: डॉ अनिल कुलकर्णी.
प्रत्येकाला वाटतं आपल्या अस्तित्वाची कोणीतरी नोंद घ्यावी. जाणीव झाल्यापासून माणसं स्वतःला इतकी जपतात की आपल्याच विश्वात जगतात.
अस्तित्व टिकवण्यासाठी व दाखवण्यासाठी माणसें काही ही करतात. अस्तित्वाला हादरें बसल्याशिवाय माणसें सुधारत नाहीत. पाण्याला सुद्धा वाटतं आपल्या तरंगाची दखल घ्यावी, तसंच मनाला ही वाटतं आपल्या विचारांची दखल कुणीतरी घ्यावी.
बेदखल नैराश्य घेऊन येतं आणि दखल आशा घेऊन येतं.अस्तित्वं ठरवतं आपलं व्यक्तिमत्वं.
नोंद नसेल तर अस्तित्वाला अर्थ नाहीं. रानफुलांची नोंद कोण घेतं? केवळ निर्माल्यां साठीच फुलायचं नसतं.
निर्माल्य पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर चा प्रवास ठरवतों अस्तित्व. फुलणं ते निर्माल्य होणें यामधील प्रवास म्हणजेच जीवन.फुलालां कुठे माहित असतं फुलल्यानंतर त्याला चुर गाळलं जातं कां एखाद्या सौंदर्यवतिच्या केसात माळलं जातं, कां चितेवर रवानगी केली जातं. प्रत्येक टप्प्याचा अनुभव वेगळां पण तो घेण्यासाठीच फुल निर्माल्य होईपर्यंत तग धरतंच.
आपल्या अस्तित्वाचं वलय विस्तारलं जावं असं प्रत्येकाला वाटतं. बिंदूला ही वाटतं वर्तुळ मोठं व्हावं,विशालव्हावं.
अस्तित्वाच्या प्रत्येक टप्पा सुखद करण्यासाठी माणूस धडपडत असतो. अस्तित्व श्वासाबरोबर येतं आणि श्वासाबरोबर जातं, पण अस्तित्वाच्या खुणा मृत्यूनंतर ही शिल्लकराहतात.
पृथ्वीवरच्या माणसांना चंद्राच्या साक्षीचं अप्रूप असतं आणि म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनी चंद्रावर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या.
माणसें जिवंतपणीच अस्तित्वा साठीच धडपडत नाहीत तर मृत्यूनंतरही आपलं अस्तित्व कायम राहावं म्हणून धडपडत असतात. प्रत्येकाचं अस्तित्व ठरलेलं असतं, तेवढ्या काळात जगायचं आणि जगवायचं. प्रत्येक क्षणाला अस्तित्व असतं. प्रत्येक क्षण माणूस अस्तित्वासाठी जगतो.क्षणांची मालिका ठरवते अस्तित्व.
आपलं अस्तित्व तर केवळ आपल्या हातात असतं असं नाही तर ते दुसऱ्यांच्या ही हातात असतं.
अस्तित्वाला आव्हान दिलं की अस्तित्व तावून सुलाखून निघतं.कुणाच्या तरी मनात आपल्याला ,आपल्या अस्तित्वाला स्थान असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याच अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव नसतें.
प्रसंगानुरुप काही गोष्टी अस्तित्व सिद्ध करतात. अस्तित्व हे अनुवंशिकतेंच देणंआहेच, पण अंगावरच्या दागिन्या प्रमाणे स्वतःचं अस्तित्व समृद्ध ही करायचं असतं. आनुवंशिकतेतून गोड गळा मिळेल पण रियाज करून अस्तित्व टिकवावं लागतं. संधी मिळाली की अस्तित्व बहरतं. कापलेल्या वृक्षातूनही अंकुर आपले अस्तित्व दाखवंत. खडकातही बिज अंकुरतं. अस्तित्वाच्या पाऊलखुणांची पाऊलवाटच ठरवतें तुमचंं अस्तित्व. संघर्षाच्या मुशीत अस्तित्व तावून ससुलाखून निघतं. घरात माणसाचं अस्तित्व असलं की घर भरल्यासारखं वाटतं व घरात माणसे नसतील तर घर रिकामं रिकामं वाटतं. अस्तित्वाच्या पाऊल खुणा पिढ्यान पिढ्या अस्तित्वात असतात.काहींच्या विचारांच अस्तित्व कायम असतं.
माणसांचं अस्तित्व केवळ शारीरिक असत नाही, वैचारिक,
सांस्कृतिक, सामाजिक असतं.माणसांच अस्तित्व एक एक काळ गाजवतो.काही अस्तित्व इतिहास घडवतात.चंद्रावर
च्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा कधीच मिटत नाहीत.
दखलपात्र अस्तित्वाच्याच पाऊल खुणा उमटतात व येणाऱ्या पिढीला त्या मार्गदर्शक ठरतात. शरीराचं अस्तित्व मिटवता येतं पण विचारांचं अस्तित्व पिढ्यान पिढ्या कायम राहतं. महात्मा गांधींना मारलं पण त्यांच्या विचारांचं अस्तित्व आजही जगावर राज्य करतय. शरीराच्या व विचाराच्या अस्तित्वाला पर्याय नाही.
शरीराची चोचले बंद केल्याशिवाय मनाचं अस्तित्व जागेवर येत नाही. मन ताळ्यावर असेल, नियंत्रणात असेल तरच अस्तित्व दखलपात्र होतं. अस्तित्वाच्या वाताहत होण्याची किल्ली मनाकडे असतें. काहीतरी भरीव कार्य केल्याशिवाय अस्तित्वाची दखल कोणी घेत नाही व पुढच्या पिढीसाठी अस्तित्वाच्या पाऊल खुणा सोडायच्या असतील तर अस्तित्व दखलपात्र हवं. काही व्यक्तींच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा चंद्रावरील पाऊल खुणा सारख्या आजरामर आहेत.
काहींचं अस्तित्व आपलं जीवन बदलून टाकतं. काहींच अस्तित्व हवसं असतं तर काहींच अस्तित्व नकोसं वाटतं.
फुलं आपलं अस्तित्व आसमंत भरून टाकल्यामुळे क्षणिक का होईना वातावरण भारून टाकतात. समाजावर अस्तित्वाची छाप पडल्याशिवाय पाऊल खुणा उमटत नाहीत. समाजात होऊन गेलेल्या अनेक थोर माणसांच्या कर्तुत्वामुळेच, त्यांच्या होऊन गेलेल्या अस्तित्वामुळेच आजही समाज त्या पाऊलखुणेवर मार्गक्रमण करीत आहे.
पाऊल खुणा चालण्यासाठी पाय वाट निर्माण करतात आणि पायवाट असली की माणसं भरकटत नाहीत..
डॉ.अनिल कुलकर्णी.