आगमन
आगमन
काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात, आपण कितीही आणि कोणत्याही प्रकारचे सगळे प्रयत्न करू पण त्यात यश येईलच याची शाश्वती शून्य असते.......आपण फक्त धीर नाही सोडून द्यायचा.........!
कृती दर महिन्याला असं स्वतःलाच बजावण्याची कसरत करत असे. दर महिन्याला तिला पाळी येऊन गेल्यावर निराशाच तिच्या पदरात पडत असे.... पण तिने हार नाही मानली. ८-९ असे करता करता लग्नाला १२ वर्षे झाली... तिने आणि तिचा नवरा कुश ह्यांनी संपूर्ण विचारांती एक आशावादी सकारात्मक असा निर्णय घेतला. एक अनाथ झालेलं शिशु अवस्थेतलं मुल दत्तक घेण्याचा.... अर्थात विरोध करायला घरात मोठी मंडळी कोणी नव्हतीच......ते आधीच देवाला प्रिय झाले होते.
ठरलेल्या दिवशी सगळे कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि एक चार महिन्याच पोरकं मुल कृती-कुश ह्यांच्या जीवनात आलं. क्रिशच्या आगमनाने कृती, कुशचे जीवन ऊजळून त्यात रंगीबेरंगी रंग भरू लागले होते. त्याच्या बाळलीला आणि प्रेमानी, दोघेही सुखावले होते आणि त्यांच कोरडं आयुष्य क्रिशच्या प्रेमाने ओतप्रोत आणि तुडूंब भरून गेले आणि एक दिवस कृतीला अचानक चक्कर आली, डाॅक्टर ने सांगितलेल्या सगळया तपासण्या झाल्या आणि एक आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनात आला, ज्याची ती दोघे एवढी वर्षे आतुरतेने आणि तीव्र इच्छेने वाट बघत होती. ती आई होणार होती. आणि दोघेही ह्याचं श्रेय क्रिशला देत होते. त्याची पाऊले त्यांच्या आयुष्यात नविन वळण घेऊन आली......!
क्रिश एक आनंददूत ठरला होता आणि दोघांनी त्यांच्या दोन्ही मुलांत कधीही भेदभाव नाही करायचा असा ठराव पास केला आणि नविन पाहुण्याच्या आगमनाने क्रिशचे अधिकच लाड होऊ लागले. किर्ती आणि कुशने एका अनाथ मुलाला जीव लावून त्याला त्याच्या उज्वल भविष्याची हमी दिली आणि क्रिशच्या पावलांनी त्यांच अवघं जीवन उजळून टाकलं. दोन वेगवेगळ्या आयुष्यांनी एकमेकांच्या आयुष्यातली कमीच दुर केली होती आणि अवघे कुटुंब परिपूर्णतेचा आस्वाद घेत आनंदाने जगत होते.....! दोन्ही अनाथ जीवने एकमेकांच्या आगमनाने सुखावली होती........!