गोविंद ठोंबरे

Others

5.0  

गोविंद ठोंबरे

Others

अनोखे प्रेम!

अनोखे प्रेम!

5 mins
1.1K


प्रेम...!हा शब्द खरा तर अनोखा नाहीये. या शब्दात आहे आपुलकी,जिव्हाळा,मायेचं गुंफलेलं अतूट असं नातं. प्रेमाचा वेडा गंध प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दरवळतो.दरवळलेला गंध कितीसा काळ त्याच्या आयुष्यात उरतो हे मात्र भाकीत कोणाला कळणार नाही. तरीही प्रेमाने बांधलेली नाती टिकवणं हा ज्याचा त्याचा स्वभावी गुणधर्म! प्रेम आणि प्रेमात चिंब होणारी नाती खरंतर सौभाग्यपूर्णच म्हणावी लागतील.प्रेमाने मिठीत पाझरणारी नाती साधी,सरळ,निर्मळ आणि सोज्वळ वाटायला लागतात.त्या नात्यांना असतं त्यांचंच बहरलेलं विश्व!त्या विश्वात ती असतात सदैव रमलेली,विसावलेली,बागडलेली. काही-काही नाती मग त्यातही अनोखी अशी वाटायला लागतात.अनोखी प्रेम नाती?हो,अनोखी प्रेम नातीच!अनोख्या प्रेमाचा प्रत्यय कसा येतो मग?या साऱ्या प्रेमळ नात्यांच्या विश्वात मग काही नाती त्यातल्या त्यातही अनोखी का वाटायला लागतात? आहे ना गंमत! विचार करून पहायला हवाय एकदा,थोडासा! 

   एखादी स्त्री तिच्या संसारात अगदी सुखी-समाधानी आहे,पतीदेवांची माया पांघरून अगदी ती फुलपाखरू होऊन सुखाची निशा चाखत आहे आणि पती-पत्नी या दोघांमधील प्रेम अगदी निखळ पाण्यागत असतानाही जर समजा तिला तिच्याच एखाद्या सखीचं अन तिच्या जीवनसाथीचं प्रेम स्वतःच्या प्रेमापेक्षा अनोखं वाटायला लागलं तर...? आपलंही होतं ना असंच? होतं असं कधी-कधी! माझ्या आईचं आणि माझं प्रेम अगदी घट्ट आहे,प्रेमळ आहे,अगदी म्हणावं तसं सुंदर आहे.परंतु माझ्याच कोण्या मित्राचं म्हणा अथवा एखाद्या मैत्रिणीचं आणि त्यांच्या आईच्या प्रेमळ नात्यात काहीतरी अनोख्या दुनियेचा प्रत्यय अनुभवायला येतो. त्यांचं नातं काहीतरी अनोखंच वाटायला लागतं! मी आणि तो अगदी जिवाभावाचे मित्र ! मित्र कसले भाऊच! तरीही आमच्या मैत्री पेक्षा दुसऱ्याच दोन सवंगड्यांची मैत्री खूप अनोखी वाटू लागते. अगदी त्यांच्यासारखं अनोखं प्रेम असायला हवं आणि कदाचित त्या अनोख्यापणाला आपण मुकलोय की काय?असं कधी-कधी वाटायला लागतं. हे अनेक जणांच्या बाबतीत होतं. जीवनातील बरीच नाती आणि त्यातला प्रेम भास आपण अनुभवत असतो परंतु इतर लोकांच्या काही नात्यात अनोखेपन जाणवायला लागतं, त्याला कारण त्यांच्यातलं अनोखेपन असतंच परंतु तितकंच कारण आपणही असू हे समजून घेण्यामागे आपण कमी पडत जातो. इतरांच्या प्रेम संबंधात,प्रेम नात्यात अनोखेपन वाटण्यामागे असतो आपल्याला हवा असणारा त्यांच्या प्रेमतला अनुभवलेला क्षण! त्यांच्या प्रेमतला हवा असतो न चाखलेला गाभूळ गोडवा! म्हणून तर ती प्रेम नाती आपल्या स्वतःला अनोखी वाटायला लागतात. आपल्याला वाटत असणारी अनोखी प्रेम नाती ही दुसर्यांना देखील अनोखी वाटतीलच असं नाहीये. मग आपण नजाणते होऊन त्या नात्यांची परिक्रमा करत मोठ्या कुतुहुलाने मनात आणि तोंडात त्यांचा प्रेम गोडवा गायला सुरू करतो,पण आपण देखील असं नातं,प्रेम गुंफू शकतो आणि त्या अनोख्या प्रेमाच्या नात्यांच्या परिजळात नाहू शकतो हे विसरूनच जातो.

   हे झालं इतर लोकांच्या वाटत असणाऱ्या अनोख्या प्रेमाबद्दल!आता आपल्या स्वतःच्या नात्यात थोडं डोकावून पाहू! एका बहीण-भावाच्या नात्याबद्दल समजून घेऊ. त्या दोघांचं कधीच पटत नसतं.अगदी म्हणजे अगदीच!आलं ना लक्षात? बऱ्याच घरात हे नातं मी सांगतोय त्या पद्धतीचं पहायला मिळतं.पण या नात्यात इतकं प्रेम लपलेलं असतं, एवढा जिव्हाळा असतो की तो वेळेप्रसंगी समोर दिसून येतो.मग डोळ्यात पाणी येऊन त्या नात्याचा,प्रेमाचा हेवा वाटायला लागतो. बाप-लेक या दोघांच्या नात्यात देखील हा अनुभव बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतो. आपली काही नाती अगदी अशीच असतात,अनोखी! आता प्रेम भोवऱ्यात थोडं खोल जाऊन अजून एक प्रेमळ नातं विचारात घेऊन पाहू.प्रियसी आणि प्रियकराच्या नात्याबद्दल! थोडी चेहऱ्यावर चकाकी आली असेल तुमच्या! महत्वाच्या नात्यात डोकावल्यामुळे तुम्हालाही जरा रुचकर विषयात हात घातल्यासारखा वाटला असेल. हे नातं आहेच असं! ते जन्मतः मिळत नाही.अगदी नाजूक टप्प्यात येऊन भेटणारा हा नाते अनुभव असतो. कदाचित या नात्यामुळे तो आयुष्याचा टप्पा नाजूक वाटायला लागतो आणि अगदी सर्वात मोहक देखील! जवळपास हे नातं सगळ्यांसाठीच अनोखं असतं. ज्याने हा अनुभव चाखलाय त्याच्यासाठी ते नातं इतर नात्यापेक्षा,प्रेमापेक्षा अगदी अनोखंच असतं! त्या नात्यात ज्याने-त्याने शोधलेला असतो लपलेला आपल्यातला वेगळाच आत्मा! त्यात विस्मयकारक बदल असतात,अनुभव असतात,जिव्हाळा असतो.मग ते वेगवेगळ्या कारणाभूती अनोख्या नजरेच्या कक्षेत सामावून जातं.

   अनोखं प्रेम नेमकं दडलेलं असतं ते आपल्या अंतर आत्म्याच्या गाभाऱ्यात!माझ्यासाठी माझं प्रेम मला अनोखं असू शकतं,तसंच इतरांसाठी त्यांचं प्रेम त्यांच्यासाठी अनोखं का असू शकणार नाही याची प्रचिती स्वतःच्या मनाला आणून द्यायला हवीच.कारण आपण नकळत का होईना इतरांच्या प्रेम संबंधांना तेवढं महत्व देत नाही किंवा ते समजून घेण्यात आपला रस नसतो.मग आपण कधी का होईना त्या प्रेमाला आपल्या शब्दांनी म्हणा किंवा वागण्याने दुखावून जातो.आपलं अनोखं प्रेम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.त्या प्रेम संबंधात आपण अडथळा येऊ नये म्हणून नेहमीच धडपड करत असतो.यांत लोकांचा व्यत्यय देखील आपल्याला नको असतो. त्याच पद्धतीने आपण इतरांच्या प्रेम संबंधांना महत्व देऊन ते संबंध आपल्यामुळे दुखावू नये याची काळजी घेणे विशेष आहे.अनोखं प्रेम हे फक्त मानव जातीपुरतच मर्यादित नसतं,हे देखील विशेष! माझा कुंचला आणि त्या कुंचल्यापासून मी कयामत साकारलेली कलाकृती,माझं साहित्य आणि त्यावर असणारं माझं निस्सीम प्रेम,निसर्ग आणि माझं असलेलं निसर्गावरचं अनोखं प्रेम,मी पाळलेला माझ्या घरातील कुत्रा आणि मी,हे देखील अनोख्या विश्वातील अनोखं प्रेमच! अमुक अमुक व्यक्ती आणि त्याने जोपासलेला एखादा छंद, त्याचं त्या छंद कृतीवर असणारं प्रेम हे अनोखंच समीकरण असतं. मग आपण त्या प्रेमाला समजून त्याचा मुलाहिजा राखणं आपलं कर्तव्यच आहे ना! अरे,काय वेडा माणूस आहे हा!काय त्याचा वेडा छंद. आयुष्य गेलं यात! असं म्हणून आपण त्याच्या मागे त्याचा आणि त्याच्या प्रेमाचा अपमान करत नाही का? अनोख्या जगात वावरणाऱ्या अनोख्या लोकांना याचा त्रास होत असेल,हे आपण समजून घ्यायला हवं.त्या प्रेमामागे कोणाच्यातरी भावना असतील,प्रसंग असतील,आठवणी असतील हे समजून घेण्याची दृष्टी सर्वांनी ठेवायला हवी आहे. माझ्या आई-वडिलांच्या मेहनतीने बांधलेल्या घराला जर मी उद्या विक्री काढले तर मी त्यांच्या भावनांना,आठवणींना,घरात गुंतलेल्या आत्म्याला आहुतीच देत आहे असे नाही का? त्यांच्या त्या घरावर असलेल्या अनोख्या प्रेमाला सोडचिठ्ठी द्यायला लावणारा मी कोण?मला या अनोख्या प्रेमाबद्दल नेमकं काय सांगायचं आहे,हे तुमच्या लक्षात येत असेलच. विचार करायला लावणाऱ्या या सर्व गोष्टी नक्कीच आहेत.

   आपण अशा अनोख्या प्रेमाला जपायला हवं,संगोपन करायला हवं!इतरांच्या प्रेम नात्यांना आदराने पहायला हवं! ही अशी अनोखी नाती अगदी सहज वाढत नाहीत.त्या अनोख्या प्रेमाने खूप दिवस,खूप साऱ्या रात्री वेचलेल्या असतात,स्वप्नं रंगवली असतात,क्षण जगलेली असतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या विश्वात अडथळा न आणता स्वच्छंदी जगू द्यायला हवं आहे. आपल्या अनोख्या प्रेमाला पुढील काळात त्रास न होवो याचीही तजवीज असायला हवी आहे आणि हे अनोखं प्रेम जोपासताना निव्वळ आपला स्वार्थ न पाहता त्यामुळे इतरांना देखील याचा त्रास होऊ नये याची काळजी घेणे हे शहाणपणाचं लक्षण आहे.अनोखं प्रेम इतरांच्या नजरेत सलायला लागल्यास आपल्या जीवनात कधी वादळ येईल हे सांगता येत नाही,म्हणून आपल्या चक्षु नजरेने ते अचूक जाणून जीवनाला योग्य वाट देत त्या प्रेमाला योग्य न्याय देता आला पाहिजे. प्रेम स्वरूप असतं त्याला औदंबरात न पाहता स्थायी जीवन कक्षेत योग्य आकार देत डोळ्यात पाहता आलं पाहिजे हे तितकंच खरं!



Rate this content
Log in