सखीस पत्र
सखीस पत्र
प्रिय सखीस.....
आई...नमस्कार करते! कशी आहेस? खरं तर हे तुला विचारायला नकोच. मला माहितीये तू नेहमी ठणठणीत आणि चांगलीच असते! मीही तुझीच लेक आहे, मला ठाऊक आहे. कितीही आजारी असली, तुझ्या मागे कामाचा ताण असला तरी तू ठणठणीतच असते आम्हा लेकरांना सांगण्यासाठी! तू बरी नाहीस हे कधी तुझ्या तोंडून ऐकायलाच मिळालं नाही. नेहमी लपवत आलीयेस आणि पाठीशी घालत आलीयेस तुझं दुखणं. तरीही सांगते लेकीच्या अधिकाराने काळजी घे आणि जीवाची तगमग, हाल करून घेणं बंद कर.
आता म्हणत असशील आज हे अचानक पत्र कसं काय? कधी नव्हे ते लेकीने पत्र कसे लिहिले? आई ऐवजी हे प्रिय सखी वगैरे काय? वरून माझी चौकशी करत आहे आणि स्वतःचं काही सांगत नाहीये. ऐक, मी एकदम छान आहे! काळजी करण्याचे कारण नाही. आज मुद्दामच पत्र लिहीत आहे... आज मैत्री दिवस आहे. माझी जवळची अशी मैत्रीण अथवा कोणी मित्र म्हणून मी कोणाजवळ कधी मन हलकं केलंच नाही. मैत्रीच्या विरहात मी नेहमी सखी, सोबती म्हणून आठवणींच्या मैफिलीत तुलाच हाक देत गेले. प्रत्यक्षपणे नव्हे पण अप्रत्यक्षपणे माझ्या एकांतीच्या विश्वात मी तुला आठवून, डोळ्यासमोर तुला ठेवूनच नेहमी मन हलकं केलं आहे आणि आजच्या या मोबाईल युगात फक्त विचारपूस आणि हाल हवाल विचारण्यापूरताच तो मोबाईल! मन मोकळं बोलण्याइतकं त्यात रसायन नाही. नात्याचं, गुंत्याचं, जीव्हाळ्याचं शास्त्र त्या मोबाईलच्या कानातून सहज ओतता नाही येत. असंही माझ्या लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत या मोबाईलच्या अंधाऱ्या वाटेनेच आपण अबोल हितगुज करत आलोय. कधी मन भरून बोलण्याची आणि तुझ्या पोटात शिरून मन मोकळं करण्याची संधीच नाही मिळाली. तुझी ऊब ती नेहमीच या मोबाईलच्या स्क्रीनवर स्पर्श करून मी अनुभूती घेण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र लाख वेळा केला,पण निरर्थक!
बाबा आणि तू विभक्त झाल्यापासून मी काकांकडे वाढले, मोठी झाले. तुझा पदरही त्यावेळी नाविलाजाच्या अश्रूने ओला झालेला मला जाणवला होता. माझ्या भविष्यासाठी तू लोकांच्या पदरात मला टाकून गेलीस खरी पण मी तुझ्या पदराखाली वाढण्यासाठी नेहमीच तरसून गेलेली असायची. लहानपण माझं उसण्या निवाऱ्याखाली तुला शोधतच गेलं! मोठ्या आई काकांना मूल बाळ नाही म्हणून त्यांचं लेकरू होऊन त्यांच्या कुशीत निजून आपण त्यांचं व्हावं असं समजण्याइतकं माझं वय तेव्हा नव्हतं. पण हळू हळू मोठी होत जाताना समज येत गेली आणि माझे बरेच गैरसमज मग नजरेपुढे उलगडू लागले. ज्यांच्या कुशीत जाऊन आपण आई बाबांना शोधावं असं वाटू लागलं तेव्हा त्यांचे हात माझ्यासाठी आखडायला लागले होते. तरीही मी मनाची समज घालून तुझ्यासाठी नेहमीच त्या घरात पाय रोवून वाढू लागले. आई आठवतं का तुला? दिवाळीमध्ये तू मला बोलावलं होतं सोबत दिवाळी करू म्हणून आणि काकांनी सांगितलेलं की मोठ्या आईची तब्येत ठीक नाही तर मला पाठवता नाही येणार... तूही दिवाळीच्या दिव्यात पाणी ओतून मन मारलं होतं आणि मोठ्या आईची काळजी घे म्हणून ताकीद देऊन सांगितलेलं! आठवतं? त्यावेळी मोठी आई नाही, मी आजारी होते! तुला त्या मोबाईलच्या खिडकीतून कधी काही दरवाजा उघडून सांगताच आलं नाही. रात्रभर मी पोटाच्या कळा घेऊन अंथरुणात तडफडत होते... डॉक्टरकडे जाण्यासाठी मी काकांना म्हटलंही, त्रास सहन होत नव्हता! पण त्यांनी सकाळ होईपर्यंत माझ्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी उशीत डोकं खुपसून तुला आठवून अगणिक अश्रू ढाळले. त्या वेदना एकीकडे आणि आई वडील असून पोरक्या मनाच्या वेदना घेऊन त्या रात्रीस मी दोष देत भांडले होते..अगदी टाहो फोडून! पण ते मला आणि माझ्या उशाखालच्या तुझ्या फोटोलाच माहीत!
असो...तुला माझ्या जुन्या वेदना सांगून तुला हलक्या काळजाचं करून रडवायची इच्छा नाहीये आई! पण माझी आई माझ्यासाठी काय आहे हे तुला कळावं आणि आपण दोघी कोणत्या गोष्टींना मुकलो ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तूही तिकडे लक्ष वेदनेच्या भौऱ्यात हुंदके देत असशील याची जाणीव आहे मला! मी वयात आल्यानंतर तू ओटी भरण्यासाठी आलेली... पण त्या शरीराच्या नव प्रवाहाच्या आधीच मी शहाणी झाली होते परिस्थितीने ही गोष्ट तुला सांगणं कदाचित महत्वाचं असावं. स्त्री मातीची तुझी माझी जात असल्याने सुख आणि दुःखाच्या कळा गर्भात विरून घेण्याची ताकद तुझ्यात आणि माझ्यात आहेच. मी तुझ्या रूपाच्या देण्याने देखणी निघाले... आणि याच देखण्या रुपाला मग हळू हळू घरातच नजर लागू लागली..त्याच उसण्या घरात!जिथे मी तुला शोधत असायचे. लेक बाळेच्या अंगावर मायेने फिरणारे हात कधी टोचू लागले हे समजायला मला उशीर नाही लागला. ज्या पुरुषाच्या अंगा खांद्यावर मला बाप समजून खेळावं वाटायचं त्याचीच मला भीती वाटायला लागली आणि मी त्या घरात उरात माती भरून सगळं झाकून स्वतःला सावरत तुझ्या आठवणीत त्या घराच्या उंबऱ्याकडे पाहत वाढत गेली. कधी तो उंबरा ओलांडून हक्काचं घर गाठेन वाटू लागलं. ज्या वयात मुली आपल्या राजकुमाराच्या स्वप्नात विरून त्याच्या राजमहली संसार थाटण्याची स्वप्न पहात असतील त्या वयात मी या उसण्या घराचा उंबरा ओलांडून कधी मुक्त होईल याचीच खरं तर वाट पाहत होते! माझा राजकुमार कधी स्वप्नात आलाच नाही... यायचा तो मायेचा थंड गारवा, ज्याच्यासाठी मला ते घर सोडून माझ्या हक्काचं घर हवं होतं.
काही काळाने एक राजकुमार माझ्या आयुष्यात आला. चेहऱ्यावर नवीन जगणं उमटवलं होतं. त्याच्याबद्दल तुला सांगण्याची खूपदा धडपड केली मी...पण ते शक्य झालंच नाही! ज्याला सांगायला नको होतं त्याला मात्र ते समजलं आणि परत माझ्या आयुष्यात गर्द काळे वादळ वारे भरून आले. माझ्या राजकुमाराने साथ सोडली नाही पण मला माझ्या परिस्थितीने त्याच्याशी विदाई घ्यायला लावली.तो आणि मी मनाने शुष्क झालो, रडलो,पडलो पण नियतीशी समझोता करत आम्ही एकमेकांची स्पंदने एकमेकांना परत केली. तो भरकटत आहे अजूनही विरहात...कदाचित तू आणि बाबा जवळ असते तर नक्कीच त्याला नकार देण्याची ताकद तुम्हाला झाली नसती! त्याचा चांगुलपणा आणि कर्तृत्व तुम्हाला भावलं मात्र नक्की असतं.. खरंच. नंतर नंतर कोणाच्या तरी झोळीत पडण्यापेक्षा तू आणलेल्या स्थळाला मी सन्मानाने होकार दिला. हक्काच्या घरासाठी! माझ्या स्वार्थासाठी म्हणा किंवा मग परिस्थितीच्या ओझ्याखाली अडकलेल्या माझ्या नशीबासाठी. आज माझं कुटूंब मला स्वीकारून आनंदीत आहे. नवीन सुनेच्या चाहुलीने सारं अलबेल गोड आहे. नियतीने गाठ मारून दिलेला माझा राजकुमार माझा पती म्हणून सर्व सुखाची निशा चरणात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मी सुखी आहे,लेक सुनेसारखी! पण मी बराच मोठा काळ आवंढा गिळत मागच्या दारी परस अंगणात पुरला आहे. एकांतात उकरून मन मोकळं करून रडण्यासाठी! तुझ्यासाठी...बाबासाठी आणि त्या विरह गंधासाठी...!
आज बरंच हलक्या मनाची झालीये मी देखील, माझ्या सखी सोबत बोलून!खूप गुदमरत होतं अंतःकरण आतल्या आत.म्हणून हा सारा अट्टाहास! समजून घे. त्रास न करता तुझ्या लेकीला माहेरपणासाठी बोलावून गोड माया दे,पोटात घे. पाठीवरून हाथ फिरवून मुके घे आणि तुझ्यासोबत मलाही एकदा पुढचं आयुष्य आल्हाद जगण्यासाठी रडू दे!
तुझीच लेक...तुझी सखी
काळजी घे आई...