मनीच्या कानी 2
मनीच्या कानी 2


मनीच्या कानी 2
हाय मनी
काल ए ‘दिल है मुश्कील’ बघितला. आणि या लोकांचं खरच मुश्कील आहे असं वाटायला लागल .’लव आज कल’ पासून सुरु झालेला हा प्रवास , खऱ्या प्रेमाचा शोध , मैत्री आणि प्रेमातला फरक , हे किती गुंतागुंतीचे विषय आहेत नाही? सिनेमा मुळे , मुक्त विचार पद्धती मुळे हा तिढा अजून वाढलाय . पण त्यामुळे काय झालय माहितीये , नाते जोडून, ते टिकवण्याचे कष्ट घ्यावेसे वाटत नाहीत कुणाला. रिलेशन ब्रेक होण्यातही नॉर्मल वाटणे, या सारखी दुसरी एबनॉर्मलीटी नसेल. म्हणजे अपवादात्मक अश्या केसेस असतीलही, की जिथे फसलेली नाती संपतात आणि नवी मग सांधली जातात. पण आता ही मुश्कील आम होत चाललीये असच म्हणावस वाटत . नाते कसं असते ना मनू , नर्सरी तून आणलेल्या रोपासारखे . प्रत्येकाला वाटते , ते आपल्या घरी जगेल , पण प्रत्यक्षात त्याला जगवण्याचे प्रयत्न करावे लागतात. पाणी जास्त घातले तरी कुजणार, उन जास्त झाले तर कोमेजणार. मग ते कुठलही नाते असो. सतत कष्ट घेऊन नाती सुधारावी लागतात. ती बेताच उन , पाणी, प्रकाश देऊन टवटवीत ठेवावी लागतात. मला गम्मत वाटते, सगळ काही कळणारी सुजाण पिढी ही, मग साध हा किवा ही आपल्याला जोडीदार म्हणून पटतो की नाही यासाठी शंभर वेळा जोडीदार बदलून बघणार का ? तो काय बाजारातला शर्ट आहे, नाही आला अंगाला, किवा नाही आवडला रंग तर बदल
ा. आणि मनी, त्या doubtful नात्याचं प्रदर्शन म्हणजे लग्न करायला आयुष्याची कमाई खर्च करायची. देवा रे देवा..
आता येऊ घातलेले तमाम डियर जिंदगी , बेफिक्रे वगैरे फिल्म बघण्याची भीतीच वाटते. त्यापेक्षा ना असे करायला पाहिजे. पूर्वी कसं.. मूल जगेल का याची खात्री नसल्याने ते पाच वर्षाचं झालं की मगच त्याची कुंडली मांडायचे, तसं लग्न कमीत कमी पाच वर्ष टिकलं कीच मोठा समारंभ. ( इथे तमाम डोळा मारणारे, जीभ बाहेर काढलेले इमोजी , अशी कल्पना कर ) व्होटस अप चा परिणाम.
हे जुनाट विचार नाहीत ह . नाती सुद्धा फॉरमॅट मारून रिफ्रेश करावी लागतात. व्यक्त करावी लागतात. पती पत्नी मध्ये , आधी मन आणि मग शरीरे जुळावी लागतात. आता सिनेमा मध्ये आणि काही वेळा प्रत्यक्षात, शरीरभाषा शिक्ण्याचीच घाई झालेली दिसते, मन वगैरे मागाहून पाहता येईल. आणि तिथेच घोडं पेंड खाते. मनाच्या जुळणीवर भक्कम उभी राहिलेली इमारत खूप वर्ष टिकून राहू शकते. अर्थात अधून मधून प्लास्टर आणि रंगकाम गरजेचं.
तू कौटुंबिक कायदा करायचं म्हणतेस , त्यामुळे तुला या सगळ्याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. बाकी काय? ऑटम चे फोटो पाठव. मी निघाले तेव्हा नुकतीच लाल छटा यायला लागली होती. चल बाय .
लव यू
मम्मा .