MEENAKSHEE P NAGRALE

Abstract Inspirational Others

2  

MEENAKSHEE P NAGRALE

Abstract Inspirational Others

जीवनाचा वेध घेताना

जीवनाचा वेध घेताना

4 mins
157


       जो माणूस जीवनात संघर्ष करतो. तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात खूप संघर्ष केला म्हणून ते यशस्वी व्यक्ती ठरले. सांगली जिल्ह्यातले कवी नवनाथ रणखांबे यांचा जीवन प्रवास हाच एक जीवन संघर्ष आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या शिकवणी पासून प्रेरणा घेऊन तथागत बुद्धांच्या समतामूलक अष्टांग मार्गाने प्रेरित होऊन, अन्यायमूलक व्यवस्थेशी संघर्ष करत, शोषणमुक्त, भयमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देते आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अहंकाराला मूठमाती देतो. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे अतिशय सुंदर, गरुड भरारी घेणाऱ्या गरुड पक्षाचे आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शारदा प्रकाशन ठाणे यांनी केले असून प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर शहाजी कांबळे यांची लाभली आहे. प्राध्यापक दामोदर मोरे सरांनी पाठराखण केली असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ८० रुपये आहे पण यातल्या सर्वच कविता जीवनाचा वेध घेणाऱ्या आहेत.


     कवी नवनाथ रणखांबे सरांचे जीवन अतिशय संघर्षमय झाले असून त्यांचे वडील बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेले असल्याने शैक्षणिक वाटचालीत बारकाईने लक्ष दिले. घरात शैक्षणिक वातावरण निर्माण केले. पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी मोलमजुरी केली आणि ज्ञानाची भूक भागविण्यासाठी थोरामोठ्यांची पुस्तके वाचून घेतली. चरित्रे सांगून मुलांसमोर विचारवंताचा आदर्श ठेवला आणि मुलांना प्रोत्साहन देत गेले. आज वाढत्या तंत्रज्ञानाच्या या ग्लोबल दुनियेत आजची मुले पुस्तके हाताळताना दिसत नाहीत. सतत हातात स्मार्टफोन घेऊन रात्रंदिवस गेम खेळताना दिसतात. परिस्थिती कशीही असो त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे. कवी नवनाथ रणखांबे यांच्या काव्यसंग्रहातून हेच दिसून येते.


       माय तुला मी पाहिलंय...

       माय तुला मी पाहिलंय... 

       अन्यायांनी पेटलेल्या 

       गेहिच्या परक्यांनी

       तुझ्या गेहाला बेघर केलंय

       अन उसवलं घरदार 

       आभाळ फाटले....

       माय तुला मी पाहिलंय.... माझ्या स्मृतीने...


       वरील ओळीतून कभी नवनाथ रणखांबे यांनी त्यांच्या आईचा जीवनसंघर्ष स्वतः पाहिला आहे. अनुभवला आहे.कवीने अन्यायाविरुद्ध त्यांची आई लढताना पाहिले आहे. घराचे वेगळे होताना... आभाळ फाटताना, वेदना होताना पाहीलंय. कवीच्या आजींनी जमीन गहाण ठेवलेली आईने संघर्ष करून सोडवून घेतली. वेळ प्रसंगीमोलमजुरी केली. कष्टातून स्वप्ने फुलवली. अन्यायाला जाळण्यासाठी कवीला वकील केले. संघर्षमय प्रवास कवी आपल्या लेखणीने शब्दबद्ध करतो कवितेच्या रूपात... इतरांनीही प्रेरणा घेण्यासाठी.. माय तुला मी पाहिलंय याकवितेतून संवेदनशील मनाचा कवी व्यक्त होतो.

     कवी नवनाथ रणखांबे सरांच्या सर्वच कविता मुक्तछंदातल्या असल्या तरी इतरांना प्रेरणा देणार्‍या, न्याय व हक्काने दाद मागणाऱ्या आहेत.वास्तवाचे दर्शन घडवणा-या आहेत. संघर्षमय जीवनाची वेदना मांडणा-या आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठणा-या या कविता दिसून येतात.

    

     वाढल्या अडचणी , ढळलेला तोल 

      बिघडला क्रम, अवर्षण गोल

      सजीवांना जीवन संघर्ष संकटे 

      अडचणीने आवळला फास जगण्याचा 

      तारांबळ उडाली जिवांच्या जगण्याची....!!


    मानवाच्या अतिस्वार्थी वृत्तीमुळे आज जंगलाचा ऱ्हास होतोय. मोठमोठी जंगले संपुष्टात येत आहेत. कित्तेक वृक्ष तोडून तिथे सिमेंट काँक्रीटच्या टोलेजंग इमारती होत आहेत.त्यामुळे निसर्गाचे चक्र पार बदलून गेले आहे. समतोल ढळला आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या. अवर्षणाचा सामना मानवाला आज करावा लागत आहे. प्रत्येक सजीवाचे जीवन संकटात सापडले आहे. वन्यप्राणी जीवन नष्ट होत चालले आहे. सजीवांना संघर्ष करावा लागत आहे. वन्य पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशी आर्त हाक पेशाने वकील असणाऱ्या पण संवेदनशील मनाच्या कवीने आपल्या काव्यातून मुर्दाड मने झालेल्या माणसांना देतो आहे.


         बा माझा ओरडला 

         लेका आज पासून तुझी

         शिक्षण हीच आई 

         करियर हाच बा

         मुंबई हीच पंढरी

         परत आला माघारी

         तर तंगड तोडीन

         करिअर करून आल्यावर 

          पारावर तुझा बॅनर लावीन

          चावडीवर सत्कार ठेवीन

          वाजत-गाजत मिरवणूक काढीन...


     वरील ओळींमधून नवनाथ रणखांबे यांच्या वडिलांचे त्यांच्या शिक्षणावर असलेले बारीक लक्ष दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे कवीचे वडीलही कवीला खडसावून सांगतात की शिक्षण ही तुझी आई आणि करियर हा तुझा बा तू मुंबईला जा परत माघारी येऊ नकोस. परत घरी आलास तर तंगड म्हणजे पाय तोडून टाकीन आणि करियर करून आलास तर गावच्या पारावर तुझा बॅनर लावीन. चावडीवर सत्कार करीन. वाजत गाजत तुझी मिरवणूक काढीन. कष्टकरी बाप आपल्या लेकराला योग्य वयात योग्य दिशा दाखवतो. वेळ प्रसंगी घरातून काढून देतो. केवळ आपल्या मुलाने करिअर करून स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून. समाजात ताठ मानेनं जगावं अशी ज्या बापाची तळमळ होती त्याचा लेक आज शिकून वकील झाला आहे. ही अभिमानास्पद बाब वाखाणण्याजोगी आहे.


      कवी नवनाथ रणखांबे यांच्या प्रत्येक कवितेतून संघर्ष दिसून येतो. त्यांची कविता पान सुपार्‍या खाऊन टपऱ्यांवर थांबणाऱ्या, मोटरसायकलवरून इकडून तिकडे बोंबलत फिरणाऱ्या तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या आहेत. जगायला शिकवणाऱ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, माय बापाचं ऋण व्यक्त करणाऱ्या, विषमतेची दरी बाजूला सारणाऱ्या, मानवतेला पोसणाऱ्या, उपाशी पोटाची व्यथा मांडणाऱ्या, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवणाऱ्या, जातीचे मळभ दूर लोटणाऱ्या, माणसाला माणसाशी माणसासारखं जगायला शिकवणाऱ्या, आत्मीयतेचा शोध घेणाऱ्या, माणसाला शहाणपण शिकवणाऱ्या, अन्यायावर प्रहार करणाऱ्या, लेखणीच्या धारदार शस्त्राने प्रहार करणाऱ्या, जीवनाचा वेध घेणाऱ्या एकूण ४६ कविता जीवन संघर्ष करायला शिकवणाऱ्या आहेत. सर्वांनी आवर्जून वाचाव्यात अशाच आहे.

        कवी नवनाथ रणखांबे सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract