STORYMIRROR

Jyoti gosavi

Thriller

4  

Jyoti gosavi

Thriller

मी अनुभवलेले वादळ

मी अनुभवलेले वादळ

2 mins
242

साल 1987 किंवा 88 असावे, मी नुकतेच माझ्या पहिल्या पोस्टिंग साठी दाभोळ येथील आरोग्य केंद्रात हजर झाले होते. आयुष्यात कोकण पहिल्यांदाच बघितले होते. कोकणातील घराप्रमाणे मोठे घर, पुढे बाग बगीच्या, फुलझाडे, पालेभाज्या आणि वेलभाज्या. पाठीमागे नारळी-पोफळीची बाग त्याच्या पाठीमागे खाडी वरती शौचालय. आणि एवढ्या भल्या मोठ्या घरांमध्ये मी एकटी एकुलती एक भाडेकरू. घरमालक आजी-आजोबा कधी मुंबईला, तर कधी या लेकाकडे तर कधी त्या लेकीकडे असे फिरते राहत. वर्षातून चार पाच महिने ते दाभोळ मध्ये असत. बाकीचा काळ मुलांकडे असत.

संध्याकाळी मला पण विरंगुळा म्हणून खाडीच्या काठाला जाऊन उभे राहणे हा माझा छंद होता .त्यावेळी काही माझ्याकडे टीव्ही नव्हता, मोबाईल नव्हते रेडीओ वरती वादळाची काही सूचना दिली असेल तर काय माहित नव्हते पण मी ऐकले नव्हते आणि मी खाडीच्या काठाला सहज म्हणून उभी होते. खाडीच्या त्या टोकावरून दुसऱ्या किनाऱ्यावरून काहीतरी वावटळी सारखे पुढे पुढे येताना बघत होते. परंतु ते वादळ आहे याची मला कल्पना नव्हती. आणि मी आपली सहज कुतुहलाने ते काय आहे म्हणून बघत राहिले. बघता बघता ते या बाजूला काही सेकंदांमध्ये आले आणि वाऱ्याचा इतका मोठा झोत आला की मी जागच्याजागी धडपडले. आणि काहीतरी धोका आहे एवढे मला समजले आणि मी माझ्या रूमकडे पळत सुटले. त्यानंतर खूपच धो-धो पाऊस झाला त्या एवढ्या मोठ्या प्रचंड आवारामध्ये मी एकटीच राहत होते .घर मालक मुंबईला होते म्हणजे आताचा एखादा कॉम्प्लेक्स असावा तेवढा मोठा एरिया होता. त्यानंतर लाईट गेली बाहेर धो धो पाऊस पडत होता. वारे सू सू आवाज करीत होते. जीव मुठीत धरून मी त्या खोलीत रात्रभर राहिले. बाहेर काय काय चालले आहे याची मुळीच कल्पना येत नव्हती आणि सकाळी उठून जेव्हा पाहिले तेव्हा अंगणामध्ये गुडघ्या एवढे पाणी साठलेले .बाहेर जाण्याची पण सोय नाही .आठ दिवस ट्रांसफार्मर जळाल्याने दाभोळ मध्ये लाईटच नव्हती. आठ दिवस मी भुतासारखी रॉकेलचा मोठा टेंबा घेऊन तेथे वावरत होते त्यातच माझ्या दुर्दैवाने मला लूज मोशनचा त्रास सुरू झाला आणि एवढ्या रात्री मी एकटी हातामध्ये तो दिवा घेऊन सर्व झाडे, नारळाची बाग ओलांडून पलीकडे खाडी काठावर असणाऱ्या टॉयलेटमध्ये जात होते. त्यावेळी एवढे माझ्या मध्ये एवढे धारिष्ट्य कुठून आले, माहीत नाही. गावात फेरफटका मारला तर जागोजागी झाडे कोसळलेली, माड आडवे पडलेले ,लाईटचे खांब वाकलेले आणि गावाकडे जरी जावे असा विचार केला तरी घाटावर जाणारे सर्व रस्ते ब्लॉक झालेले होते. इकडे कशेडी घाट, तिकडे कोयनानगरचा  घाट, तिकडे महाबळेश्वरचा रडतोंडीचा घाट सगळीकडे घाट पडलेले होते. कोकणातून घाटाकडे गाड्या, बस, कोणतेच वाहन जात नव्हते. त्यामुळे मला गावी पण जाता येत नव्हते. ते आठ दिवस मी कसे काढले ते माझे मलाच माहीत. आजही मी ते आठ दिवस विसरू शकत नाही. ज्या वर्षी रायगड जिल्ह्यामध्ये जांभूळपाडा गाव वाहीले त्या वर्षीची ही गोष्ट आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller