कवितेस पत्र
कवितेस पत्र
प्रिय कविता,
तुझे खूपखूप आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, कधीपासून वाट पाहत होते मी. मी मनकवडी आहे गं? मला ना असं कोणाशीही संवाद साधून आपलं मन मोकळं करताच नाही येत बघ. मग मला अचानक कळलं, मी इयत्ता आठवीत असताना... की, अरे? मला कविता...चारोळ्या... आतून माझ्या मनातून छान लिहिता येतात की! मग तुझा आणि माझा एकत्रित प्रवास सुरू झाला तो आजतागायत चालू आहे आणि शेवटपर्यंत चालूच राहील.
कविता तूच माझी जिवाभावाची मैत्रीण आहेस, तूच मला छान समजून घेतेस, मला ना ह्या शब्दांच्या अफाट विश्वात शब्दांचे पंख लावून मनसोक्त उडता येतं, त्यात तुझी अनमोल साथ असतेच... माझ्या दुःखात, सुखात! मग मी ही तुझे प्रेरक शब्द लेखणीला लावते आणि झोकून देते स्वतःला त्या अमर्याद कल्पनाशक्तीच्या विस्तारात..! कारण मला तुझ्यात टक्के-टोमणे मारणारं कोणीच नाही ना गं? मनमस्त मोर बनून थुईथुई नाचत राहतं बघ! मी फक्त कवितामय प्राणी आहे... तुझ्यासाठी जेवढे लिहीन तेवढे कमीच वाटत आहे... कशी होऊ गं उतराई?
तूझी साथ अशीच असू दे, माझ्या अंतर्मनातून लेखनात अशीच प्रकट होत रहा. मी ही तुला सोडणार नाही कधीच, कारण तूच माझ्या रक्तात... श्वासात... माझ्या तनामनात भिनलेली आहेस. कारण मला माहित आहे,
कधी सकारात्मक-नकारात्मक
&
nbsp; अशी माझी तू कविता
कधी प्रेरक-बंडखोर
अशी माझी तू कविता
कधी मनमोकळी-अबोल
अशी माझी तू कविता
कधी प्रेमळ-रागीट
अशी माझी तू कविता
पण सगळ्यात अनोखी
अशी माझी तू कविता
अशी माझीच तू कविता..!
कविता? तुझ्यासाठी अजून खूप काही शिकायचं आहे, मी जीव ओतून प्रयत्न करते आहे. तू मला घेऊन खूप पुढे जाणार मला ठाऊक आहे, मी कोणत्याही स्पर्धेत विजयी होवो अथवा न होवो...पण मला तुझ्यातून व्यक्त होता येतं... मला बोलता येतं आणि ही गोष्ट माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकतच नाही. तूच माझ्यात ओतप्रोत व्यापून राहिली आहेस, ह्यापुढे ही अशीच... माझा श्वास आणि ध्यास बनून रहा, हीच तुला माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे!
तुझीच फक्त तुझीच
जीवश्च कंठश्च मैत्रीण