Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

गोविंद ठोंबरे

Others


3  

गोविंद ठोंबरे

Others


सल

सल

4 mins 362 4 mins 362

सौमित्र राजवटीतील राजा कंभोज कैक वर्षांपासून सिंधू वनामध्ये स्वतःचे वनवासी जीवन भोगत होता. कित्येक रात्री अन दिवस सर करत त्याने सिंधू वनाच्या उत्तरेला बऱ्याच दूर ठिकाणी एका झऱ्याच्या बाजूलाच आपला रहवास बनवला होता. तो प्रत्येक दिवस आणि रात्र ऋषी जांभुवन्त यांनी दिलेल्या कर्मसाधनेच्या बळावर स्वर्गदेवास प्रसन्न करू इच्छित होता. राजा कंभोजाने ठरवलेल्या प्रत्येक दृढ निर्णयास आजतागायत फलप्राप्तीस नेले होते. कित्येक लढाया त्याने शौर्यचातुर्याने पराक्रमी गाजवल्या होत्या आणि जनतेस सुराज्यही दिले होते. त्याची दैदिप्यमान कीर्ती चहुबाजूने पसरली होती. तरीही हा वनवास त्याच्या आयुष्याला सुटला नव्हता आणि हा कोप फक्त त्याच्यावरच झालेला नव्हता तर सबंध जनतेस झाला होता. कुठल्याही पामराला अथवा जीवजंतुला राजा कंभोज सिंधू वनात वनवासी असल्याचे ठाऊक नव्हते. तो पूर्ण श्रद्धेने स्वर्गदेवतेस नित्य आव्हान करत होता.

     

चैत्र पूर्वषाढा नक्षत्रात स्वर्ग देवता स्वतः प्रसन्न होऊन सिंधू वनात निलकटी झऱ्याच्या सूर्यमिलापात तुला नक्की दर्शन देईल अशी ग्वाही ऋषी जांभुवन्त यांनी कंभोज राजास दिली होती आणि तो दिवस नेमका आजच होता. राजा कंभोजाने झऱ्याच्या शांत प्रवाहात सूर्याला साक्षी ठेवून स्वर्ग देवतेस पुष्प अपर्ण करत आव्हान केले, " हे स्वर्ग देवता! मी राजा कंभोज तुला आव्हान करत आहे, या पूर्वषाढा नक्षत्रात तू मला दर्शन देऊन माझ्या मनातली सल दूर कर. हा राजा कंभोज सदैव तुझ्या चरणी दास म्हणून राहील. हे स्वर्ग देवता मला दर्शन दे.... मला दर्शन दे!" तदक्षणी त्या ठिकाणी एक लख्ख प्रकाश झोतात तिमिरातून कोणी निलकटी झऱ्याच्या प्रवाहात अग्निदिव्याच्या प्रगट अवस्थेत उतरल्याचा भास झाल्यागत कंभोजास झाले. त्याने आपले दोन्ही हात आकाशी दिशा देत नतमस्तकी जात प्रवाहात पाहिले. एक दिव्य तेज राजा कंभोजास फलस्वरूप आशिर्वाद देत उद्गारले, " राजन कंभोज! तू या स्वर्ग देवतेस प्रसन्न करण्यास खरेच प्राप्त आहेस. तुझ्या श्रद्धेपोटी ऋषी जांभुवंतांच्या वाणीस साक्ष होऊन मी तुला प्रसन्न झालो आहे. राजन, बोल तुला काय म्हणावयाचे आहे?"

     

राजा कंभोज अश्रूंनी व्याकुळला होता. त्याने अश्रूंना बांध देऊन स्वर्गदेवतेच्या दिव्यत्वाला नमस्कार केला. "हे देवता, मी राजा कंभोज मनात घालमेल घेऊन या वनी वनवास भोगत आहे. माझ्या मनी एक सल आहे, ती सल तुम्ही दूर करावी ही माझी इच्छा आहे. "स्वर्ग देवतेने राजास संमती दिली. "राजन तुझी घालमेल मी जाणतो, तरीही मला तुझ्या अश्रूरूपाने आणि तुझ्या मुखवाणीने ऐकायचे आहे. तू सांग तुझ्या मनातील सल."

     

राजा कंभोजाने सांगण्यास सुरुवात केली, "हे खगांनो, वृक्षवल्ली, जलधारा आणि जीवसृष्टी असलेल्या सिंधू वनातील सर्व पामरांनो, तुम्ही सर्व देखील ऐका! हा राजा कंभोज अनेक वर्षे अबोल होता तुमच्याशी, आज या स्वर्ग देवतेच्या समोर तुम्हां सर्वांना देखील बोलतो आहे. मी पराक्रमी,शूरवीर, रामस्वरूपी राजा सूर्यभानपुत्र कंभोज कित्येक वर्षे नैतिकतेने जनतेस सेवी गेलो, पुण्य कमावले, पराक्रम केले, दिनदुबळ्यास वाली झालो, तरीही या सिंधू वनी वनवास भोगतो आहे. मी एका स्त्रीवर निस्सीम प्रेम करत होतो. ती स्त्री माझ्या आयुष्यातील पहिली स्त्री होती जीस मी विवाह करून राजमहली आणण्याचे स्वप्न उराशी बाळगत होतो. तिचे भूत मी जाणू इच्छिले नाही आणि तिचे भविष्य मी माझ्या प्रेम छायेत सुखवर्षाप्रमाणे देऊन तिला जणू स्वर्गानुभूती देणार होतो. तिचे सौंदर्य साक्षात कामदेवतेने वर्णिले होते.ती एक अप्सरा होती. परंतु जेव्हा तिच्याशी मी विवाह करण्याचे योजिले त्याक्षणी राजदरबारी धर्मगुरू ऋषी प्रज्ञान यांनी त्यास विरोध केला. त्यांनी तिच्या भूतकाळाशी माझ्या राजयोगाचा प्रत्यय लावत विवाहास विरोध केला. ती स्त्री कोणी वेश्या असून तिने कैक परपुरुषांशी देहमिलनाचे कृत्य फक्त लोभविलासपोटी केल्याचे सांगितले. तरीही तिचा भूत मिटवून मी तिला माझ्या आयुष्यात स्थान देण्याचे ठरविले होते. तरीदेखील दरबारी धर्मगुरू आणि शुभचिंतकांनी त्यास विरोध करत मला धर्मबोध देण्यास सुरुवात केली. त्यांनी मला हे पाप असल्याचे वर्तविले. शेवटी मी त्यास तयार होत नसल्याचे पाहून त्यांनी धर्मसंघास आमंत्रित करून मला वनवासी जाण्यास भाग पाडले आणि त्या सौंदर्यवतीस बहिष्कृत करत नर्कयातनेस धाडले. माझ्या मनात हीच सल आहे देवते! त्या बिचाऱ्या स्त्री जीवाचा काय दोष? जिने एका वेश्यापोटी जन्म घेतला. तिचा काय दोष,तिने या माझ्या जीवास प्रेमभावनेचा साक्षात्कार केला. तिने जरी कैक पुरुषांच्या रात्री रिझवल्या असतील, तरीही तो स्त्री जन्म झिजला तो कोणासाठी तरी! मग तिच्या हतबलतेचा प्रश्न मी राजा असून देखील का सोडवू शकलो नाही या धर्मशासनापुढे? मी राजाधिराज असून तिच्या जीवनाचा वाली का होऊ शकलो नाही? माझी हीच सल मला गोड जगू देत नाही आणि मरणही येऊ देत नाही. मला उत्तरीत करा तुम्ही देवा! कृपा करा!"

     

यावर स्वर्गदेवता उत्तर देत राजा कंभोजास उत्तरीत झाली,"राजन, तुझी दृष्टी योग्य जरी असेल तरीही तू धर्मशासनाच्या प्रलयी वाहत गेलास. तुला जीवनधर्म आणि अंधत्वात बुडालेल्या शासक धर्मसाधनेतील फरक जाणवला नाही. तू तुझ्या जीवनशैलीतील खऱ्या मानवास धर्मसंघाच्या आहारी जाऊ दिले. तुला लागलेला नियम हा तुझ्या पश्चात तुझ्या शेवटच्या जनमानवासही देत गेलास. एवढा मोठा पराक्रमी राजा धर्मशासनापुढे नतमस्तकी गेल्यास तुझ्या प्रजेने धर्मशासकांच्या विरोधात आवाज कसा उठवावा? तू या वनी अबोल होऊन कैक वर्ष जगलास परंतु मरण यातना घेत. परंतु तू मानवतेच्या धर्मयुध्दात केव्हाच हरलेला आहेस! तू षंढ कुटनीतीच्या पुढे स्वतः षंढ न होता त्या स्त्रीस न्याय द्यायला हवा होता. धर्मशासनास आव्हान देऊन तू मानवता धर्मास अभिप्रेत होणे गरजेचे होते."

      

यावर राजा कंभोज अतिशय दुःख भावनेने उद्गारला,"मग माझी ही सल जाणार कशी?" पुढे स्वर्ग देवतेच्या दिव्यतेजाने राजा कंभोजास मार्ग दिला,"कुठलीही सल तळपून न मारता त्यास जिवंतरुपी अग्नितेजात तेवत ठेवून पुढे जाऊन त्यास न्याय देण्यास तत्पर रहा! तू आणि समस्त मानवजातीस यापुढे ही जाण असावी. मनात राहिलेली सल मरणाआधी दूर करण्यासाठी नेहमी संघर्ष करावा आपल्याच मनीदेही, त्या दुर्दैवी शासकापुढे! राजा जा आणि लढा दे त्या मानवतेच्या विरोधातील धर्मशासकास आणि मग घे शेवटचा श्वास, स्वर्गरूपी अनुभूतीसाठी!"  

     आता राजा कंभोज कृतकृत्य होऊन आशीर्वाद घेऊन निघाला होता त्या ज्ञान तेजाचा, खरा लढा देण्यासाठी!


Rate this content
Log in