हसरी सकाळ
हसरी सकाळ
हसरी सकाळ मित्रांनो...
आपण बोलताना घाईघाइने काहीतरी बोलून जातो पण समोरच्यावर ह्याचा काय परिणाम होत असेल ह्याचा कधी विचार केला आहेत का???
नाही ना ..मग आज करा.
माझी वहिनी मनाने अतिशय चांगली पण काहीही दिसले किंवा सांगायचे असेल तर इतकी घाई करेल की काही विचारू नका.
भाऊ आणि त्याचा मुलगा दोघेही क्रिकेट वेडे ,मॅच असली की तर टीव्ही ला नाक लावून बसलेले.त्यांची चर्चा चालायची, भज्जी ने विकेट घेतली,भज्जी ने आज बॉलिंग चांगली टाकली.वगैरे....ही ते ऐकायची ,एकदा कोणती तरी महत्वाची मॅच चालू होती समोरची टीम फटक्यांवर फटके मारत होती ,त्यामुळे वैतागून हे दोघे गॅलरीत जाऊन उभे राहिले,ही तेवढयात बेडरूम मध्ये आली ,
आणि अचानक ,"आहो ,लवकर या हब्बी ने विकेट घेतली ," असे ओरडायला लागली.झाले असे की हरभजन चे भज्जीच्या ऐवजी ही हब्बी ओरडली......भावाने क्रिकेट सोडून कॅरम सुरू केला ..
तिचे माझ्या वर जरा जास्त प्रेम आहे.मी काहीही केले की ती खूप खूश होऊन कौतुक करत राहते.एकदा आम्ही गप्पा मारत बसलो होतो ,त्यावेळी ती ,"ताई तू खरंच आमच्या साठी खूप करतेस.तू आमचा एक तारी खंबु आहेस." असे म्हंटल्यावर आम्ही सगळे एक मिनिट शांत झालो.मग कळले की तिला असे म्हणायचे होते.तू आमचा एक खांबी तंबू आहेस..........
पुण्यातली लोक सकाळ झाली की टेकडी वर फिरायला जातात आणि फिरताना भारद्वाज दिसला की ह्यांचा जन्म धन्य होतो.भाऊ आणि वहिनी पुणेकरच.त्यामुळे रोज सकाळी फिरायला जायचे हिला काही भारद्वाज दिसत नव्हता त्यामुळे जरा वाईटच वाटत होते .पण अचानक भाऊ चालत पुढे गेला आणि हिला भारद्वाज दिसला ,"अहो लवकर या इकडे बघा राजाध्यक्ष आहे ." तिच्या उत्साहात त्या दिवशी किमान पाच सहा तरी राजाध्यक्ष सहभागी झाले.सकाळ सकाळ एक सुंदर बाई आपल्याला बघून आनंदित झाली हे कोणाला नाही आवडणार हो..
भावाने दुसऱ्या दिवशी पासून टेकडी बदलली.
हे सगळे मी जेव्हा पुण्याला गेले होते तेव्हा त्याने मला आणि बहिणीला सांगितले .आम्ही यथेच्छ टिंगल करून खूप हसूनही घेतले.मी मुंबईला परत आले आणि माझे कामकाज सुरू झाले .एकदा मला एक फोन आला "हॅलो ,मी भारद्वाज बोलतो आहे , मला जरा investment बद्दल तुमच्याशी बोलायचे आहे.पुण्याचा प्रकार आठवल्यामुळे मी त्यांना म्हंटले ,"जरा कामात आहे अर्ध्यातासात फोन करते".भावाला फोन केला परत मनसोक्त हसलो आणि मग एकदम गंभीर होऊन फोन लावला,"हॅलो कोण राजाध्यक्ष का???
तो माणूस बिचारा वेडा झाला ,म्हणाला नाही मी भारद्वाज आता मी तुम्हाला फोन केला होता.... पडणारा फोन हातात घेऊन मी किती वेळ उभी होते मलाच नाही माहित..
