Pandit Warade

Thriller Others

3  

Pandit Warade

Thriller Others

झपाटलेले घर - भाग-५

झपाटलेले घर - भाग-५

6 mins
214


   मालती बाई गेल्यानंतर शामरावांनी बहीण गंगूबाईला तिच्या एकुलत्या एक मुलासह लामण गावला आणले. तिचा मुलगा सुजीत हा राधिके पेक्षा पाच वर्षांनी मोठा होता, पण उशिरा शाळेत घातल्यामुळे आणि दोन वेळेस नापास झाल्या मुळे इथे त्याला राधिके सोबत एकाच वर्गात शिकायला घातले गेले. एकमेकांच्या संगतीने त्यांचे शिक्षण सुरू झाले. दोघेही सोबतच वर्गपाठ व गृहपाठ करू लागले.


    त्या काळी गावातल्या शाळेतले प्राथमिक शिक्षण असे तसेच असायचे. या मुलांना साधी अक्षर ओळख झाली तरी पुरे एवढीच अपेक्षा ठेवली जायची. माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांची खरी हुशारी कळायला लागायची. सुजीत आणि राधिकेच्या जोडीचेही तेच झाले. राधिका हुशार अन तेजस्वी निघाली. खूप प्रयत्न करून, खूप अभ्यास करूनही सुजीतचे डोके अभ्यासात फारसे रमत नव्हते. खेळण्यात मात्र तो अतिशय चपळ होता. कबड्डी, खो खो, हुतुतू, आट्यापाट्या इ. सर्व खेळांमध्ये तो सर्वात अग्रेसर असायचा. राधिका अभ्यासात हुशार तर सुजीत खेळात हुशार. दोघेही शाळेत आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध झाले होते. सुजीतच्या टीमने अनेक स्पर्धांमधून पुरस्कार आणि पदकं पटकावली होती.


   खेळण्या बागडण्यात बालपण चालले होते. राधिका आता तेरा चौदा वर्षाची झाली होती. तिला आता बऱ्यापैकी समज यायला लागली होती. आताशा तिच्या वागण्यात स्त्रीसुलभ अशी लज्जा दिसायला लागली होती. त्यातच तिच्या बरोबरीच्या मैत्रिणी तिला सुजीतच्या नात्यातून चिडवायच्या. "तुझं काय बाई, अभ्यासातही हुशार आहेस, आणि नवरा शोधायला कुठे जायचीही गरज नाही. सुजीत सारखा सुंदर मुलगा शोधून आणला आहे आबांनी." तिच्या मैत्रिणींनी असे म्हटले की ती चिडायची, मात्र आतून तिला गुदगुल्याही व्हायच्या. "मी नाही जा" म्हणत ती लाजून दूर दूर निघून जायची. मैत्रिणींना मजा वाटायची, त्यांचे मनोरंजन व्हायचे. सुजीतचे मित्रही म्हणायचे, "जाऊ दे रे. कशाला अभ्यासाचे टेन्शन घेतोस इतके? शिकून कुठे तुला नोकरी करायची की छोकरी बघायची? नोकरीची गरज नाही आणि छोकरी अगोदरच मिळाली आहे."


   राधिका वर्गात अतिशय हुशार असल्यामुळे गणिताचे मास्तर कुण्या विद्यार्थ्यांची गणितात चूक झाल्यास तिला त्याच्या तोंडात मारायला लावायचे. कधी कधी तर तिला सुजीतच्याही तोंडात मारावे लागायचे. त्याला मारतांना मात्र तिला खूप लाजायला व्हायचे, ती त्याला हळूच मारल्या सारखे करायची. ती नजरेनेच त्याची क्षमा मागायची अन जागेवर येऊन बसायची. सुरुवाती सुरुवातीला तिला यात मजा वाटायची. ती ऐटीत जाऊन तोंडात मारायची. पुरस्कार मिळाल्यासारखे समाधान मिळायचे तिला. पण वर्षभरातच ती कंटाळली. तिला आता मुलांची भीतीही वाटू लागली होती. 'शाळेत आहे तोवर आहे गुरुजींचे पाठबळ. मात्र शाळा सुटल्यावर काय?' असे तिच्या मनात यायचे. पण आबांच्या दराऱ्यामुळे ती पुन्हा बिनधास्त व्हायची. 


   आबांचे विरोधक रामराव (बापू) यांचा मुलगा रमेश सुद्धा तिच्याच वर्गात होता. एक दिवस कधी नव्हे तो त्याचेही गणित चुकले. नेहमी प्रमाणे राधिकेने बरोबर उत्तर दिल्यामुळे गुरुजींनी तिला त्याच्या तोंडात मारायची आज्ञा केली. ती त्याच्या जवळ गेली, मात्र त्याच्या डोळ्यात दिसलेल्या क्रोधा मुळे तोंडात मारायला तिचे मन धजावत नव्हते. गुरुजींनी पुन्हा आठवण करून दिली तोंडात मारायची. तिने मारलेही. पण तिला ती स्वतःसाठी शिक्षाच वाटली. शाळा सुटल्यावर घरी जातांना रमेशने तिला रस्त्यात अडवून तिचा हात धरला. ती घाबरली. मदती साठी ती इकडे तिकडे पाहू लागली. एवढ्यात तिथे सुजीत आला. त्याने रमेशला चांगला बुकलून काढला. तिथून रमेशने रागातच काढता पाय घेतला. सुजीत आणि राधिका दोघे घरी निघाले. या घटनेने नकळत दोन गोष्टी घडल्या. एक तर आबा आणि बापूंच्या शीत युद्धात ठिणगी पडली. दुसरीकडे राधिका आणि सुजीतच्या हृदयात प्रेमाचा अंकुर फुटायला लागला. दोघेही एकमेकांकडे चोरट्या नजरेने पहातच घरी गेले. या घटनेची चुकूनही वाच्यता करायची नाही असे मनोमन दोघांनीही ठरवले असावे, घरी गेल्यावर कुणी काहीच बोलले नाही. जसे काही घडलेच नाही. 


   निसर्ग आपले काम निमूटपणे करत होता. ठिणगीचे रूपांतर कधी वणव्यात होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुका दोन वर्षावर आल्या होत्या परंतु बापू आतापासून तयारीला लागले होते. सुजीत आणि राधिका आता दहावी मध्ये शिकत होते. त्यांच्यातल्या प्रेमाचा अंकुर आता रोपट्यात रूपांतरित होत होता. राधिका आता जास्तीत जास्त वेळ काढून सुजीतच्या अवती भोवती घुटमळू लागली. शाळेतून आल्यावर सुजीतला शेतात जाऊन गुराढोरांचे चारापाणी करावे लागायचे. तो दप्तर टाकून शेतात जायचा. राधिकाही काही तरी निमित्त काढून शेतात जाऊ लागली. येतांना सरपणाचा भारा घेऊन येऊ लागली. तिच्या सहवासात सुजीतही आता रमू लागला होता. तिच्या मुळे त्याचा अभ्यासही चांगला होऊ लागला होता. अभ्यासात मन लागायला लागले. अभ्यास सुरू असतांना राधिका मात्र त्याच्या बरोबरच्या संसार सुखाचे स्वप्ने रंगवू लागली. गंगू बाईच्या नजरेतून त्यांच्यातला हा बदल सुटला नाही. त्यांनी मुले शाळेत गेल्यावर शामरावां जवळ विषय काढायचे मनाशीच ठरवले.


   एक दिवस शामराव बाहेरून काही तरी काम आटोपून आले होते. ते सोफ्यात बसले तसे गंगुबाईने पाण्याचा ग्लास आणि चहाचा कप आणला. टीपॉय वर ठेवून ती हळूच बाजूच्या चटईवर बसली.


   "आबा, एक गोष्ट बोलायची होती, वेळ आहे का?" तिने भीत भीतच विषय काढला. 


    "बोल! काय म्हणतेस?" आबांनी विचारले. 


    "मुले आता मोठी झालीत."


    "मग?" करारी मुद्रेने आबांनी प्रश्न केला. 


    मात्र आबांच्या करारी आवाजाने ती जरा ओशाळल्या गत झाली. भीत भीतच म्हणाली, "त्यांच्या लग्नाचा विचार करायला हवा आता."


    "मलाही तेच वाटते. परंतु राधिका लहानच आहे अजून. तिला किमान बारावी पर्यंत तरी शिकवावं असं मला वाटतं." आबांनी मनातला विचार बोलून दाखवला.


   "जशी तुमची मर्जी. योग्य तेच कराल, अशी अपेक्षा करते" म्हणत ती मधले घरात शिरली. आबा थोडावेळ पेपर वाचत बसले. पेपर वाचता वाचता तसेच सोफ्यावरच डोळे मिटून पडले. बऱ्याच वेळाने गंगुबाई किचन मधून बाहेर आली. आबांना अशा अवघडलेल्या स्थितीत झोपलेले पाहून हळू आवाजात आवाज देऊ लागली,


   "आबा, पलंगावर तरी पडायचं होतं."


    तिच्या प्रेमळ आणि काळजी युक्त स्वराने आबांना जाग आली. आळस देत ते उठले. बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाले आणि पुन्हा सोफ्यावर बसले. 


    "चहा ठेऊ का?" गंगूच्या या प्रश्नावर त्यांनी मानेनेच होकार दिला. गंगूने पाण्याचा ग्लास आणून ठेवला आणि चहा करायला आत गेली. शामरावांनी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला तशी त्यांची नजर समोरच्या मालती बाईंच्या फोटोकडे गेली. ते उठले, हळूच फोटो समोर उभे राहिले. 


   'बघितलं मालती, आपली राधिका एवढी मोठी झाली हे मला समजलंच नाही. तिचे लग्न करावे अस गंगू म्हणत होती. तूच सांग तिला दूर करून मी कसा जगू शकेन? तू गेल्यापासून मी अगदी एकटा पडलो गं. केवळ राधिकेच्या प्रेमामुळे मी जिवंत आहे. तिच्या साठी जगतो आहे. तिला मी माझ्या नजरे समोरून दूर नाही करू शकत मालती. तुला वाटतं का तिचं लग्न करावं एवढ्या लवकर? मला वाटतं तिला बारावी पर्यंत शिकवावं, एखादी तोलामोलाची, श्रीमंत, वैभवशाली, धनाढ्य, गडगंज संपत्ती असलेली असामी बघावी. हे सारे वैभव सांभाळण्या साठी एखादा राजबिंडा, सुशिक्षित घरजावईच आणावा. मी गेल्यावर कोण सांभाळेल या साऱ्या इस्टेटीला?' त्यांना मालती बाई फोटोत हसत असल्या सारख्या दिसल्या. तेवढ्यात.....


    "आबा, चहा घ्या." म्हणत गंगूने चहाचा कप टीपॉयवर ठेवला. आणि तीसुद्धा मालतीबाईच्या फोटोकडे बघायला लागली. आबांनी हळूच स्वतःचे डोळे पुसले, बेसिनमध्ये तोंडावर पाणी मारून तोंड धुतले आणि टॉवेलने पुसत सोफ्यावर येऊन बसले. चहा घेतला. खांद्यावर उपरणे टाकून बाहेर निघून गेले. गंगू मालती बाईच्या फोटोसमोर उभी राहून बोलायला लागली. 


   "वहिनी, बघितलं राधिका किती मोठी आणि हुशार झाली ते? मात्र आबाला ती अजूनही लहानच वाटते आहे. मला वाटतं तिचं लवकरच लग्न करून टाकावं. वहिनी, तुमचा लाडका भाचा, सुजीत जावई म्हणून आवडेल तुम्हाला? मला तर दोघांचा जोडा लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटतो बघा. आबांच्या पुढं मी नाही बोलू शकत. त्यांना बहुतेक आवडत नाहीय तो जावई म्हणून. वहिनी, तुम्ही सांगाल आबांना? ते ऐकतील तुमचं, जरूर ऐकतील." असे म्हणत गंगू फोटो कडे न्याहाळून बघू लागली. मालतीबाईचा चेहरा जरासा हिरमुसल्या सारखा दिसला. जणू त्या सांगत असाव्यात,


   'गंगुबाई, अहो, माझं कधी ऐकलं त्यांनी म्हणून आता ऐकतील? अहो गरीब दुबळ्यांच्या जमिनी हडप केल्या तेव्हा मी किती विनवून सांगत होते. असं करू नका म्हणून. कुठं ऐकलं माझं? आता त्यांचे तळतळाट भोगावेच लागतील. गंगुबाई तुम्हाला सांगते तुमच्या मनातली गोष्ट मला खूप आवडली. परंतु त्यांना नाही आवडणार. ते तोलामोलाचं स्थळ बघत फिरतील. *काखेत कळसा आणि गावाला वळसा* असं होईल त्यांना. घरात असलेला हिरा सोडून गारगोटी शोधायला बाहेर फिरतील ते. गंगुबाई, आता केवळ राधिकेच्या नशिबात असेल तरच कदाचित सुजित आवडू शकेल त्यांना. पुढचं कुणी काय बघितलं? तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.' गंगू मालतीबाईच्या फोटो समोर खूप वेळ उभी होती. सुजीत आणि राधिकेचा बाहेर आवाज आला म्हणून तिने पटकन स्वतःला सावरले. ती झाडू घेऊन हॉल स्वच्छ करायला लागली. ते दोघे घरात आले दप्तर ठेवले आणि एकामागे एक शेताकडे निघाले. गंगू त्यांना असं हसत खिदळत जातांना दूरपर्यंत पहात राहिली.  

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller