ओढ तुझी संपत नाही..!
ओढ तुझी संपत नाही..!


अश्या किती रात्री मी आतुरतेने..... तुझ्या ओढीने जागूनच काढल्या आहेत....वाटलं आता तरी भेटून ओळख देशील मला....पण कसलं काय ? वर्षानुवर्षे आधीसारखाच मला कासावीस....अतृप्त ठेवूनच लपंडाव खेळत माझा जीव टांगणीला लावला आहेस परत...! का तुला माझ्या मनाची घालमेल आणि जीवाची तगमग कळत नाहीये का रे !....की तूला खूप आनंद मिळतो ?....मला अस तीळ !...तीळ ! करून क्रूरतेने आशा लावत..... ती आस टांगून ठेवायला ! आसुसलेल्या नयनांनी मी मनाच्या विस्तीर्ण नभांगणात रोज कुठे ना...कुठे तुला शोधत असते.....एकूण एक मनाचा कोपरा अधिरतेने खणत...खणत जाते नी आता त्या अपेक्षित आशेची धार ही झिजून...झिजून बोथट झाली आहे...वाटतं नकोच जा भेटूस !....नी परत माझ्या नजरेसमोर तूझं ते उभं राहणंही नको मला ! नाही बघायचं मला तूला माझ्या अंतरंगातल्या ....अंर्तमनात !...माझ्यावर थट्टा करत विकृत हसताना .... ते तूझं बिभत्स... खिदळून...खिदळून हसणं माझ्या कर्णपटलांवर निर्दयतेने घणाघाती आवाज करत कर्कश्यतेने आपटतंय ! कानाचे पडदे फोडत तो तुझा आवाज माझ्या ह्रदयात....मेंदूत विना परवानगी आर्ततेने किंकाळी देत विचारतोय.....कोण आहेस तू ? नक्की कोण आहेस ? काय तूझं अस्तित्व.....काय आहे तूझी ओळख ? नुसतं नावाचं हाडामांसाचे चालतं...फिरतं सजीव नि मनाने मेलेलं निर्जीव पार्थिव ? नक्की कोण आहेस तूऽऽऽऽऽऽऽ ? नी मी हतबलतेने स्तब्ध होत माझे दोन्ही हात माझ्याच कानांवर जोरात ठेवून तूझा आवाज कानठळ्या बसू पर्यंत दाबून टाकते.....नको...नको...छळूस परत ! जा....! तू चालता हो..... शांत राहू दे मला....नको ते...
रोजचे तेच... तेच... प्रश्न विचारूस ? कोण मी ? दर्पणासमोर उभे राहून स्वतःच्याच डोळ्यांनी स्वतःच्याच मनःचक्षूत हलकेच परत विना परवानगी हळूवार डोकावते.....आणि म्हणते....हे तूझं रोजचंच नाटकं आहे......काय दिसतंय तुला.... तुझ्याच प्रतिबिंबात....परकीच दिसतेय तू ? स्वतःला नीट ओळखता तरी येत का तूला ?....असे कितीतरी का माझ्या समोरच हातात हात घालून मोठ्या पर्वता सम उभे ठाकलेले ! मी तसाच तो मोठा श्वास घेऊन हळूच उसासा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते ....रोजच्याच सारखं.....स्वतःलाच समजावून सांगत असते......शांत हो.....दीर्घ श्वास घे......एकेक प्रश्न....विचार उच्छवासातून या वैश्विक ऊर्जा शक्तीत विलीन होत जाऊ दे......बघ बरं वाटतंय ना....तुला आता ? मनाने मनाशी केलेला प्रश्न असतो हा .....उत्तरात गोंधळच गोंधळ नी विचारांचा भला मोठ्ठा गुंतलेला गुंता ! नी मी दर्पणा समोर तशीच निःशब्द.......स्वतःच्याच नयनांनी स्वतःच्या मनात खोलवर स्वतःला शोधत उभी परत.....नव्याने !
ओढ तुझी संपत नाही ....कुठे आहे माझा आत्मा.....माझं अस्तित्व...माझं मी पण ! आता तरी माझ्या ओढीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न कर ना जरा......भेट ना मला एकदा तरी....माझ्यातल्या अस्तित्वा !.....ओढ तुझी संपत नाही रे !
कसे ओळखू मी मला ?
माझ्यातल्या अस्तित्वाला,
ओढ लागते नव्याने
संपेना प्रश्नांचा घाला !