Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

गोविंद ठोंबरे

Abstract Inspirational


2  

गोविंद ठोंबरे

Abstract Inspirational


चिंतन

चिंतन

3 mins 148 3 mins 148

कोणाला मंदिर हवं आहे, कोणाला मस्जिद, कोणाला गुरुद्वारा तर कोणाला विहार... आपापल्या मनातल्या पोकळीत गुंतलेल्या सुख-दुःखांना शोधत आत्मिक समाधान देण्यासाठी, आपापल्या संस्कृतीला, धर्माला अविरत तेवत ठेवण्यासाठी किंवा मग जन्मतः मिळालेल्या संस्कारांचा वारसा जपण्यासाठी! सध्याच्या घडीला वर्तमानातील माणसास ज्याच्या त्याच्या सभोवतालच्या ज्ञान संस्कारांनी घडवलं आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती ही जन्मतः मिळालेल्या ज्ञान संस्करांनी, कौटुंबिक वारस्यानेच मिळालेली आहे. काही लोक यात अपवादही असतील... या नवयुगात आपापली संस्कृती आणि धर्म जतन करत इतरांच्या संस्कृतीवर आणि धर्मावर बोट ठेवणारी विचारसरणी देखील उत्तरोत्तर फोफावत चालली आहे. आपल्या धर्म संस्कृतीचं वर्चस्व उभा करण्यासाठी इतरांच्या धर्म संस्कृतीचा, त्यांच्या अस्तित्वाचा आपण विचार करणं कदाचित सोडलेलं आहे. धर्म परिवर्तित काही समाज बांधवांना देखील या गोष्टींचा जरासा देखील विचार येत नाही हे सुद्धा तितकंच खरं! 


एका धर्मातून दुसऱ्या धर्मात परिवर्तित होणं आणि त्या धर्माचा आत्मीय स्वीकार करणं हा ज्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे. एका पिढीने धर्म त्याग करत दुसरा कोणता धर्म अंगिकारणे आणि तो धर्म आपल्या भविष्यातील पिढीला वारसा हक्काने देताना खूप जबाबदारीने पाहणे हे तितकेच गरजेचे आहे. धर्म संस्कृतीमुळे कोण्या एखाद्या पिढीला, जमातीला यातना, दुःख भोगावं लागलंही असेल किंबहुना भोगलेलं आहेच... अशा समूळ पिढीने तो धर्म त्याग करत इतर त्यांना उचित वाटणारा धर्म स्वीकारणे, त्यात वाईट काहीच नाही. न मिळालेल्या हक्कांमुळे, अधिकारांमुळे हे तत्वतः योग्य आहेच! परंतु त्याग केलेल्या धर्माचा मूळ इतिहास, मूळ संस्कृती, त्याचा आत्मा अगदीच वाईट आहे हे डोळे झाकून बोलणे, आत्मविश्वासाने सांगणे हे देखील कधीकधी अयोग्य वाटायला लागतं... एखादा धर्म तितकासा वाईट असता तर कदाचित त्या त्या धर्म संस्कृतीचा वारसा हा पुढे वाढलाच नसता, हे समजून घेण्यास आपण कुठेतरी कमी पडत आहोत हे नक्कीच वाटतं.


बऱ्याच अंशी बऱ्याच धर्मातील समाज घटकांना त्यांच्या भूतकाळातील वर्चस्व असणाऱ्या समाज पिढीने बरेच समज, गैरसमज मुद्दाम दिलेले आहेत. त्यामागे त्यांच्या वर्चस्वाची कहाणी इतिहासात दडलेली आहे. त्यांनी दिलेलं, पसरवलेलं भ्रमिक ज्ञान ही त्यांच्यासाठी त्यांच्या वर्चस्वाची आणि त्यांच्या अस्तित्वाची भेदक कहाणी आहे. अज्ञानी,दिन असणाऱ्या घटकांना मूळ धर्म आत्म्याचा गंध न लागू देता लादलेली संहिता आहे. पिढी दर पिढी त्यांना पोषक असणारं भ्रमिक,चमत्कार सदृश्य ज्ञान दाखवण्यात त्यांची चतुराई दडलेली आहे. चमत्कार आणि खऱ्या संस्कृती ज्ञानाचा साक्षात्कार यातला फरक त्यांनी समजू दिला नाही. तरीही त्या त्या धर्माचा मूळ आत्मा निर्मळ झऱ्यासारखा वाहत असल्यानेच तो धर्म अजूनही चिरकाल तसाच प्रवास करत आहे. पुढील काही ज्ञानी, चतुर पिढीने त्याची पोलखोल नक्कीच केली देखील आहे. धर्म संस्कृती मूलतः समाज घटकांना एकत्र समान रेषेत ठेवण्यासाठी आणि त्या समाजाला पोषक संस्कृती देण्यासाठीच घडवलेली असते किंवा ती अनपेक्षितपणे मोठ्या कालखंडात घडत जाते. त्यामुळे त्या धर्म संस्कृतीचा मूळ गाभा, इतिहास अभ्यासाचा आणि चिंतनाचा भाग आहे. 


धर्म आचरण ही जगण्याची पद्धत आहे.धर्माच्या मार्गाने आत्मीय समाधान शोधणं हा मूळ संस्कार आहे. धर्म आणि जातीतील भेदभाव हे तर मानव जातीतील वैचारिक गुण आहेत. ते माणसाच्या विचार सरणीच्या कक्षेतील पैदासी किडे आहेत. भेदभाव हा कुठल्याच धर्म संस्कृतीने शिकवलेला अध्याय मात्र नक्कीच नाही. आत्मीय समाधान हा एकमेव भाव धर्म संस्कृतीच्या आचरणाचा मूळ गाभा वाटतो. सर्व जाती धर्मातील मानव जातीच्या भौतिक गरजा एकच आहेत. त्या गरजांची पूर्तता करण्याची पद्धत आणि कार्य प्रणाली एकच आहे. फक्त आत्मीय समाधान मिळवण्याची धर्म संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे कुठल्याही धर्म संस्कृतीचा तिरस्कार करत आपली धर्म संस्कृती किती योग्य आहे हे पटवून सांगण्यात आपण आपला खरा आत्मा गमावून बसू.


प्रत्येक राष्ट्राची कायद्यान्वये संविधानिक पद्धत आहे. त्याने कदाचित काही कालखंडाने जातीय तेढ नक्कीच मिटू शकेल. समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा मौलिक अधिकार मिळेल. धार्मिक संस्कृती ही कुठल्याच प्रत्यक्षदर्शी कायद्याच्या बंधन कोशात नसते. ती वैचारिक, चिकित्सक बुद्धीच्या कोशात सामावलेली असते. त्या त्या संस्कृतीचा अभ्यास आणि चिंतन हीच मानवी जीवनाच्या सामंजस्याची आणि फलिताची कहाणी ठरते. त्यामुळे भूतकाळात झालेल्या अन्यायाचा द्वेष पुढील पिढीमध्ये पेरणे हा आपण त्या पुढील पिढीवर केलेला अन्यायच आहे. तसेच आपण स्वीकारलेल्या धर्माचा अपमान देखील आहे. आपल्या धर्म संस्कृतीचा खरा आत्मा चिंतनात दडलेला आहे. जीवन पद्धतीला न्याय देत, भ्रामक कल्पनांचा ऱ्हास करत एकमेकांच्या धर्म संस्कृतीचा आदर करणे किंवा अभ्यास नसलेल्या धर्म संस्कृतीवर बोट न ठेवता आपली आचरण पद्धत सुयोग्यरित्या पुढे घेऊन जाणेच योग्य ठरेल.


Rate this content
Log in

More marathi story from गोविंद ठोंबरे

Similar marathi story from Abstract