भास-आभास
भास-आभास


मी 5 ते 6 दिवस जरा बाहेर फिरायला काय गेले, ती घरात कुठेच दिसेना ? बरं घरी आले आणि ताजीतवानी होऊन स्वयंपाकघरात शिरले ! तरीही हिचा पत्ताच नाही ? अशी 6 दिवसांत कुठे गायब झाली ही ? नेहमी माझ्या अंगाखांद्यावर खेळणारी, आणि एवढी हुशार काय सांगू तुम्हाला ? स्वतःचा तोल अगदी उत्तम सांभाळून घेण्याची कला जन्मजातच की काय ? आईच्या पोटात असल्या पासूनच, तिच्या आईकडूनच परंपरेने तिला मिळालेली जणू ! आताही असंच वाटत होत की, अचानक समोरून येईल पटकन उड्या मारत आणि मला मिठीच मारेल की काय ?
मला आठवते आहे ती, सतत तिचेच भास आणि आभास,विचारांत पण तीच ! हैराण झाले मी तर ! मन सैरभैर होत तिलाच शोधत होते. का ? कोणास ठाऊक ? काय हे नात होत ? जगावेगळं ! ती नव्हती आणि तिच्या आभासाचे कित्येक क्षण माझ्या मनःपटलावर आघात करत होते ! तिची आई तर घरातच होती म्हणजे न बोलावलेले पाहुणे, बरोबर ओळखलं ! तेच ते बिन बुलाये मेहमान ! दोघी मायलेकी आमच्याच घरात बस्तान मांडून बसलेल्या ! किती प्रयत्न केले मी त्यांना बाहेर काढण्याचे पण त्या प्रयत्नांचा परमेश्वर काय मला दिसला नाही ! शेवटी मी नादच सोडला आणि अतिथी देवो भव असं समजावलं माझ्या बंडखोर मनाला !
2-3 दिवस असेच तिच्या भासात गेले,पण एक दिवस असा उजाडला ज्याची मी कल्पनाच नव्हती केली. काही कारणाने मी मधल्या रूमच्या बालकनीत गेले.कसलातरी घाणेरडा,भयंकर वास येत होता. मी जात नाही शक्यतो त्या रूम मध्ये,तसं काही काम असल्या शिवाय.पण आज कामच तसं होतं मला आणि तिथे जाणं जरूरी होतं. मी ईकडे तिकडे निट पाहिलं,त्या कुबट वासाच्या दिशेने..! तीऽऽऽ.....हो तिच..! तिच होती ती...! तिथे नको त्या दमट वातावरणात निपचित, मरणासन्न अवस्थेत पडून होती. डोळे सुकून गेले होते, तिची अंग कांती अगदीच निर्जीव झालेली होती. मला तो घाणेरडा वास आणि तिला असं पाहून मळमळू लागलं ! मी ती मळमळीची भावना थांबवत शांतेला हाक मारली !शांता तू ह्या 5-6 दिवसांत इथे फिरकली पण नाहीस की काय ? माझा तिला पहिला प्रश्न ! तिने माझ्या तोंडाकडे आ ऽऽऽऽऽ वासून पाहिलं आणि म्हणाली ताई आवो रोजच कचरा,लादी करत व्हती म्या पण ही मला दिसली कशी नाही ? काय माहीत ? मी म्हटलं तिच्या ह्या अवस्थेला नक्कीच 4 दिवस झाले असतील म्हणजे तू अशी कामं करतेस तर ? माझ्या वटारलेल्या डोळ्यांत सामावलेल्या प्रश्नांचे क्षेपणास्त्र शांतेनं शांतीने अचूक टिपले आणि माझ्या हातातून झाडू आणि सुपडी घेत म्हणते कशी ,"ताई...! आणा हिकडं तो झाडू ! म्या काढते ती मेलेली करडी पाल ,द्या हिकडे ! मी काही न बोलता मॅडमच्या हाती झाडू सोपवून किचनमधे शिरले !
मी किचनमधलं खालच कपाट उघडलं आणि हे काय ? क्षणार्धात माझ्या अंगावर सरकन् काही झेपावल ! तो प्रसंग एवढा रोमांचकारी होता की माझ्या अंगावर काटे उभे राहिले ! तिची आई माझ्या दिशेने झेपावली होती आणि मी दचकून उडालेच ! परत तशीच ती करडी पाल आणि तिचा आभास ....!