाने अजून चालू होते. २६ जुलै ची भीती बसल्याने रस्त्यांवर वाहतूक जवळ जवळ नव्हतीच. डॉक्टर देवेंद्र आज रात्रीच सेमिनार मध्ये पेपर वाचायला भारताबाहेर जाणार होते. सुट्टीवर जाण्याआधी त्यांच्या एका पेशंटला ते बघायला आले होते. बर्न वॉर्ड चा राऊंड संपवून ते त्यांचा ज्युनिअर , डॉक्टर आशीष ला इमर्जन्सी वॉर्डच्या समोर उभं राहून पुढच्या सूचना देत होते. आणि इतक्यात एका पेशंटची ट्रोली धडधडत आली. ती आणणार्या माणसांचे शर्टही रक्ताने भिजले होते. पेशंटच्या पायतून बराच रक्त्स्त्राव झाला होता. अंगावर सगळीकडे जखमा होत्या. डावा हात जायबंदी होता. 

         " डॉक्टर, आता शेवटच्या ट्रेनसाठी आम्ही भायखळा स्टेशनवर उभे होतो. किंकाळी ऐकली म्हणून ट्रॅक कडे धावलो. तर ही मुलगी ट्रॅकवर विव्हळत पडली होती. तिचा उजवा पाय पार चिंधड्या झाला होता. डावा हात पण रक्त बंबाळ होता. पाऊस आणि अंधार , आम्ही मदतीला हाका मारल्या , पण कोणी येईना. तरुण मुलगी, आम्हाला बघवेना , म्हणून आम्हीच घेऊन आलो. वाचवा तिला डॉक्टर . “ त्यातला एक तरुण म्हणाला. दुसरा अनुभवी माणूस म्हणाला , " ते पोलिसांची लफड मागे लावू नका साहेब, आजकाल कोणाला वाचवायला बी भीती वाटते. " केसातलं पाणी त्याने बोटाने निपटून टाकलं . 

      डॉक्टर देवेंद्र आजपासून कॉल वर नव्हते. आताच त्यांनी विशाखाला फोन करून ते वेळेवर एयरपोर्टवर पोहचणार आहेत असा फोन केला. विशाखा अंधेरी पर्यन्त पोहोचली होती. दोघं खूप दिवसांनी अमेरिकेच्या दौर्‍यावर निघाली होती. डॉ. देवेंद्र बोस्टन मेडिकल सेंटर मध्ये त्यांच्या प्लॅस्टिक सर्जरी च्या विषयावर पेपर वाचणार होते. तिथून दोघे फिरायला पुढे जाणार होते. येता येता फ्लॉरिडाला शिकणार्‍या लेकीला भेटायचं ठरलं होतं . विशाखाने चांगली तीन आठवड्यांची सुट्टी काढली होती, आणि देवेंद्रलाही घ्यायला लावली होती. जाता जाता ऑपरेशन झालेल्या पेशंटचा राऊंड घेऊन , ज्युनिअर डॉक्टरांना काम समजावून थेट एयरपोर्टवरच देवेन्द्र , विशाखाला भेटणार होते. पण देवेंद्रना या ईमर्जंसी पेशंटचा पायाचा अंगठा तुटलाय , आणि खूप रक्तस्त्रावाने ती बेशुद्ध झालीये, हे जाणवलं. या धो धो पावसात ऑन कॉल प्लॅस्टिक सर्जन वेळेवर पोहोचतील याची खात्री नव्हती. इतक्यात तिचं आय कार्ड एका वॉर्डबॉय च्या हातात त्यांनी बघितलं . सविता मुदलीयार . देवेंद्रना नाव ओळखीचं वाटलं. कुठेतरी कानावर पडल्यासारखं वाटलं. तोपर्यंत पेशंटला आत घेऊन लाईफ सेविंग उपचार चालू झाले होते. सविता मुदलीयार, सविता ....झपकन डॉक्टरांना आठवलं, गेल्याच आठवड्यात पेपरमध्ये या मुलीला आंतरभारतीय धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाल्याची बातमी होती. तिची ऐपत नसून तिला शिकवणार्‍या तिच्या कोच बरोबर तिचा फोटो होता. ती , तीच आहे का ही ? नाही नसेल. तिचा चेहरा सुजलेला , रक्तबंबाळ होता. 


         विशाखाचा फोन खणखणला . " देव, आय एम देयर ऑन गेट फाइव . पावसात अडकला नाहीयेस ना ? " 

" नो. नो वरीज , थांब तू . " देवेंद्र पुटपुट्ले . " फ्लाईट इज ऑन टाईम देव . चेक इन सुरू झालय . " विशाखा फोनमध्ये बोलत होती. देवेंद्रच्या नजरेसमोर मात्र पेशंटचा तो तुटून लटकणारा अंगठा लोंबत होता. तिचं त्वचा सोललं गेलेलं पाऊल दीनवाण होऊन त्यांच्या डोळ्यापुढे आलं . 

"सर , डॉ. बोस पावसात अडकलेत. त्यांना पोहचायला उशीर होतोय. " ऑपरेशन थिएटर मधून नर्स सांगत आली. " डॉक्टर कामत , एक्स रे वर मल्टीपल फ्राक्चर्स पण आहेत. घाई करायला हवीये. " 

' ती कोणीही असू देत, तिचा पाय वाचवायला हवा आहे. आणि जर ती सविता मुदलीयार असेल तर तिचा पाय वाचलाच पाहिजे. आणि मी , क्रश इंजुरी चा स्पेशलीस्ट तिला अशीच सोडून जाऊ शकत नाही . सर नेहमी म्हणायचे , वेटिंग टू लॉन्ग इन क्रश इंजुरी, क्लोजेस द विंडो ऑफ ऑपर्चुनिटी फॉर एफेक्टिव ट्रीटमेंट अँड फुल्ल रिकवरी . ' विंडो ऑफ ओपोर्चूनिटी ... संधी मिळण्याची खिडकी , जी एकदाच किलकिली होते. या पेशंटच्या नसा जेवढ्या लवकर जोडल्या जातील तेवढी तिचा पाय वाचण्याची शक्यता आहे. एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. एका खेळाडूच्या आयुष्याचा प्रश्न होता. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलीचा गोड चेहरा तरळून गेला. तिच्या एवढीच असेल ही. देवेंद्रच्या मनातलं द्वंद्व थांबलं. त्यांनी विशाखाला वॉइस मेसेज पाठवला, ' टूर कॅन्सल झालीये. ड्यूटी फर्स्ट . तू घरी जा. मग कळवतो. आय एम सॉरी. ' 

       एव्हाना सविताचा भाऊ पोहचला होता. डॉ. देवेन्द्रनी सविताची गंभीर परिस्थिती त्याला समजावून सांगितली. पाय वाचवण्याचा ते प्रयत्न करणार होते. पण तिला हॉस्पिटलला आणण्यात वेळ बराच गेला होता. गॅंगरीन झालं, तर पायाचा अंगठा आणि बाजूचं बोट कापायला लागणार होतं .देवेन्द्र आता फक्त सविताचे डॉक्टर होते. 

       सविता तीच होती, भारताची 400 मीटर स्पर्धेतली धावपटू . ऑलिंपिकचा सराव वर्ग परवडावा म्हणून बी कॉम करता करता , कॉलेज नंतर पार्ट टाईम नोकरी करत होती. त्या रात्री तिने कल्याणला जायला सी एस टी हून लोकल पकडली. भायखळा आणि सॅंडहर्स्ट रोडच्या मध्ये भावाचा फोन आला म्हणून ती दरवाज्याजवळ येऊन त्याच्याशी बोलत असतानाच तिच्या डोक्यावर जोरदार फटका बसला. आपण ट्रेन मधून खाली कोसळतोय , डोकं सुन्न होतय हे तिला जाणवलं. ती ट्रॅक वर पडली . एवढ्यात त्या ट्रॅकवर मागून येणार्‍या ट्रेनने तिला भिरकावलं.तिचा उजवा पाय ट्रेन आणि ट्रॅक च्या मध्ये चिरडला गेला. डाव्या हाताला मार बसला . वेदनेच्या तीव्र किंकाळीत जाणीव नेणीवेच्या धूसर भासात सविता हिंदकळत राहिली. यात ज्या मोबाईल साठी सवितावर जीवघेणा हल्ला झाला होता, तो ही ट्रॅक वर पडला, आणि त्याच्यावर ओरखडाही उमटला नाही. त्याच्यावरून ऐकू आलेल्या विचित्र आवाजानेच भावाने ओळखलं काहीतरी गडबड आहे, आणि तो सविताला शोधत येऊन पोचला होता. मोबाईलच्या हव्यासापायी त्या फटका गॅंगने सविताचं आयुष्य उध्वस्त केलं होतं.  

        सविता वर तीन आठवड्यात सहा ओपरेशन्स झाली. तिच्या पायाची हाड सांधण्याची ऑपरेशन्स झाली. तिच्या अंगठ्याच्या नसा जोडल्या गेल्या. स्कीन ग्राफटिंग करून पायाची त्वचा पूर्ववत करण्यात आली. प्रत्येक ऑपरेशन नवं आव्हान घेऊन यायचं.कधी जखमेला सूज , कधी ताप, कधी अतीव वेदना. सविता मनाने खचली होती. तिला न धावणारं पांगळ आयुष्य नको होतं . डॉक्टर देवेन्द्र तिला आणि तिच्या नातेवाईकांना धीर देत होते. खर्चाचे आकडे फुगत होते. डॉक्टरांनी सिंदिया हॉस्पिटलला विनंती करून तिचं बिल कमी करून दिलं . तिला स्वयंसेवी संस्थांकडून बरीच मदत मिळवून दिली .फेसबूक , सोशल मीडिया वरुन आव्हान करून ते जनजागृती करत होते. तिच्या कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी मदतीचं आव्हान केलं . पण खरं आव्हान सविताला मनाची उभारी देऊन परत उभं करण होतं . डॉक्टर देवेंद्र तिच्यासाठी तिला आवडणारी हिन्दी गाणी लावायला सांगायचे.कधी गाणी गुणगुणून तिला ओळखायला लावायचे. त्यांनी तिच्या आई वडिलांना तिची अभ्यासाची पुस्तकं तिथे आणायला सांगितली. तिने बीकॉम च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा द्यावी म्हणून ते प्रयत्न करत होते. राऊंड ला गेल्यावर तिला आवडणार्‍या नट नटयांच्या गप्पा व्हायच्या. सविताच्या पायाच्या जखमा हळू हळू भरत होत्या. पण डॉक्टर देवेन्द्र्ना तिच्या मनालाही सांधायच होतं. तरच ती परत उभी राहू शकली असती. आणि तिला उभ करण नाही तर तिला धावायला लावण हे त्यांचं ध्येय होत. आज तिला पहिल्यांदा हॉस्पिटलच्या लॉन वर फिजिओथेरपिस्ट चालवणार होते. सविताने पहिलं पाऊल टाकलं आणि ती कोसळली.तिला प्रचंड वेदना झाल्या. इतर डॉक्टर देवेन्द्र्ना वेड्यात काढत होते. कधीतरी सविता उभी राहीलही, पण धावणं ? आज सविताला आणि देवेन्द्रना हरल्यासारखं वाटत होत.

            ' इट इज ओके देव . तू तुझे प्रयत्न करतोयस. इतरांना शक्य नाही , असं ऑपरेशन केलयस तू. अजून थोडा वेळ दे तिला. ती नक्की धावेल. ' विशाखा देवेन्द्रची समजूत काढत होती. नवर्‍याला प्रचंड समजून घेणारी विशाखा त्याच्या पंखात बळ भरत होती. आपला नवरा फक्त प्लॅस्टिक सर्जन नाहीये, त्याच्यात एक मनस्वी माणूस आहे, हे ती जाणून होती. . सविताची पुन्हा एक छोटी शस्त्रक्रिया झाली. तिचे स्नायू बळकट करायला तिला पाण्यात चालण्याचं , वाळूत चालण्याचं ट्रेनिंग दिलं जात होतं .

        तिच्या केस साठी डॉक्टर देवेंद्र आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या त्यांच्या प्लॅस्टिक सर्जन मित्रांच्या संपर्कात होते. स्वत: पैसे खर्च करत होते. आज डॉ. देवेन्द्र तिच्या राऊंड ला गेले होते. सविताला झोप लागली होती. तिच्या हातात डॉ. देवेंद्र चा फोटो होता. तिने तो छातीशी घट्ट धरून ठेवला होता. झोपेत ती मंद हसत होती. डॉक्टरांना हल्ली आलेले तिचे' आय लव यू डॉक' चे मेसेज आठवले. ते चरकले. ही मुलगी आपल्याला देव मानतेय. कदाचित त्या पलीकडच काहीतरी समजतेय , याचा अंदाज आला होता त्यांना. त्यांनी असे भावनेत वाहून जाणारे पेशंट पाहिले होते. सगळ्या आशांचे दोर जेव्हा कापले जातात , तेव्हा माणूस रेशमाच्या तंतूलाही दोरखंड समजायला लागतो. पण नुकत्याच सावरणार्‍या सविताला दुखवून चालणार नव्हतं. ते अधून मधून सविताला विशाखाचे , त्यांच्या कुटुंबाचे फोटो दाखवायचे. त्यांच्या मुलीविषयी बोलायचे. जेणे करून सविताच्या मनात त्यांच्या विषयी वेगळं काही येऊ नये. तरी कधीतरी ते अस्वस्थ व्हायचे. ' विशाखा, सविताचं आयुष्य धावणं आहे. तिला आता फक्त मीच उभं करू शकतो. आय होप तू समजून घेशील. ' विशाखाला नवर्‍याच्या ज्ञानावर आणि प्रेमावर विश्वास होता. तिने मूकपणे त्यांच्या हातावर हात ठेवला. 

      सविताच्या पायातल्या स्नायूत शक्ती आली. तिच पथ्य, व्यायाम , सराव सगळं तिचे कोच अजय सर सांभाळत होते. धावण्याच्या सरावाला डॉ. देवेंद्र , डॉ . आशीष , सविताचा भाऊ, अजय सर सगळे आलटून पालटून तिच्या बरोबर धावायचे. सविताचा हातही आता बरा झाला होता. पण अजूनही झोपेत सविताला धडधडणारी ट्रेन जवळ जवळ येतेय अशी स्वप्न पडायची आणि तिचा आत्मविश्वास उणावायचा. 

       डॉ. देवेंद्रांनी तिला एक दिवस तीच सी एस टी ..कल्याण ट्रेन एकटीने पकडायला लावली.ते आणि तिचा भाऊ तिच्या मागच्या डब्यात होते. दादरला स्टेशनवर तिच्या कॉलेजच्या मैत्रीणी, ट्रेनचे सहप्रवासी , तिचे नातेवाईक फुलं घेऊन हजर होते. तिथे सविताचा छोटासा सत्कार केला. या छोट्याश्या घटनेने सविताची ती दु:स्वप्न थांबली. ती धीट झाली. सविताचं मन आता ऑलिंपिक धावायला लागलं होतं. तिला जग नव्याने दिसत होतं . मनावरच्या सगळ्या जखमांनी खपली धरली होती. डॉक्टरांना ती नव्याने समजून घेऊ लागली होती. त्यांचे कष्ट, त्यांची तिला बरं करण्याची तळमळ तिच्या सांधलेल्या मनापर्यंत पोहचायला लागली होती. आणि आज डॉ. देवेंद्र , सविता बरोबर मुंबई मेरेथोन धावले. तिच्या साठी हाडाच्या डॉक्टरांनी खास कुशनचे बूट बनवून घेतले होते .तिचे नातेवाईक , मित्र मैत्रिणी , सिंदिया हॉस्पिटल चा स्टाफ , रंगीबेरंगी रुमाल हलवत होते. पत्रकार तिचे फोटो काढत होते. सविताचा आत्मविश्वास परत आला होता. ती सगळ्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार करत होती. 

       पन्नाशीचे डॉ. देवेंद्र ओल्या नजरेने सविताचा आनंद बघत होते. " सविता, आता इथून पुढचा प्रवास तुला करायचा आहे. तू ऑलिंपिक धावशील की नाही , माहीत नाही. तो अजून लांबचा पल्ला आहे. पण आजची मेरेथोन माझ्या साठी ऑलिंपिकच आहे. जो पाय कापला जाईल की वाचेल हे माहीत नव्हतं, त्या पायाने तू धावली आहेस. तू धावायला लागेपर्यन्त तुझा आत्मविश्वास मला हरवू द्यायचा नव्हता. तू खेळाडू आहेस. भावनांवर ताबा मिळवण तू जाणतेस. तू माझी पेशंट आहेस. माझ्या मुलीसारखी आहेस. तुझ्या खेळावर लक्ष दे.माणसाला मदत करणारा देवाचा दूत असतो. तो देव नसतो.काही नाती दवबिंदू सारखी असतात.नाजूक आणि निर्मळ. प्रकाश आणि पाण्यामुळे जसे दवबिंदू निर्माण होतात., काही काळ चमकतात. तशीच ती नाती असतात. प्रकाश आणि पाण्याला थांबून चालत नाही. त्यांना पुढची वाट चालायला लागते.तुला काही गरज लागली तर मी आणि विशाखा आहोतच. पण तू कोणावरच विसंबू नकोस . ना देवदूतावर , ना नियतीवर , ना तुझ्या पायांवर ..... तू तुझ्या मनाला जिंकायचं आहेस. " 

       तिचे फोटो काढणारी विशाखा त्यांच्या जवळ आली. सविता नि: शब्द होती. एका खर्‍या प्रेमाचा आविष्कार आणि त्याची ताकद ती अनुभवत होती. तिच्या नजरेत विश्वास दाटून आला होता आणि तिच्या नजरेला दिसायला लागली तिने ऑलिंपिक स्पर्धेत घेतलेली शेवटची लीप , टाळ्यांनी दुमदुमणारा स्टेडीयम आणि प्रेक्षकात बसून तिला चीयर करणारे डॉ. देवेंद्र कामत आणि विशाखा दीदी. घोषणा होत होती , अँड द विनर इज …


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational