Dr.Smita Datar

Others

4  

Dr.Smita Datar

Others

श्रद्धा डॉट कॉम

श्रद्धा डॉट कॉम

3 mins
16.1K


श्रद्धा डॉट कॉम

 आज कोपऱ्यावरच मंदिर पाडवतायत . बुलडोजर आलेत. पोलीस बंदोबस्त आहे. देव कुठेतरी हलवलेत. विस्थापित केलेत.मंदिर अनधिकृत आहे, हे आम्हाला माहीत आहे. पाडवल ते बरंच झालं, अशी काही मूठभरांची धारणा झाली. तर काहींच्या मते , केवढ मोठ पाप. देवाला जागेवरून हलवायचं म्हणजे काय ? त्या गरीबडया आया बायांची समजूत घालता घालता माझी पुरेवाट झाली. अग, काय झालं मंदिर हलवलं तर ? देव देव्हाऱ्यातही नसतो आणि देवळातही नसतो. तो असतो प्रत्येक माणसात , प्रत्येकाच्या मनात.

     देवाला पाहिलंय का कोणी ? कसा दिसतो ते? अडी अडचणीला धावून येतो तो माणूस, देव नाही. हा.. आता त्या माणसाच्या चांगुलपणाला आपण देव असं म्हणतो. पण ते घडावं लागत माणसाच्याच हातून ना ?

    फार पूर्वी खूप महान माणस होऊन गेली . त्यांचा पराक्रम , त्यांची विद्वत्ता खरच प्रशंसनीय असणार, त्यांच्या पराक्रमाच्या कथा रचल्या गेल्या. हेच ते देव. आणि वाईट माणस, घातपात करणारी, लोकांना जीवे मारणारी, वाईट बुद्धीची माणस म्हणजे दानव .  देव दानवा नरे निर्मिले ..हे खरच असणार. . देव स्वतः चांगलं चुंगलं खायचे म्हणजे आख्यायिकांचा आधार घेतला तर.. गणपतीला मोदक प्रिय, तर कृष्णाला दही, दूध ..ते ही चोरून खायचा भामटा. लक्ष्मीला बत्तासा आणि अनारसा , केशर दूध, तितका वाईड चोईस आणि निवड नावड करायला वाव इतर देवांना नाही. म्हणजे राम, विष्णू, सरस्वती वगैरे पानात पडलेलं खात असावेत. तरी किती पदार्थ आपण त्यांच्या नावावर बनवतो आणि   आपणच हादडतो . तो  फक्त “ भावाचा भुकेला”  आहे ना ?

   तसाच त्याचा रेसिडेंस . मंदिर म्हणजे अगदी फुटपाथ पासून पंचतारांकित देवळापर्यंत .त्याने सांगितलय  का , की मला किती स्क्वेयर फूट चा गाभारा हवाय की इटालियन मार्बल हवाय. पण आपण त्याला मनासारखं विराजमान करणार.  मग त्याचे  वेगवेगळे उत्सव साजरे करणार. घणाघाती संगीत वाजवणार. खरच होत असेल का तो प्रसन्न ? असता खरच तर बहिराच झाला असता. आणि भक्तांचे चाळे बघून आंधळा.

   ज्याने सुदाम्याच्या पुरचुंडीभर पोह्यांनी ढेकर दिली, त्याला तुम्ही कसले छप्पन भोग लावताय ? जो आजन्म विटेवर उभा राहिला, त्याला तुमच्या संगमरवरी देवळाची काय पत्रास ? ज्याला चोखोबा, कान्होपात्रा सगळे आपले वाटले, तो व्ही आय पी पास वर हसेल तुमच्या. आयुष्यभर कफनी नेसलेल्या , मशिदीत राहिलेल्या साईबाबांना सोन्याचं सिंहासन देणाऱ्यांना जबरदस्तीने काही खेड्यात पाण्याच्या पाईपलाईन टाकायला सांगायला पाहिजे. स्वतःच्या कामाचा वेळ फुकट घालवून  देवळासमोर रांगा लावणाऱ्यांकडून अनाथ मुलांसाठी पैसे गोळा केले पाहिजेत.

    आपल्या देवादिकांच्या आचरट सिरियल्स नी बाय बापड्यांच्या मनावर गारुड केलय. खेड्यातल्या बायकांचं एकवेळ ठीक आहे. पण शहरातल्या शिकल्या सवरलेल्या बायका पण या देवाच्या सिरीयल समोर नतमस्तक होतात. ४०० स्क़ेयर फूट च्या घरात सिरीयल च्या कोलाहलात मुलांनी अभ्यास करावा अशी अपेक्षा करणाऱ्या पालकांना तो देवच बुद्धी देवो. बर, हे अध्यात्माचे डोस प्रश्न करून आपली मने सात्विक बनतात का ? तर तसं अजिबात नाही. लोकल मध्ये तरीही आपण एकमेकांच्या अंगावर पाय देणार , एका विशिष्ट  स्टेशनवर  जाणऱ्या लोकल मध्ये दुसऱ्या स्टेशनवर उतरणारी बाई चढली तर तिला खाली पाडणार . घरी नातेवाईकांशी भांडणार . परस्त्री कडे अधाश्या सारखे बघणार . हा आपला भक्तीभाव.      देवाने ( तो असलाच तर किंवा पोथ्या पुराणात भेटतो तो..) सांगितला एकोपा, दया, प्रेम आणि क्षमा . आपण बघणार देवाची फेशन . देवीची हेयर स्टाईल . श्रीमंत होणार चानेल वाले, नट, दिग्दर्शक. गरिबी येतेय ती फक्त विचारांची, आचारांची, माणुसकीची. समाजाला हजारो वर्ष मागे नेणाऱ्या या सर्वच गोष्टी , सर्व धर्मांनी हद्दपार केल्या पाहिजेत.

    वत्सलाबाई च्या डोक्यात काही हे माझं वाक्ताडन काही केल्या  शिरेना. ती आपली डोळ्यांना पदर लावून बसलेली, देवाच्या मंदिरावर बुलडोजर घातला म्हणून . तितक्यात जग्गू न बातमी आणली, की मंदिर पाडवत नसून , कोर्टाचा स्टे उठवून मंदिर मोठ करण्याच काम काढलंय. आणि .... माझ्या आनंदाचा फुगा फट्कन फुटला.


Rate this content
Log in