जीवनसाथी
जीवनसाथी
मांजरगाव एक छोटेसे खेडे आहे. त्या गावात एक चिंतामण नावाचा शेतमजूर रहात होता. हिराबाई त्याची पत्नी होती. दोघेही कष्टाळू होते. अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांना कुटूंबाचा खर्च भागविण्यासाठी दररोज मजूरीने जावे लागायचे. त्यात त्याला गरीबीत तीन अपत्ये झाली होती. दोन मुली आणि एक मुलगा. दोघेही नवरा बायको अशिक्षित होते. पण कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे फार अवघड जायचे. त्यामुळे उसनवारीने पैसे आणून घर चालवावे लागत होते. त्यामुळे मजुरीच्या पैशात पैसे परत जात नव्हते; पण दोघेही नवराबायको व्यवहाराने चोख व इमानदार होते. कुणाचेही पैसे असो ते प्रामाणिकपणे परत करत होते. पण त्याना काही लोकांचे पैसे परत करायला पैसे रहात नव्हते. मुले लहान लहान होती. त्यामुळे ते शिक्षण घेत होते. बाहेर कुठूनही मदत मिळणे अवघड झाले होते. नाईलाजाने त्यांना त्यांची सर्व जमीन गहाण ठेवावी लागली होती. त्यातून त्यानी उसनवारीचे पैसे परत केले होते. कर्ज देऊन झाले होते. आता ते सुखीसंसारात समाधानाने जगत होते. मुली हुशार व बुद्धिमान होत्या. मुलींच्या व मुलाच्या शिक्षणाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांनी दररोजच्या कष्टाची त्यांना जाणीव होती म्हणून मुलांना आपल्यासारखे कष्ट नको असे नेहमी वाटायचे. मुलगाही गुणवान होता. संस्कार व शिस्त कुटुंबात असल्यामुळे घर आणि शाळा याच्या पलीकडे त्यांना बाहेरच्या जगाचे ज्ञान नव्हते. मुलगा नवनाथ सर्वांत लहान होता. गीता सर्वांत मोठी मुलगी होती. मुक्ता गीताच्या पाठची मुलगी होती. हे तिन्ही भावंडे एकत्र आनंदात खेळत असायची. तिघांनाही एकमेकांशिवाय करमत नव्हते. भांडायचे पण गोडही लगेच व्हायचे.
नवनाथला एक दिवस डोक्यात वेदना जाणवू लागल्या. त्याचे सारखे डोके दुखू लागले होते. ते पाहिल्यावर चिंतामणने लगेच त्याला डॉक्टरकडे नेले. शहरात नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे डॉक्टरनी तपासणी केल्यावर त्याला ब्रेन ट्यूमर सांगितला. डोक्यात असलेली गाठ मोठी झाली होती. डॉक्टरांकडून त्याला औषधे लिहून दिले होते. शस्त्रक्रिया करण्यासाठी कमीत कमी पाच लाख खर्च सांगितला होता. चिंतामण व हिराबाईने विचार करून गहाण असलेले वावर (जमीन) सहा लाखाला विकली. पैशापेक्षा पोराचा जीव महत्त्वाचा म्हणून त्यानी वावर विकले. पाच लाख मिळाले होते. शस्त्रक्रिया करताना त्याची जगण्याची हमी डॉक्टरानी दिली नव्हती. पण एक पोटचा गोळा म्हणून त्यालाही त्यानी होकार दिला होता. शस्त्रक्रिया चालू झाली ;पण पाहिजे तसा प्रतिसाद त्या आजारामुळे झाला नाही. शेवटी नवनाथचा त्यात मृत्यू झाला. सगळे कुटुंब शोकाकूल झाले. आईवडिलांचा पोटचा गोळा गेला. त्यामुळे एकत्र सहवासातील दिवसांच्या आठवणीने दोघी बहिणी व आईवडिल सारखे रडायचे. घर खाली खाली वाटायचे. गावातील ज्येष्ठ लोकांनी त्यांना जगण्याचा दिलासा दिला होता. गेलेले माणूस परत येत नाही. तुमचे प्रयत्न कुठे कमी पडले नाही; पण असे करता करता वर्ष दोन वर्षे गेली. मुली लग्नाला आल्या होत्या. शालेय शिक्षण पूर्ण करून त्या मुलीही संसाराला हातभार लावत होत्या. थोड्याच दिवसात दोन्ही मुलींची त्यांनी गरीबीच्या मानाने लग्न करून दिली. दोघीही सुखात नांदत होत्या. आता आईवडिलांना आपल्याशिवाय कोणी नाही याची जाणीव त्यांना होती.
एक दिवस मुलाचा विरह व दु:ख सहन न झाल्यामुळे हिराबाईला हृदयाचा झटका आला व त्यातच तिचा अंत झाला. चिंतामणची जीवनसाथी कायमची सोडून गेली होती. त्यामुळे तो घरात मोठमोठ्याने रडत होता. ह्क्काचे माणूस गेले होते. दोनवेळच्या जेवणाची कठीण परिस्थिती त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती. त्याला आता जगण्याची आशा उरली नव्हती; पण मुलींनी आम्ही आहोत. आता तुम्ही आमच्या सोबत रहा. जावई अगदी मुलासारखे होते त्यांनी आम्ही तुमची दोन मुलेच समजा, असे सांगितले होते. त्यामुळे त्यांना जगण्यात एक आशा वाटू लागली होती. ते मुलींच्या घरी राहू लागले होते. मुली त्यांची योग्य निगा राखत होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत होत्या. चिंतामण दोन्हीही मुलींकडे रहात होते येत जात होते. त्यांच्या जीवनातील दु:ख हलके झाले होते. शरीर थकले असल्यामुळे त्यांना चालवत नव्हते. उठवत नव्हते. अशावेळी मुली अंघोळ घालत होत्या. वेळच्या वेळी जी, जी औषधे लागत होते ते वेळेवर पुरवत होत्या.
एक दिवस त्याना लकवा मारला. सर्व जागेवरच चालले. ते उठूही शकत नव्हते. बोलूही शकत नव्हते. त्यावेळी डॉक्टरला घरी बोलावले होते. डॉक्टरांनी घरीच सेवा करा म्हणून सांगितले होते. ते फार दिवसाचे सोबती नाही. त्यांच्या जगण्याची आशा उरली नव्हती. शरीर प्रतिसाद देत नव्हते. काही दिवस त्यानी अन्न घेणे बंद केले होते. गीता चमच्याने दूध पाजत होती. पाणी पाजत होती. सर्व काही मुली त्यांची सेवा करत होत्या. पण एक दिवस त्यांचे निधन झाले. मुलींनी दादा, दादा म्हणून हंबरडा फोडला होता. पण जास्त वेळ वाया न घालवता चिंतामणच्या मुलींनी व जावयांनी त्यांच्यावर त्यांच्या गावीच अंत्यविधी केला. मुलाचे सर्व काही कर्तव्य मुलींनी जबाबदारीने पार पाडले होते.
