गोविंद ठोंबरे

Others

2  

गोविंद ठोंबरे

Others

असेही भेद वाट्यास यावे?

असेही भेद वाट्यास यावे?

4 mins
9.7K


आज थोडा उशीरच झाला सकाळ पहायला! उशीराच अंथरून सोडले आणि सर्व काही आवरायलाही बराच वेळ लागला.थोडासा थकवा जाणवत होता आणि रात्री तापही अंगात भरला होता त्यामुळे मरगळ आल्यासारखी वाटत होती. घराबाहेर पडताच अण्णाच्या हॉटेलवर आलो आणि एक कप चहा घेतला. थोडं बरं वाटलं मनाला ! वर्तमानपत्रात आज न डोकावताच तसाच चहाचा कप ठेवत अण्णाला पैसे दिले आणि निघालो तेवढ्यात अण्णाने विचारलेच, "काय झालं सरजी बरं वाटत नाहीये का? चेहरा सुकल्यासारखा वाटत आहे.." मी उत्तरलो, "हं.. जरासा ताप आहे अंगात, गोळी घेतो मेडिकलवरून बरं वाटेल." एवढं बोलून बाहेर निघालो आणि अण्णा मागून ओरडतच म्हणाला, "अरे घरी आराम करा हो सरजी गोळी घेऊन, काळजी घ्या!" मी फक्त हात दाखवत होकारार्थी मान हलवली आणि बाहेर पडलो. अण्णामुळे परक्या गावात कोणीतरी आहे आपलं असं मनातच वाटू लागलं! काही का असेना अण्णाने विचारपूस केली यातच समाधान!

जाता जाता मेडिकलवर गोळी घेतली आणि कंपनीमध्ये पोहोचलो की घेऊ या हिशोबाने रिक्षास हात दाखवला. कंपनी गाठेपर्यंत बराच उशीर झाला होता आज आणि तसा तसा माझ्या अंगात तापही वाढत चालला होता! थोडा अस्वस्थपणा अजूनच वाटू लागला. रिक्षातून उतरल्या उतरल्या कंपनीचे फाटक गाठले आणि तिथेच तापाची गोळी घेतली पाण्याबरोबर! सुरक्षा रक्षकाने लगेच विचारले, "साहेब बरं नाही का? कसली गोळी घेतली?" "अरे काही नाही भाऊ, जरासा ताप आहे. जास्त काही नाही, आता गोळी घेतलीये बरं वाटेल! " मी भाऊच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. भाऊने लगेच माझा हाथ पकडून पहिला आणि तो थोड्या मोठ्या आवाजातच उद्गारला, "कसलं बरं वाटणार आहे? ताप केवढा आहे पाहिलत का? निघा घरी.. आराम करा, नाहीतर एक काम करा इथेच माझ्या केबिन रूममधे जाऊन पडा. बरं वाटलं की मग घरी जा!" मी थोडं स्मित चेहऱ्यावर आणत म्हटलं, "भाऊ,काळजी नाही रे, बरं वाटेल मला आता! गोळी घेतलीये मी. ठीक नाही वाटलं तर मी जाईन घरी. चल मी येतो! " एवढं बोलून भाऊ काहीतरी म्हणत आहे हे कानामागे टाकतच मी आत मध्ये प्रवेश केला. भाऊ पण भला माणूस वाटला ! किती काळजी यांना माझी! नातलग लोकांपेक्षा ही काय कमी आहेत का असं मनाला वाटू लागलं. असं वाटणं ही सहाजिक आहेच की! परकी लोकं जर एवढ्या आपुलकीने आणि काळजीने मनात शिरत असतील तर वाटणारच हे!

मी माझ्या केबिनकडे आलो आणि खुर्चीत विसावलो तोच म्हात्रे लगबगीने माझ्याकडे ओरडतच आले,"अहो किती उशीर आज? कुठे होता? साहेब किती वेळ झाला तुमची वाट पहात आहेत. लवकर जा त्यांच्या केबिनमध्ये. भयंकर चिडलेले आहेत साहेब." मी लगेच खुर्चीतून उठलो आणि माझ्या साहेबांच्या केबिनकडे निघालो. मी बेफिकीरपणे विचार करत निघालो होतो! कारण मला माहीत होतं की साहेब माझ्यावर ओरडणार नाही. मी काही नेहमी नेहमी उशीर करणारा माणूस नव्हतो आणि कामचुकार व्यक्तीही! माझी कधीच कोणती तक्रार साहेबांकडे जात नसायची. त्यामुळे साहेब मला काही बोलतील उशीरा येण्याबद्दल मला वाटत नव्हतेच! वरून माझा चेहरा पाहताच साहेब मला विचारतीलच की काय झालं? माझ्याकडे कारणही आहे खरं ते. त्यामुळे मी बिनधास्त पण सुकल्या चेहऱ्यानेच साहेबांच्या केबिनमध्ये गेलो. साहेबांनी मला पाहताच हातातली फाईल खाली ठेवली आणि ते रागातच ओरडले, "ही पद्धत आहे कामावर यायची? किती उशीर झाला आहे माहीत आहे का? मी काही बोलत नाही तुम्हाला म्हणून गैरफायदा घेता की काय ? तुमच्यामुळे इथे कामाचा किती खोळंबा झाला आहे माहीत आहे?" मी काही प्रत्युत्तर देण्याआधीच साहेबांनी कानाला फोन लावला आणि मला काही न बोलण्यासाठी खुणावले. मी तसाच शांत उभा राहिलो. साहेब फोनवर बोलत होते, "हं.. नमस्कार ! आमचा माणूस आलाय. मी एक काम करतो, माझ्या माणसाला सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्याकडे पाठवतो. त्याला तुम्ही सर्व बाबी विचारून घ्या आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला एक फोन करा. बाकी आमचा माणूस तसा हुशार आहे तुम्हाला नक्कीच सर्व बाबी व्यवस्थित सांगेलच याची खात्री आहे मला, चला फोन ठेवतो." असं म्हणत साहेबांनी एक फाईल माझ्याकडे देत सांगितलं, "हे पहा, हे आपले जुने ग्राहक आहेत. आपल्या कंपनीच्या नवीन प्रोडक्टबद्दल त्यांना व्यवस्थित समजावून सांग. ते यामध्ये गुंतवणूक करायला तयार झालेच पाहिजेत! ही सर्व गोष्ट तुझ्या हातात आहे. मला जरा एका फॅमिली इव्हेंटसाठी बायकोसोबत बाहेर जायचं आहे, त्यामुळे या मिटिंगसाठी मला जाता येणार नाही. ओके तर तू निघ लगेच आणि मिटिंग कुठे आहे ते बाहेर विश्वासरावला विचार," म्हणत त्यांनी मला जायला सांगितलं. मी ठीक असे म्हणत कॅबिन सोडत असतानाच साहेब परत उद्गारले, "आणि हो, आजसारखा उशीर परत-परत नको करू. आपण इथे नोकरीला आहोत मालक नाही याचा विसर कधी कोणत्या एम्प्लॉयीला पडता कामा नये हे लक्षात ठेवत चला! " हा टोमणा खात मी अजूनच अस्वस्थ होऊन माझ्या केबिनकडे वळलो. विश्वासरावला मिटिंग कुठे होणार आहे याचा पत्ता विचारला आणि सर्व मिटिंगसाठी लागणारा लवाजमा सोबत घेत थोडासा माझ्या केबिनमध्ये खुर्चीत विसावलो !

खरं तर मनात विचार दाटू लागले. तापापेक्षा भयंकर मला विचाराने जाणवू लागले! तो अण्णा आणि सुरक्षा रक्षक भाऊ... त्यांना माझ्याबद्दल आपुलकी का असावी ? की त्यांनी मला पाहताच ओळखावे मी आजारी आहे. त्यांना माझा चेहरा कसा वाचता आला असावा? अस्वस्थ माणसाचा चेहरा खरं तर न वाचण्याइतका व्यक्ती मी स्वतः तर कधी पाहिला नाही. मग हे सर्व त्या दोन परिचित व्यक्तींना दिसलं तर मग साहेबांना ? साहेबांना दिसलं असेल तर मग त्यांना कामापुढे किंवा स्वतःच्या खाजगी जीवनापुढे आपल्या सोबत काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल थोडीही भावना नाही? या धावत्या जगात भावना आणि आपुलकी यातही भेदभाव असतात हे जाणवू लागलं. आपलं कर्तव्य हे कर्तव्य असतं कोणावर उपकार नाही, उगीच वाटायला लागलं. इमानदारीने काम करणे म्हणजे काही खूप मोठे कौशल्य नाही असं मनात धक्के मारत कोणीतरी सांगू लागलं. आपण ज्या कामाचे पैसे घेतो त्यापुढे कसल्याही प्रकारचे खरे अथवा खोटे बहाणे गैर असतात हे खरं वाटू लागलं. आपण बहाणेबाजी करू अथवा न करू, शेवटी भेद हे वेगवेगळे असतात. भावना आणि आपुलकीतले भेद अनुभवताना खरं तर शीण आला होता मनाला..


Rate this content
Log in