गोविंद ठोंबरे

Romance

4.6  

गोविंद ठोंबरे

Romance

अभिजात!(भावनाआड दडलेलं प्रेम )

अभिजात!(भावनाआड दडलेलं प्रेम )

10 mins
2.1K


तो सिगारेटचा झुरका मारत स्वतःच्या मोबाईलमध्ये पहात होता. रूमच्या खिडकीजवळ बसून मग्न अवस्थेत मोबाईलमध्ये काड्या करत बसणं हे त्याच्यासाठी नेहमीचंच! सोबत सिगारेट असल्यास विचारायला नकोच! शेवटच्या दोन-तीन सिगारेट सोबत वेळ घालवणं कदाचित त्याला आवडायचं. मोबाईलमध्ये काहीतरी हास्यास्पद पहात असतानाच मोबाईलची रिंग वाजली. अनोळखी नंबर वरून आलेला कॉल पाहून कंटाळवाणी भावमुद्रा देत त्याने तो कॉल उचलला. याच नंबर वरून त्याला या आधी देखील कॉल आलेला होताच! 


    "हे बघ,मी तुला ओळखत नाही. मला नाही आठवत शाळेत असताना मी कधी तुला पाहिलंय अथवा कधी बोललोय देखील. तुझं नाव देखील मला माहित नसताना तू वारंवार कॉल का करत आहेस?" चिडलेल्या स्वरातच त्याने ती काही म्हणायच्या आत सगळं संपवलं. "अरे पण मी तुला लहानपणापासून ओळखते यार! मला खरंच तू खूप आवडतोस! हे बघ भरत...नसेल तुला माझी ओळख तर ओळख करून घेऊया ना, काय हरकत आहे तुझी? माझं पूर्ण ऐकून तर घेत जा तू." ती खूप काळजीने आणि पोटतिडकीने सांगत होती. "हे बघ मला काहीच माहीत नाही आणि मला नाही आवडत या गोष्टी.कृपाकरून मला परत कॉल नको करू!" एवढं बोलून त्याने कॉल ठेवलाही. बाजूला बसलेल्या त्याच्या रूममेटने रहावलं नाही म्हणून हटकलच! "काय गुरू,तिचाच कॉल होता वाटतं. अरे बघ तरी कोण आहे तुझी प्रेमवेडी! आम्हाला राव एक गर्लफ्रेंड मिळत नाही आणि तू आहे की एक से बढकर एक मुली मागे असूनही भाव देत नाही. तुझं काही समजतच नाही यार!" भरतने हातातली सिगारेट विझवत मोबाईल बाजूला ठेवला. "ये भाऊ,हे असे कॉल माझ्या गावाकडच्या मित्रांचे चाळे असतात आणि ते मला चांगलं माहीत आहे.हे लोक माझी फिरकी घेण्यासाठी काहीही करतात.माझ्यासाठी नवीन नाही हे. स्वतःच्या गर्लफ्रेंडला सुद्धा माझी घेण्यासाठी हे असे नवनवीन फंडे आजमावत असतात. हे सोड,उद्याच्या परीक्षेचं काय करायचं बोल." एवढ्यावर त्यांचा विषय संपवून दोघे परीक्षेच्या तयारीला लागले.


   परीक्षा संपल्यावर भरतने गाव गाठलं. आई-वडिलांची भेट घेतो न घेतो तोच त्याने आपल्या मित्राच्या मोबाईल शॉपीवर आपला मोर्चा वळवला. दुकानासमोर त्याने गाडी लावताच मित्र परिवाराने मोठ्या आतुरतेने त्याचं स्वागत केलं. त्याचे नेहमीचेच गावाकडचे मित्र सुनील आणि राहुल ! "आ गया मेरा भाई,मेरी जान, मेरा जिगर" म्हणत मित्रांनी भरतची गळा भेट घेतली. "क्या गुरू,कैसा है?" राहुलने विचारलं."हरामी! मी ठीक आहे.पण तुझी गर्लफ्रेंड सुधारू देत नाही न!" राहुलने डोळे मिचकावतच त्याला उत्तर दिलं, " गुरू, तुझ्यापासून कधी काही लपलय का? शेवटी तू फसला नाहीसच! रिलॅक्स मेरे भाई! मजाक केली होती. अरे ही माझी नवीन गर्लफ्रेंड आहे. तीला सहज तुझ्याबद्दल सांगितलं. तुझे किस्से,तुझ्या सर्व जुन्या-नव्या गोष्टी. ती म्हटली कोणता मुलगा मुलीच्या प्रेमजाळात नाही अडकत!? शक्य नाही. म्हणून तीची खात्री होण्यासाठी हा आटापिटा केला यार. बाकी काही नाही. पण भाई, ती खूप इम्प्रेस झाली हा तुझ्या या वागण्यावर! ती तुला भेटायचं बोलतेय. बोल कधी प्लान करूया भेटायचा?" त्याचं बोलणं ऐकून भरतने काहीशी नकारार्थी मान हलवत राहुलच्या पाठीवर चापट मारली. " काय रे शहाण्या तुला काही दुसरे काम नाही का, माझी फिरकी घेण्याशिवाय? हे नेहमीचंच आहे तुझं. मी काही भेटणार नाहीये चल बाय उद्या भेटू!" एवढं बोलत भरतने त्याची बाईक काढली अन बाईक चालू करत त्याने मित्रांचा निरोप घेतला.


   दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी मित्राच्या दुकानावर सुनिलशी गप्पा करत असताना राहुलचा फोन आला. भरतने फोन उचलताच तिकडून राहुल मोठ्या उत्साहात सांगत होता, "भाई, मी गणपतीच्या देवळावर आलोय. तू इकडे ये लवकर, काम आहे!" भरतने त्याचा पुढचा प्लान ओळखत नकार दिला पण राहुल काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने सुनीलजवळ निरोप दिला की तू भरतला काहीही करून तिकडे घेऊन ये. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. सुनीलच्या आग्रहास्तव भरत राजी झाला पण त्याची मनोमन तशी इच्छा मात्र नव्हती. नाविलाजास्तव तो सुनीलच्या मागे त्याच्या बाईकवर बसला. सुनीलला थोडं चिडतच भरत बोलू लागला, "हे बघ यार सुनील, हे तुम्ही काय चालवलंय यार! मला नाही आवडत कोण्या अनोळखी मुलीला भेटायला.तुम्ही का मागे लागलाय माझ्या? ती त्याची गर्लफ्रेंड आहे.मला का भेटायचं आहे तीला मला हेच समजत नाही आणि वरून साल्या तू देखील त्या राहुलचं ऐकतोय. तुमचं काय चालू आहे नेमकं?" सुनील त्याला हसतंच म्हणाला," भावा, चिडू नको यार! त्याची गर्लफ्रेंड माझी पण चांगली मैत्रीण झालीये. ती चांगली मुलगी आहे. आपण जवळचे मित्र आहोत न म्हणून तीला भेटायचं आहे तुझ्याशी. ती फक्त तुझं नाव ऐकून आहे. ती तुला भेटण्यासाठी खूप उत्साही आहे मित्रा! बघ तरी राहुल्याने कसली भारी पोरगी पटवलीये! खरंच काय दिसते यार ती! राहुल्याने नशीब काढलं... सहज पटत नाही अश्या मुली. त्याला कशी पटली देव जाने यार!" अस बोलत-बोलत एव्हाना दोघे त्या जागी पोहचले देखील!

    

    राहुल आणि ती देवळाच्या बाजूला एका झाडाच्या वट्यावर गप्पा मारत बसलेले होते. तीने फिक्कट पिवळा पंजाबी रंगाचा ड्रेस घातला होता. सुनील म्हणत होता तशीच होती ती. सुंदर! हो, अगदी निरागस,देखणी, गोऱ्या रंगाची, कोणालाही भुरळ पडेल अशीच होती ती! राहुल पण देखणाच! दोघांची जोडी छान दिसत होती. प्रेमी जोडपं त्या झाडाखाली हसताना खूप छान दिसत होतं. दोघांनी बाईक बाजूला लावत त्यांना बघून हात केला. सुनील बाईकवरून उतरत तीला म्हणाला, " हा बघ, हा भरत! हमारा हिरो! आणि भरत, ही आपली वहिनी बरं का! राहुल सरांची आन बाण शान." तीने लाजत खाली मान घातली. राहुल पुढे सरकत म्हणाला, " पाहिला का? हा माझा मित्र! तुला पाहायचं होतं ना याला. बघ आता... आहे न मी म्हटलं होतं अगदी तसाच." तीने स्मित हास्य करत भरतची माफी मागितली. " माफ करा, मी तुमची फोनवर थट्टा केली. मी खरं तर असं नको करायला होतं. पण तुमच्याबद्दल राहुलने सांगितलं आणि मला रहावलं नाही. परत एकदा माफी मागते!" भरत तीला थांबवतच म्हणाला," जाऊद्या, त्यात माफी कसली! चालत राहतं. माझ्या मित्राचं नेहमीचंच आहे." एवढं बोलून पाच-दहा मिनिटे गप्पा करून भरतने तिथून पाय काढला. सुनीलला घेऊन त्याने आपला मोर्चा चहाच्या टपरीकडे नेला. तीच्या सौंदर्याच्या प्रशंसेतच त्यांनी तो चहाचा ग्लास रिकामा केला.


   पाच-सहा दिवस झाले. भरत आपल्या घरात टीव्ही पहात होता.अचानक त्याच नंबर वरून तीचा कॉल आलेला पाहून भरत थोडा हवालदिल झाला. त्याने तीचा फोन कॉल उचलला. तीने थोडंसं संकोच करतच विचारलं," हाय, भरत! कसा आहेस? तुला वेळ आहे न बोलायला?" "हो, बोल.मी ठीक आहे आणि तू?" भरतने तीला उत्तर दिलं. "अरे काही नाही, मी पण ठीक आहे.सहजच कॉल केला. म्हटलं तू आहेस की गेला तुझ्या कॉलेजला." भरतने थोडं विचार करतच तीला उत्तर दिलं..."राहुलने नाही सांगितलं का? मी तर इथेच आहे. अजून पाच-सहा दिवसाने जाईल मी." तीने राहुलचा विषय बाजूला करतच त्याला भेटण्याची इच्छा दर्शवली. भरत थोडा विचारपूर्वकच म्हटला, "मला का भेटायचं आहे तुला? अच्छा! राहुलचं आणि तुझं भांडण झालं की काय? मी सांगतो राहुलला.काळजी नको करू." ती थोडी चिडक्या स्वरातच म्हणाली, "हे बघ भरत, राहुलचा विषय नाहीये.माझं भांडण पण नाही झालं त्याच्याशी. माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याजवळ आणि तू प्लिज भेट मला एकदा. नाही नको म्हणू. जाण्याआधी एकदाच भेट,अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे." भरतला नेमकं काही समजत नव्हतं. राहुलचं आणि हिचं कदाचित काहीतरी बिनसलं असावं म्हणून ही काहीतरी त्याच्याबद्दल बोलणार असावी म्हणूनच भेटायला बोलवत असेल असा समज भरतचा झाला. त्याने तीला होकार दिला आणि उद्या तीच्या घरी कोणी नसल्याने तीने त्याला घरीच भेटायला बोलवलं हे भरतच्या न समजण्यापलीकडची गोष्ट असतानाही त्याने होकार दिला. दुसऱ्या दिवशी त्याने हे सगळं सुनीलला सांगितलं. राहुल आणि तिच्यात कदाचित भांडण झालं असावं म्हणून तीने बोलवलं आहे आपण जाऊन बघूया ती काय म्हणते. एवढं बोलून त्याने सुनीललाही सोबत घेतलं. 


   दोघेही तीच्या घरासमोर आले. गाडी बाजूला लावत त्यांनी तीच्या घराचा दरवाजा वाजवला. तीने खूप उत्साहात दरवाजा उघडला पण सोबत सुनीलला पाहून थोडीशी निराशा तिच्या चेहऱ्यावर जाणवली. तरीही तीने खूप प्रेमाने दोघांचे शब्दाने स्वागत केले. " अरे सुनील तू पण आहेस! या ना दोघे. बरं झालं दोघेही आलात." तीने दोघांनाही सोफ्यावर बसवलं आणि दोघांना पाणी आणण्यासाठी ती स्वयंपाक घरात गेली. दोघांच्या नजरा मात्र बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या तीच्या बहिणीकडे जाताच तणावपूर्ण झाल्या. ही तीची मोठी बहीण! दोघी बहिणी एकमेकींना जिवाभावाच्या मैत्रिणीप्रमाणेच होत्या. दोघीतली कुठलीच गोष्ट एकमेकींपासून न लपलेली! त्यामुळे आज तीची बहीण तिथे निवांत मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली होती. तीच्या बहिणीने भरतकडे पहात स्मित केलं. "तू भरतच ना रे? हल्ली आमच्या छोटीच्या तोंडून खूप ऐकायला मिळालं तुझ्याबद्दल! राहूलपेक्षा जास्त ती तुझंच नाव घेते. हं..." आणि तीच्या बहिणीने हसत परत आपलं लक्ष्य मोबाईलमध्ये वळवलं. सुनीलने भरतला चिमटा काढत खुणावलं. हळूच तो पुटपुटला, " भरत आहेच आमचा असा! कोणीही नाव काढतं त्याचं. आता तू पण काढशील!" एवढं बोलून त्याने भरतकडे पाहत हळूच डोळा मारला. कदाचित तीच्या बहिणीच्या ते लक्षात देखील आलं. तेवढ्यात पाण्याचे दोन ग्लास घेऊन ती आली. "पाणी घ्या. बरं, चहा घेणार की कॉफी? भरत तुला काय आवडतं?" मध्येच तीला थांबवत सुनील म्हणाला, "सगळं त्याच्याच आवडीने कर.मला नको हा विचारू. भरत चहा पण नाही घेत आणि कॉफी पण! आता बोल काय करते?" तेवढ्यात मोबाईल बाजूला ठेवत तिची बहीण म्हणाली, "त्याला छोटीच्या हातचा चहा घ्यावा लागेल आज. आमची छोटी खूप चांगला चहा करते. हं, तुला चालत नसेल तर तुझ्यासाठी आपण कॉफी करू" असं म्हणत तीला चहा करण्याचा आग्रह करण्यात आला. ती आत चहा करण्यासाठी गेली. थोड्या वेळात चहा आलाही आणि तो घेत त्यांच्या गप्पा देखील रंगल्या. चर्चा तीच्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल सध्या चालू होत्या. तीच्या बहिणीने भरतकडे पहात सांगितलं. भरत एक काम कर, तीने काढलेले काही फोटोग्राफ्स तीने कम्प्युटरमध्ये जपून ठेवले आहेत. जा तुम्ही दोघे जाऊन पहा. ती तुला दाखवेन. एवढं म्हणत तीने तीला खुणावत भरतला घेऊन जाण्यास सांगितलं. भरत थोडा संकोच करतच तिच्यासोबत तीच्या रूममध्ये गेला, जिथे तीचा कम्प्युटर होता. सुनील देखील भरतसोबत निघालेला पाहून तीच्या बहिणीने त्याला खुणावत त्याला तेथेच बसण्यास सांगितलं. सुनील आणि भरत विचारचक्रात फिरत होते. दोघांना काही समजत नव्हतं. राहुलचा विषय मध्येच निघालाही एक दोन वेळा गप्पा करताना पण त्या दोघींनी तो मुद्दाम टाळला होता. 


   ती आतमधल्या रूममध्ये तीने काढलेले काही फोटोग्राफ्स भरतला दाखवत होती पण तीचं पूर्ण लक्ष भरतकडे होतं. भरत थोडा बैचेन होता.त्याला तीचं असं वागणं बोचत होतं. त्याने न राहवून तीला विचारलंच," तू मला नेमकं का बोलवलं आहेस? राहूलचं आणि तुझं काही झालंय का? माफ कर पण मला तुझं वागणं नेमकं समजत नाहीये!" आता तीचे डोळे भरून आले होते. ती अगदीच मन भरून रडणार असं वाटत होतं. तीने अचानक भरतच्या हाताला स्पर्श केला.तीची भावना जणू तीने त्याला दिली होती हाताला स्पर्श करून! तीचे डोळे पाणावले होते. ती पाणावलेल्या डोळ्यांना साक्षी ठेवत मनातलं उलगडायला तयार झाली. "भरत! मी जे काही सांगणार आहे ते नीट ऐक. गैरसमज,समज असं करत लगेच निष्कर्षाला जाऊ नको. तू समजशील माझ्या भावना." असं म्हणत तीने भरतने चोरलेल्या हाताला आपल्या हातात हात घेत त्याला जवळ केलं. भरतसाठी हे सगळं विचाराच्या पलीकडे होतं. त्याच्या डोक्यात मुंग्या आल्या होत्या. काहीच समजत नव्हतं. त्याचा हात जड झाला होता. ती बोलतच होती, " भरत, मी आधी फक्त तुझ्याबद्दल ऐकलं होतं. थोडं अनुभवलंही, फोन कॉल वरून! परत तुला भेटल्यावर मला काय झालं माहीत नाही....पण मी बावरले, स्पंदनांना अनुभवत अलबेल झाले. माझा दिवस आणि माझी रात्र मी तुझ्या विचारांनी काढत राहिले. माहीत नाही भरत पण का? कशी? केव्हा? पण मी तुझ्या प्रेमात पडलेय भरत! खरंच भरत मी अगदी खरंच तुझ्या आणि फक्त तुझ्या प्रेमाने वेडी झालेय! आय लव्ह यू भरत, आय लव्ह यू सो मच!" असं म्हणत तीन तीच्या अश्रूंना वाट काढून दिली. ती अगदी लहान होऊन रडत होती, तीच्या निरागस सोंदर्याप्रमाणे अगदी प्रामाणिक! भरत हवालदिल झाला होता. त्याने तीच्या हातातून हात काढत तीला विचारलं, " आणि राहूल? ते काय होतं? ते प्रेम नाही? तू काय बोलत आहेस तुला काही समजत आहे ?आर यू ओके?" 

    " हो! ती ओके आहे." त्या दोघांच्या मागून एक विश्वासपूर्ण आवाज आला. तीची बहीण होती ती! सोबत सुनील देखील! सुनीलला कदाचित सगळं समजलं होतं. त्याला बहुदा तीच्या बहिणीने सगळं सांगितलं असावं. सुनील स्तब्ध होता पण तो देखील तीच्या बाजूने काही बोलण्यासाठी आला होता असं वाटत होतं. तीची बहीण पूढे सरसावत थोरल्या बहिणीच्या अधिकाराने कमी पण एक मैत्रीण म्हणून काही सांगत होती. " भरत, छोटीसाठी राहूल कदाचित या वयातील आकर्षण असावं! ती त्या आकर्षणातून त्याच्याकडे ओढली गेली होती. मला कधीच तीच्या डोळ्यात राहूलबद्दल तीचं प्रेम दिसलं नाही जेवढी तुझ्याबद्दल बोलताना तीच्या डोळ्यात चमक होती. तीने तुला पाहिल्यापासून, अनुभवल्यापासून वेगळ्या दुनियेत वावर करायला चालू केला आहे. ती एका नव्या अनुभवाच्या विश्वात आनंदात नाहत आहे. भरत! तीचं खरं प्रेम तीला जाणवलं आहे. मी पाहिलंय तीला तुझ्या विचारात हरवून जाताना, वेडं होऊन हसताना..अगदी आणि अगदी पहिल्यांदाच ! तू गैरसमज करून घेऊ नको. तीला फक्त कबुली द्यायची होती तीच्या प्रेमाची! म्हणून तुला बोलावलं होतं. तीची हिम्मत होत नव्हती, मीच हिम्मत दिली आहे तीला. ती माझी बहिण आहे आणि तीची असहाय्य तगमग मला देखवली नाही. म्हणून तुला बोलवलं. समजून घे." 

"राहूल माझा मित्र आहे! त्याचं हिच्यावर असणारं प्रेम? त्याचं काय?" भरत परेशान झाला होता. सुनीलने भरतच्या पाठीवर हात देत भरतकडे पाहिलं, " त्याचं प्रेम? मित्रा, तुझ्याशिवाय जास्त त्याला कोणी ओळखत नसेल कदाचित! त्याचं प्रेम काय आहे मलाही माहीत आहे. यारा, किस्मत यूँही नही मिलाती दो जिंदगी की दास्ताँ, कभी इश्क़ समझता नहीँ आजमाते समय, कभी इश्क़ समझता हैं महसूस करते समय! तीच्या डोळ्यात डोकावून पहा मित्रा! तीचे अश्रू तुझ्यासाठी आहेत, त्याच्या विरहासाठी नाही. चुकलेल्या प्रेमाला दिशा दे यार! समजून घे तीला!" 


   भरत निशब्द होता! तीच्या स्पर्शात त्यालाही पहिल्यांदाच एका सोज्वळ प्रेमाची अनुभूती झाली होती. तीचे ओघळणारे अश्रू भरतला जुलमी नजरेने गयावया करत, भावना ओल्या करत काही सांगत होते. भरतने तीच्या झुकलेल्या केविलवाण्या नजरेकडे पहात तीला जाताना एक निरोप पोहचवला होता. तो निरोप तीने हेरला होता, कारण तीच्या प्रेमाला भरतच्या भावनेची भाषा काही क्षणाच्या स्पर्श गंधाने अभिजातपणे द्यायला वेळ लागला नव्हता. तीने अश्रू पुसत त्याला तीच्या घराच्या उंबरठ्यावरून निरोप दिला. तीने हलकंसं झालेल्या आपल्या मनाला समजूत घालायला एव्हाना सुरुवात देखील केली होती!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance