माझ्या स्वप्नातील भारत
माझ्या स्वप्नातील भारत
देश! देश म्हटलं की त्याला भूत, वर्तमान आणि भविष्य असतंच! भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो जसं की चुका, सुधारणा, चांगल्या-वाईट आठवणी आणि असं बरंच काही जे वर्तमानाशी सांगड घालून त्याचं एक उज्वल भविष्य बनवता यावं. या भविष्यासाठी खरंतर एक अथवा अनेक स्वप्नं असतील आणि ती स्वप्नं प्रत्येक देशवासी आपल्या देशासाठी नक्कीच पहात असेल. खरंतर आजतागायत आपला भारत देश जी परिस्थिती जगतोय, पाहतोय, अनुभवतोय त्या अनुषंगाने भारतासाठी माझी स्वप्नं खरंतर या देशाच्या प्रत्येक सुजाण नागरिकासारखीच आहेत किंवा असावीत! देशाच्या इतिहासाकडे निरखून पाहताना उद्याचं भविष्य त्या इतिहासापेक्षाही अजरामर व्हावं आणि ते मी इतिहासाच्या पानांतून जाणलेल्या रामराज्यागत किंवा मग शिवरायांच्या स्वराज्यासारखं अभिप्रेत व्हावं अशी इच्छा व्हायला लागते! कदाचित आजच्या आणि उद्याच्या घडीचा विचार करता तांत्रिक, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य बाबींचा अभ्यास करता ते भविष्याला पूरक ठरेल की नाही हे याक्षणी सांगू नाही शकत. कारणही त्याला अगदी तसंच आहे! आपण जे वर्तमानात संस्कृतीची, विचारांची बीजे आपल्या पिढीमध्ये पेरत आहोत कदाचित भविष्यातील पिढी हा वसा आपल्या दृष्टीने पेलवतील की नाही या बाबत मात्र शंका वाटायला लागते.
मी जगत असलेली जाती-पातीची घुसमट, आपापल्या धर्म स्वाभिमानापोटी दाखवली जात असलेली समाजातील अक्षम्य विषमता, काही लोकांचा स्व विचारांनी आणि स्वतःच्या वैचारिक बुद्धीने कलह मांडलेला असामाजिक विचार, राजकीय अशक्तपणा, दूषित झालेला समाज प्रवाह मनाला कुठेतरी हताश करून सोडतो. तिथूनच खरंतर मग माझ्या स्वप्नातला भारत मी उघड्या डोळ्यांनी साकारायचा प्रयत्न करू लागतो. जे आज माझ्याजवळ आहे त्याचं स्वप्नं मी का पाहू? किंवा मी जे अनुभवलंय त्याला परत स्वप्नंवत करायचा मी खोटा आटापिटाही का करू? पण मी जे पाहिलंच नाही, ज्याची अनुभूती करण्याची मला प्रबळ इच्छा आहे ती स्वप्नं मी माझ्या देशासाठी नक्कीच पाहिल! माझी माझ्या देशाबद्दलची स्वप्नं तेजोमय होण्याकरिता असतील पण ती स्वप्नं मी उघड्या डोळ्यांनी पाहतो असेल तर त्या तेजोमय स्वप्नांना अंधारी येऊ नये ही मनोमन कामना देखील मी करत असेल.
स्वप्न होतात साजिरे ती होतात गोजिरे।
वैभव येण्या स्वप्नापरि स्वप्न यावी पहाटे।।
अशी साजिरी-गोजिरी स्वप्न प्रयत्नांती पहाटे येत असतात आणि ती पहाट होण्यासाठी सुखनिद्रेची फळे चाखवी लागतात याची कल्पना सर्वाठायी असेलच!
माझा देश जाती-पातीच्या दरीतून सावध बाहेर निघत असताना त्याचा पाय कुठेतरी अजूनही त्या गाळात माखून आल्यासारखा वाटत जातो. ती जात खरंतर कायमची धुतली जात आहे असा भारत मी स्वप्नवत पाहतो. धर्मनिरपेक्ष म्हटला जात असला तरी धर्माच्या पोकळ स्वाभिमानाने समाजात जी मोठी पोकळी तयार होत आहे ती पोकळी सुविचार, अभ्यासपूर्ण मतांनी, एकतेच्या कार्यांनी भरून निघतानाचा भारत मी स्वप्नपूर्तीमध्ये पाहतो. या समाजात वैचारिक कलह, सूड बुद्धीचे मर्म, विषमतेचं वारं भरणाऱ्या म्हाताऱ्या आणि भान गेलेल्या विचार बुद्धीचं पानिपत होताना मी स्वप्नानुभवात अनुभवतो. विज्ञानाशी एकरूप होत असताना सुसंस्कृ
त भारत म्हणून एक विकसित संप्रदाय होताना मी भारतास स्वप्नामध्ये साकारतो. कृषी उन्नती घडत असताना जैविक शेतीची पिकं उभी राहिलेली मी कृषिपूर्ण भारतासाठी स्वप्न पेरतो. शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा सुधारताना आणि त्या संपूर्णत्व शिक्षणाने भारताचा एक एक तरुण बेरोजगारीला धूळ चारत जगाच्या नकाशावर प्रगतीचे गाणे गाताना मी स्वप्न पाहतो. माझ्या स्वप्नातला भारत खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी म्हणला जात असताना तो पूर्णत्वाने देशातील आंतर्गिक कलह मिटवून ताठ मानेने जगासमोर उभा राहताना मी स्वप्नरूपी पाहतो.
आज भारतात खूप समस्या घर करून बसल्या आहेत. आतंकवाद, अवैचारिक विवाद, जातीपातीचे भेदाभेद, महापुरुषात वाटून घेतलेला समाज, राजकीय अतिक्रमण, अशक्त झालेले पर्यावरण, कुपोषित पडलेला आचार-विचार, भ्रष्टाचार, चुकीचे आर्थिक निकष हे सर्व घातक विकार या देशातून मुळासकट उखडून त्याचे अंत्यसंस्कार होताना पाहीली जाणारी स्वप्नं मनाला मोहरून टाकतात. एका उगवत्या सूर्याप्रमाणे या घातक गोष्टींचा अंत करत या भारत भूने मोठ्या दिमाखात उभं राहिलेलं मला पहायचं आहे.
स्वप्न मनीषा पूर्णत्वास जाऊन मिळावी।
भारत देशा स्वअनुभूती होऊन यावी।।
तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला भारत, सुसंस्कृतीने संस्कारक्षम असलेला भारत, जैविक शेतीने भरभराटीस आलेला भारत, सुशिक्षित तरुणांच्या बळाने जगात स्वतःचं प्रबळ स्थान निर्माण करणारा भारत, धर्मनिरपेक्ष, जाती-पातीच्या विचारांना आहुती देऊन प्रगतीकडे वाटचाल करणारा भारत, अभ्यासू आणि योग्य दिशेने देशाला वाट दाखवणारा राजकीय भारत, पर्यावरण पूरक, निसर्गाने नटलेला माझा भारत मला पहायचा आहे!
नको नको ती द्वाड रातीचे कर्कश अंधारे।
मला हवीत झगमगणारी सूर्य प्रकाश अन तारे।।
या देशाने विविध पर्व पाहिलेले आहेत. मानवी उत्क्रांतीपासून ते देश स्वातंत्र्य होऊन विकासाच्या वाटेने धावणारा माणूस या देशाने पाहिलेला आहे. रामासारखा युग पुरुष,गौतम बुद्धांसारखा महामानव, शिवरायांसारखा छत्रपती, तुकोबा आणि ज्ञानोबा माऊलीसारखे संत मंडळी, स्वातंत्र्य काळात देश प्रेमाची लाट पसरवणारे अनेक क्रांतिकारी या देशाने पाहिले आहेत. त्या त्या पर्वाला ते ते लोक मिळाले आणि या देशाची उन्नती होत गेली. त्या सोनेरी पर्वाचे साक्षीदार असणारे अनंत जनसमुदाय असतील, ते समुदाय त्यात चिंब न्हाऊन निघाली असतील परंतू आम्ही...आमचं काय? मलाही एका सोनेरी पर्वाचे साक्षीदार व्हायला नक्की आवडेल! त्यासाठीचा भारत, माझ्या स्वप्नातला भारत उभा राहण्यासाठी एक क्रांती पर्व पेटले पाहिजे! एक साहित्यिक चळवळ उभी राहिली पाहिजे, एक देशप्रेमाची, एकतेची लाट जनसमुदायात पसरली पाहिजे, विज्ञानरुपी मोठी उत्क्रांती उभी राहिली पाहिजे, या पर्वाला उभे करण्यासाठी युग पुरुष घडले पाहिजे, राजकीय चळवळी देश हितासाठी जुंपल्या पाहिजे, कृषी क्रांती, मानव क्रांती, अध्यात्म ओळख, शैक्षणिक प्रगती, खेळ, पर्यावरण समतोल या सर्व गोष्टींचा मेळा एक होऊन माझ्या स्वप्नातला भारत या जगाचं प्रतिनिधित्व करताना मला पहायचा आहे.
जडो घडो ऐसें पर्व डोळ्यापुढे स्वप्नवत।
भारत देशा हे जल-भूतल घालो दण्डवत।।