साहित्यिकांची राजकीय भूमिका!
साहित्यिकांची राजकीय भूमिका!


राजकारण असतं समाज यंत्रणेचं वंगण! ते खरं तर धडपडणाऱ्या विकासासाठी असतं, समाज एका प्रवाहात बांधून ठेवण्यासाठी असतं, विविध जाती धर्मांच्या, विचार सरणीच्या लोकांना एक संघ छत्राखाली एक न्याय देण्यासाठीचं माध्यम असतं! राजकारण
पहायला गेलं तर एक अवाढव्य वाटणारा किचकट विषय आहे.तो सहजासहजी कोणी हाताळणे म्हणजे स्वतः भाजून दुसऱ्याला पोळवण्यासारखे आहे. यासाठी असायला हवा तगडा अभ्यास,दूरदृष्टी,सामाजिक आणि राजकीय गोष्टींचं भान आणि विषय हाताळणीचं
प्रसंगावधान,तितकीच हुशारी देखील! राजकारणाशी संबंध ठेवायची इच्छा नसणे म्हणलं तरी एक नागरीक म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून का होईना या राजकारणाशी आपल्याला भेटावं लागतं. हा न टाळता येणारा काही लोकांसाठीचा अनैच्छिक विषय असू शकतो.
ही अनैच्छिक भावना,उदासिनता आज लोकांच्या मनात का घर करून राहिली आहे राजकारणाबद्दल ते जाणून त्यावर खरं तर कार्य घडायला हवं आहे,पण ते होताना दिसत नाही. मतदान करून मतदार राजकारणाची शिट्टी वाजवून खेळ तर सुरू करतो पण पुढे पुढे तो या खेळात निसटता पाय काढताना दिसतो. त्याला हा खेळ चिडीचा,चोरीचा आणि लबाडीचा वाटायला लागतो.खेळ म्हटलं की तो खेळ सर्व इमानीने खेळतील हे कोणी सांगू नाही शकत. पण हा आपण चालू केलेला खेळ आपल्यासाठीच होता हे मात्र तो मतदार विसरायला लागतो आणि तो निराश व तितकाच हतबल होताना दिसतो या राजकारणाबद्दल! राजकारण हा खेळ नाही पण तो खेळला जात आहे म्हणून हे खेळासारखे खेळकर उदाहरण समोर आणले!
मग हे राजकारणाचे फासे समाजावरच उलटे पडायला चालू झाल्यास करायचे तरी काय? हा मोठा प्रश्न 'आ' वासून उभा राहतो.
अशा वेळी सर्वांनी आपापली भूमिका समोर ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आता भूमिका समोर ठेवणारे कितपत आपली भूमिका समाज हितासाठी किंवा प्रश्नांना तोंड फोडण्यासाठी मांडतील हे सांगणे जरा कठीणच आहे. त्यासाठी लागतो एक मधला दुवा! तो समाज आणि राजकारण यातला खरा माध्यम म्हणून हिरीरीने काम करताना दिसला पाहिजे. त्याची भूमिका असायला हवी पोषक समाजासाठी आणि राजकीय जडणघडणीसाठी! तो कोण असू शकतो? काय करू शकतो? कसा करू शकतो? कुठे,केव्हा,कशासाठी? या सर्वांचे उत्तर तो एकटाच देऊ शकतो.ते ही प्रामाणिकपणे! तो साहित्यिकाच्या भूमि
केत राजकीय भूमिका लिलया पेलू शकतो,नव्हे तर पूर्णत्वासही नेवू शकतो! साहित्यिक म्हणून त्याची राजकारणाबद्दलची भूमिका लेखणीच्या माध्यमातून पारदर्शकतेने मांडताना त्याने समाजाच्या उत्क्रांतीची, विकासाची,सामाजिक पोषकतेची निर्विकार बीजे मनामनात पेरली पाहिजेत.साहित्यिक जसा मनातल्या गाठी सोडवतो, भावना आणि विचारांचे वादळ योग्य प्रवाहात नेवून थांबवतो तसा तो राजकीय टप्प्यांचेही विश्लेषण अभ्यासू आणि चिकित्सक बुद्धीने योग्य मांडू शकतो. समाज आणि राजकारण यातलं दडलेलं गुपीत तो हेरू शकतो, पडताळू शकतो आणि खऱ्या खोट्याच्या मानगुटावर तो प्रहार देखील करू शकतो, त्याच्या तप्त आणि सौम्य लेखणीने!
साहित्यकाच्या लेखणीला जात नसते, धर्म नसतो, पक्ष नसतो. तो असतो अपक्ष समाजाच्या बाजूने समाजाचा घटक म्हणून! म्हणूनच तो राजकारणाच्या चाव्या त्याच्या मनाप्रमाणे फिरवू शकतो. त्याच्या लेखणीत तेवढी ताकद,तेवढी अग्नी, तेवढी जलकांता असते! पण आजकाल तिथेही थोडीशी गफलत होताना दिसते. साहित्यिकांची सोंगं घेऊन काही मुखवटे उगीच सोंग आणून आपलं नाटक समाजाच्या उरावर,काळजावर गाजवायला पाहत आहेत. त्यांनी लेखणीची शाई भरून आणलेली असते राजकारण्यांच्या कारखान्यातूनच! ती शाई कधी कधी अमुक अमुक त्याच्याच जातीय समाजातून मंत्र मारून कागदावर उतरवलेली असते आणि मग ती समाजावर रुजवायची चेष्टा चालू असते. त्यासाठी लागतो मग एक खरा,सच्चा दिलदार साहित्यिक! जो या सोंगाड लेखणीला नागडं करून त्याच्या लेखणीचे फटके देत समाजापुढे उभं करतो.खरं काय नि खोटं काय हे लेखणीच्या ज्वलंत शब्दाने डोळ्यामार्फत डोक्यात उतरवण्यासाठी. राजकारणाबद्दल खरं तर उदासिनता नसायलाच हवी, ती खुलायला हवी आणि फुलायलाही हवी! राजकारण हे सर्व स्तरातील समाज घटकांना समजायला हवे. ते त्यांच्यापर्यंत पोहचायला हवे. त्याच वेळेस एक स्वच्छ राजकीय समाज विकासाच्या पाऊल वाटेवर आपलं बस्थान मांडू शकेल. ते बस्थान मांडण्यासाठी साहित्यिकांनी पुढे येऊन आपल्या लेखणीने प्रबोधन करायला हवे,समाज हिताचे विचार पेरायला हवे! आपल्या राजकीय भूमिकेला पाठ देत पळ न काढता समाजाला योग्य राजकीय प्रवाहात नाहू घालायला हवे. साहित्यिकांची राजकीय भूमिका अगदी ठळक दिसायला हवी,चमकायला हवी ,तळपायला हवी आणि ती समाजाच्या अंतर्भूत व सर्वांगिण विकासासाठी नेहमी लिहिती व्हायला हवी!