उलगडा रहस्याचा - कथा चौकट
उलगडा रहस्याचा - कथा चौकट
आजपण ती सतत नजर खिळवून बसली होती त्या भिंतीवरच्या एकमात्र वेगळ्या टाईल कडे.काहीतरी होतं जे तिला खेचून घेऊ पाहत होतं.एक गुढ अतिशय आकर्षित करणारी टाईल. इतर टाईल्स सारखीच पण का माहित का मृणाल तिच्यात गुंतत चालली होती अनपेक्षितपणे...जसं की कुणी तिला बोलवत आहे अतिशय आर्ततेने...खोलवर भावनेच्या व्याकुळतेने...की ये ! ...इथे ये !....मी आहे इथे ! वाट पाहतंय कुणीतरी अशाच पद्धतीने...मृणालने आतून कितीही नाही म्हटलं तरी टाळू शकतच नव्हती.पण का ? का ? हे पण का तिचा जीव नकोसा करत होतं.पुन्हा ती त्या टाईल कडे जात होती तिच्या मनाविरुद्ध.जणू त्या टाईलने एक चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं होतं आणि ती त्या दिशेने ओढली जात होती... नकळतपणे तिने तिचा डावा हात हळूच पुढे केला जणू आज काय ती सोक्षमोक्षच लावणार होती या सर्व गोष्टींचा आणि तिचा हात टाईलला स्पर्श करणारच होता इतक्यात टिंग..टाँग..टिंग...टाँग..टिंग..टाँग आणि बापरे मृणाल भयंकर दचकून झटकन त्या टाइल पासून लांब गेली.दरदरून फुटलेला घाम पुसत ...अरे देवा ! दारावरची बेलच वाजलीये मृणाल किती घाबरलीस ? तिने स्वतःलाच मनात म्हटलं. एक आवंढा गिळला कसाबसा आणि ती दरवाजा उघडायला सरसावली.तिने दरवाजा उघडला एक डिलिव्हरी बाॅय एक पार्सल घेऊन आलेला.मॅम पार्सल ! हां भैय्या लाओ ..दे दो ! मृणाल म्हणाली. त्याने पार्सल तिच्याकडे सुपूर्द केलं आणि तो तिच्याकडे विलक्षण अशी विचित्र नजर टाकून जायला निघाला पण..ती म्हणाली भैय्या पैसे ? मॅम इसके पैसे नही लगेंगे मतलब किसीने आपको भेजा है. किसने भेजा है ? कहाँ से भेजा है ? इतना तो बताते जाओ ?
मॅम..भेजने वाले ने कुछ भी मेंशन नही किया.इतकं बोलून तो झटकन निघूनही गेला.विचित्रच माणूस आहे तिच्या तोंडून निघालंच शेवटी.पण तरीही तिची नजर हातातल्या पार्सलवर गेली आणि लगेच तिने ते उघडायला घेतलं.वरचा कागद फाडला आणि आत एक बॉक्स होता...तो उघडला त्याच्या आत पुन्हा एक बॉक्स...पुन्हा त्या बॉक्सच्या आत दुसरा बॉक्स....पुन्हा तिसऱ्यात चौथा...चौथ्यात पाचवा.....असे करत करत तिने एकात एक असे शंभर एक बॉक्स उघडले....भयंकर चिडली..वैतागली आणि थकून गेली ती पार.कोणी असला फालतू खोडसाळपणा केलाय माझ्या बरोबर काय माहित ? मूर्ख, बेअक्कल ! हम्म ! तोंड वेडवाकडंच केलं तिने जणू काय ज्या माणसाने /बाईने हा सर्व उद्योग केलायं तिला असं पार्सल पाठवून त्रास देण्याचा... त्यांना दिसणारच होतं की काय ते वाकडं तोंड ? मरो तिकडे ...स्वतःशीच म्हणाली आणि त्या बॉक्स मधून तिने तिचं लक्ष अक्षरशः वळवलंच दुसरीकडे.
आता जेवण बनवून वगैरे संध्याकाळ पासून रात्रीपर्यंतचे सर्व दैनंदिन सोपस्कार पार पाडू पर्यंत तिला बिछान्यावर आळोखेपिळोखे द्यायला चांगले बारा वाजले.तिने पहाटे सहाचा अलार्म लावला आणि तिने मस्त तिच्या आवडीची मखमली उबदार दुलई अंगावर घेत झोप ताणून दिली.साधारण एक तासाने अचानक जोरजोरात हवा सुटून तिच्या घराच्या खिडक्यांच्या काचा थरथरू लागल्या.अर्ध्यावर हवेसाठी बंद असलेल्या दुसर्या खिडकीतून हवेचा भेसूर आवाज येत होता....वू..वू..वू..वू..वू..वू..वू..वू.वू ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ मृणालला पुन्हा दरदरून घाम फुटला....झोपेतच एक मोठा आवंढा तिने गिळला....एवढी जोरदार हवा असताना सुद्धा इतका घाम ? तिने डोळे न उघडताच मनात म्हटलं. काय होतंय ? काय घडतंय ? तिची तर जरा डोळे उघडून बघायची हिंमत होईना.मी...मी तर दारे..खिडक्या निट बंद केली होती मग हे कसं काय होतंय ? गणपती बाप्पा मोरया ! ॐ नमः शिवाय ! ॐ हनुमते नमो नमः ! आता तिने तर हनुमान चालिसाच म्हणायला सुरुवात केली तेही जोरजोरात अगदी...भूत बित असेलच तर चांगलं त्याच्या अख्ख्या कुटुंबातील इतर भूतड्यांना ऐकायला जायलाच हवं इतक्या मोठमोठ्या आवाजात ती हनुमान चालिसा म्हणत राहिली अजूनही डोळे बंदच होते तिचे...बिछान्यात ! इतक्यात जोरात काहीतरी धप्पकन् पडलं ....तिच्या हनुमान चालिसेला खंड पाडेल इतका मोठा आवाज झाला.ती घाबरून क्षणभर थांबलीच...बिछाना घट्ट पकडून निपचित पडून राहिली आता मात्र तो आवाज ऐकून तिची काही हूं का चूं करायची हिंमत होत नव्हती. फडफडफडफडऽऽऽऽऽ पुन्हा एक जोरदार फडफडता आवाज कानी आला आता मात्र तिला डोळे उघडावेच लागले आणि ती ताडकन बिछान्यात उठून बसली. देवा ! स्वप्न होतं हे ? हुश्श ! तिने चेहर्यावरून हात फिरवला आणि तिला जाणवलं की वास्तवातली तिच्या चेहर्यावरून प्रचंड घाम गळत होता. काय चाललंय हे माझ्या बरोबर.....असं म्हणण्या आधीच आज पार्सल मध्ये आलेल्या बॉक्सने तिचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.ईईईईईई ! हा मेला बॉक्स मला झोपू पण नाही देत आहे ? आणि लगेच उठलीच ती ...झोपमोड तर झालीच होती मग काय तिला आठवलं त्या बॉक्स मधले इतर बॉक्स तिची वाट पाहत असतील.मग काय ती पहाटे तीनलाच पुन्हा एका बॉक्समधले अनेक बॉक्स काढत राहिली..फाडत राहिली शेवटी चार वाजायला एक मिनिट बाकी असताना एक इंचाच्या बॉक्समध्ये तिला कसला तरी चौकट आकाराचा तुकडा आढळून आला.काय मजाक आहे राव कोणी इतकी फालतूगिरी केलीये काय माहित...शी ! इतके तळतळाट द्यावे वाटत होते ना तिला आतून त्या बाई/माणसाला की विचारूच नका.पण तो तुकडा कुठेतरी पाहिल्या सारखा वाटला तिला कुठेतरी साधर्म्य जुळत होतं पण लक्षात नव्हतं येत तिला. उममममम् ! कुठे पाहिलंय मी हे असं काहीतरी ? मरो...जाऊ देत तिकडे चुलीत असं म्हणत तो धोटासा तुकडा तिने भिंतीवर भिरकावून लावला..येडे लोक कुठले ! काहीही म्हणजे काहीही करतात वात्रट मेले...हा काय प्रकार होता जोक करायचा...माझी सुखाची झोप हिसकावून खराब केली मेल्यांनी ...बाई का माणूस ते ही माहिती नाही आपल्याला...देवा कुठे फोडावा हा वरचा नारळ नेऊन....एक मिनिट....मी का माझा नारळ फोडू...मी थोडी चुकलीये ? मृणाल काहीपण असतं हा तुझं ...असं म्हणून चक्क स्वतःलाच एक टपली दिली तिने.....आणि वर वेडी कुठली असंही म्हणाली स्वतःलाच ! चला आत्ता काय पुन्हा झोप यायची नाही ..तर फक्कड काॅफी बनवून घेऊ असं म्हणत उठलीच ती लगेच.मृणालची ना एक गोष्ट भारीच होती बोलली की केलंच पाहिजे लगेच अशी होती ती एकदम तडका फडक आणि झालंच समजा कोणतंही काम.एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं तिने गॅसवर आणि काॅफी मग..साखर..चमचा असं सामान ओट्यावर काढून ठेवलं तिने आणि गेली तोपर्यंत काही काम आहे का घरात राहिलेलं कालच ते पहायला.हाॅल मधून जाता येता तिची नजर पुन्हा त्या विचित्र टाईल कडे गेली...मी असं काहीतरी बघितल्याचं आठवतंय पण लक्षात का नाही येत आहे....उममममम्.....अरे हा ! ही डिझाईन आणि तो बॉक्स मधला तुकडा सेमच आहेत तर आहेत ना मृणाल ? आणि तिने टाईल अगदी जवळ जाऊन पाहिली तर तिथला एक चौकट आकाराचा तुकडा गायब होता.अच्छा....आत्ता आलं लक्षात तो बॉक्स मधला तुकडा जो काल मोठा असाच हवेत भिरकावून लावलास ना तू मृणाल...तो या टाईल चा एक छोटा भाग आहे जो तू विचार न करता भिंतीवर आपटून फेकलास......किती हुशार आहेस मृणाल तू....उफफफफफ् ! माझ्या बरोबरच का होतंय हे सगळं ! हममममममम् ! गाढव,मूर्ख ते पार्सल वाले आणि मी त्यात इतकी हुशार..हुशार वागलीये ना ......मला राग येतोय आता स्वतःचाच.....चला ढुंडाळा आता सगळीकडे तो टाईलचा तुकडा.मग काय तिने भिंतीवर आपटून तो तुकडा भिंतीला लागून असलेल्या सोफ्याखाली गेला असणार हा अंदाज बांधला आणि तो सोफा एकटीने कसाबसा सरकावून तो तुकडा शोधायचा प्रयत्न केला पण काही केल्या तो टाईलचा तुकडा काही तिला मिळालाच नाही.पुन्हा गाढव हमाली करत कसाबसा तो सोफा तिने जागेवर सरकावून लावला आणि काय तो चौकटी टाईल चा तुकडा नालायक ...मेला अलगद सोफ्यावर विराजमान झालेला दिसला.घ्या ! काखेत कळसा नी गावभर वळसा असं बोलून कपाळावर हात मारून घेतला तिने स्वतःच्याच.आता इतके स्वकष्ट करून आणलेला म्हणजे मिळवलेला तो टाईलचा छोटा तुकडा घाम पुसत..पुसत घेऊन ती हॉलमध्ये परत गेली. तिने तो छोटा टाईलचा तुकडा त्या हाॅलच्या भिंतीवरच्या टाईल निघालेल्या चौकटी खोबणीत बसवायच्या प्रयत्नात त्या चौकट तुकड्याला एकदम जवळ नेलं...आणि एकदम फटकन ती त्या हातातल्या तुकड्यासकट त्या इवल्याशा चौकटी खोबणीत खेचली गेली...तिलाही नाही कळलं इतक्या प्रचंड वेगात हे सगळं घडलं.एवढं अचानक की तिची पापणीही लवली नव्हती ! ती कुठल्यातरी भयाण अंधार वजा कोठडीत येऊन पडली होती ..किर्र गडद अंधार...कोणती जागा आहे ही आता ? अय्या काॅफीसाठी ठेवलेलं दूध उकळून..उकळून त्याची मावा बर्फीच झाली असेल आता नाहीतर गॅस फास्ट असेल तर मग नुसती साफसफाई..साफसफाई देवा..परमेश्वरा...पांडुरंगा....तेवढं दूध नको उतू जाऊ देऊस म्हणजे झालं ! मावा बर्फी परवडते एकवेळ....ऐकतोस ना देवा ऽऽऽऽऽ ?
राम..राम..राम..राम..राम..राम....वाचव रे हनुमंता ! मी कशी आले इकडे ? हसू की रडू ? काही कळत नाहीये असं मृणाल बोलतच होती की एवढ्यात......तिची नजर ती ज्या जागी येऊन टपकली होती तिथल्याच बेडवर गेली .काही पांढऱ्या रंगात चमकत होतं त्या वस्तूची स्वतःचीच एक वेगळी चमक होती जी अंधारातही अस्तित्वाची ग्वाही देत होती. आता मृणालच्या हातात ना मोबाईल ना टॉर्च ना काय ? होता तो फक्त निरुपयोगी इवलासा टाईलचा तुकडा जो इतकं मोठं कांड करून तिला इकडे घेऊन आला होता.काय आहे हे जे चमकतंय अंधारात ? असा विचार तिच्या मनाला शिवला तसा एक उजेड कुठून तरी अवतरला.. जणू एका क्षणात वीज चमकून गेली पण तिथे तर काळाकुट्ट अंधार होता आणि दार खिडक्या आहेत नाहीत काहीच कळत नव्हतं तिला...त्यात वीज कुठून चमकली ? पण तिने त्या क्षणात जे पाहिलं त्याने तिची दातखीळच बसली.समोरचं दृश्य पाहून फक्त घाबरावं की चक्कर येऊन घाबरून धाडकन् जमिनीवर आपटून बेशुद्ध व्हावं हे मृणालला काही केल्या कळतं नव्हतं.त्यात अजून एक वीज चमकली आणि आता तर तिला कोणीतरी त्या तिच्या हाततल्या टाईल सकट जोरात फेकून दिलं....ती बराच वेळ बेशुद्धावस्थेत पडून होती.जेव्हा तिला शुद्ध आली गॅसवर करपलेली मावा बर्फी तयार झालेली...नशीब दोन लिटर दूध ठेवलं होतं आज गरम करायला नाहीतर काही खरं नव्हतं मृणाल तुझं ? तिने पाहिलं ती जमिनीवर पडली होती तिच्या सोफ्याला लागूनच..हुशार आहेस मृणाल तू इकडे सोफा ठेवलास नाहीतर आज आपला कपाळमोक्षच होता ठरलेला.चला करपलेली मावा बर्फी पाहू....फेकू...पातेलं एक आजचा दिवस भिजवावं लागतंय स्वच्छ करण्यासाठी...आणि ती स्वतःशीच संवाद साधत उठली आणि कामाला लागली देखील.
आता बराच वेळ ती आवरून निवांत बसली होती पुन्हा त्या बॉक्सची फडफड चालू झाली ....आणि तिला आठवलं तिला एक महत्त्वपूर्ण काॅल करायचाय.....खरंतर आज या एकाच दिवसात इतक्या गोष्टी प्रचंड वेगाने घडल्या होत्या की तिला हे जे घडतंय ते खरं..खोटं..भास की कोणी काहीतरी मोठ्या प्रकारच्या घटनांच्या खाणाखुणा देत एका मोठ्या गुन्ह्यांकडे इशारा करत होते ...तिला काही कळत नव्हतं...पण तिने वेळ न दवडता नंबर फिरवला एक...शून्य..शून्य ! हॅलो....पोलिस ?
थोड्याच वेळात पोलिसांनी तिच्या घरच्या दरवाजाची बेल वाजवली.तिने आय होल मधून पाहिलं पोलिस होते...तिने दरवाजा उघडला! मिस मृणाल आपणच का मॅम ? हो मिच आहे मृणाल सर ...मी फोन केला होता तुम्हाला...कुठलं घर दाखवाल का मॅम....पोलिसांनी विचारलं ! हे बाजूचं उजव्या हाताला लागून असलेलं. मॅम किती दिवस झाले तुम्ही मिस अंजना यांना शेवटचं पाहिलंत ? साधारण तीन..एक महिन्यांपूर्वी ! ओके ...मॅम धन्यवाद ! आम्ही तपास सुरू करतो पण तुमची मदत लागेलच आम्हाला आणि हो तुम्ही शहराबाहेर जाऊ शकत नाहीत जो पर्यंत तपास पूर्ण होत नाही.हो सर मी शक्य तेवढी मदत करेनच आपल्याला.आणि इतका संवाद साधून पोलिसांनी तिच्या बाजूच्या घराचा दरवाजा तोडला...मृणालची धडधड वाढत चालली होती कारण पुढे काहीतरी भयंकर वाढून ठेवलेलं होतं याचा अंदाज तिला होता.पोलिसांची लगबग वाढली....त्यांची संख्या वाढली....अँमबुलंसच्या सायरनचे आवाज कानात घुमत चालले होते आणि मेंदू असंख्य विचारांनी काबीज केलेला होता मृणालचा.पोलिसांनी इतर मदतनीस आणि फोरेन्सिक टीम,हॉस्पिटल टीम बरोबर तपास करून एकेक पुरावे गोळा करत ....एकेक करून अनेक सांगाडे,मृतदेह स्ट्रेचरवर ठेवून बाहेर काढायला सुरुवात केली.मृणाल,पोलिस आणि तिच्या घराबाहेर आजूबाजूच्या परिसरातील लोकं इतके अनेक मृतदेह, सांगाडे पाहून घाबरून चक्रावून गेले.आणि जराही कुणाला इतकी वर्ष झाली त्या घरा बाबत ना संशय आला ना कुठल्याच मृतदेहाचा कुजका वास.जे चाललं होतं सारंच अनाकलनीय, अविश्वसनीय चाललं होतं.पोलिस जाताना मृणाल ला धन्यवाद इतकंच बोलून गेले.पण मृणालने त्या अंधाऱ्या जागेत जे पाहिलं त्याने ती आतून पुरती हादरून गेलेली होती.
अंजना तिची प्रिय शेजारीण आणि मैत्रीण पण.सहा महिन्यांपूर्वीच ती मृणालच्या बाजूला रहायला आलेली.दोघी अविवाहित आणि कमावत्या..घरापासून दूरवर एकट्याच या शहरात आपल्या उज्ज्वल व्यक्तिगत यशासाठी काही विशेष बनण्यासाठी आलेल्या.पण अंजना च्या बाबतीत असं काय घडलं की ती गायब झाली अचानक हेच मृणालला कळेना.तिचा बाॅयफ्रेंड यायचा अधूनमधून इतकंच मृणालला ठाऊक होतं पण तो ही गायब होता.आणि ती चौकटीतली अंधारलेली जागा ....तिने खेचून घेऊन जे दृश्य मृणालला दाखवलं ते फारच भयावह होतं....इतकं की चांगल्या माणसाला हृदयविकाराचा झटकाच यावा. असं काय पाहिलं होतं मृणालने की तिची झोप उडाली ?
बरेच दिवस पोलिसांचा तपास,फोरेन्सिक टीमचा तपास, मृतदेह आणि सांगाडे कोणाकोणाचे होते हे पडताळून पाहण्यात गेले.आरोपीचा तपास अजूनही चालूच होता.पण यात एक वाईट बातमी कळली अंजनाचा सांगाडा होता तिच्याच घरात ...ती या जगात नव्हती.....कधीच गेलेली हे जग सोडून. मृणालची उरली सुरली आशा संपली ....तिला ही बातमी कळताच तिच्या अश्रूंनी बांध सोडून दिला.खूप रडली ती त्या दिवशी.तिला त्या अंधारातल्या तिच्याच घरातल्या बिछान्यावरचा तिचा अंधारातही चमकणारा सांगाडा आठवला आणि त्या नंतर जी वीज चमकली त्यात अनेक मुलींचे मृतदेह दिसलेले.....नंतरच्या वीजेत अंजनासकट सगळ्यांचे आत्मे हात पसरून ओरडून..ओरडून एकाच गोष्टीची याचना करत होते.......मदत....मदत...मदत ! मृणालने पोलिसांत अंजना गायब असल्याची तक्रार करून त्या सर्वांची एक प्रकारे मदतच केली होती...खूप महिन्यांनी कळलं की हे सर्व अंजनाच्या बाॅयफ्रेंडचंच काम होतं...ते घर त्याचंच होतं...अंजना त्याच्याच घरात राहत होती आणि एक दिवस जेव्हा तिला ती राहते त्या घरात सांगाडे आहेत पुरलेले हे कळलं त्याच दिवशी तिचा शेवट झाला आणि तिच्या आत्म्याने तिच्या निखळ मैत्री असलेल्या मृणालला मदत करण्यासाठी आवाहन केलं त्यामुळेच हे सर्व कर्मकांड बाहेर येऊ शकलं.तिचा बाॅयफ्रेंड लग्नाचं आमिष देऊन त्या मुलींचे दागिने,पैसे हडपत होता...आणि ती मुलगी याबाबतीत सजग होताच.. एकेकीला मारत होता....विशेष म्हणजे त्याला असे एक केमिकल माहिती होते जेणेकरून कुठल्याही प्रकारचा उग्र वास घराबाहेर जाणारच नाही...अशाप्रकारे त्याचं कृत्य ...इतके वर्ष...इतके महिने लपून राहिलं...पण मृणालने अंजनाचा इशारा ओळखला आणि भविष्यात बळी पडणाऱ्या कित्येक मुलींचे प्राण वाचवले.
शेवटी तो एक दिवस आलाच.. आज त्या आरोपीला फाशी झाली....पुन्हा त्या बॉक्सची फडफड सुरू झाली ...तिने तो चौकटी टाईलचा तुकडा हातात घेऊन पुन्हा त्या खोबणीत बसवला.ती पुन्हा त्या अंधारलेल्या घरात खेचली गेली पण आता इथे अंजनासकट सर्व मुलींचे हसरे ...निरागस चेहरे चमकत होते जणू त्या सगळ्या तिला मनापासून धन्यवाद म्हणत होत्या...पुन्हा वीज चमकली आणि सर्व अचानक नाहिसे झाले...ते दृश्य नाहिसे झाले ...मृणाल तो चौकटी तुकडा हातात धरून विचार करत होती....डिलीव्हरी बाॅय कोण होता ? त्याला हे सर्व कसं माहिती...हे आणि अजून बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत होते.पण तिला इतकंच समाधान मिळालं की तिने इतक्या अडकलेल्या आत्म्यांना मुक्ती दिली .....पण हे काय इतका विचार केला अन् पुन्हा टिंग..टाँग..टिंग...टाँग..टिंग..टाँग...ती पुन्हा तशीच घाबरली....दरदरून घाम पुसत तिने दरवाजा उघडला....आणि बघते तर काय ? दरवाजात एक नवीन बॉक्स घेऊन तोच विचित्र डिलिव्हरी बाॅय उभा...! मॅम आपका पार्सल ...!

