असेही शिक्षक
असेही शिक्षक


विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी नांदूर येथील शिक्षिका रोहिणी लोखंडे यांची धडपड
रोहिणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची डोंगराएवढी यादी बघूनच थक्क व्हायला होते; त्याचबरोबर, त्यांची विद्यार्थीहिताची तळमळ लक्षात येते. हे उपक्रम बघा हं- रंजक अध्यापन, संगीत कवायत, शाळेला रंगरंगोटी, शिक्षण महोत्सव, We learn English हा परिपाठ, वैदिक गणिताचे अध्यापन, स्पेलिंग बँक, इंग्रजी अंताक्षरी, 'आम्ही वाचतो' (मुले पुस्तके वाचून वहीत लिहीत असत), सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा, प्रश्नकुंभ, भाषा अभिव्यक्ती, मुलाखत, ग्लोबल क्लासरूम (केरळच्या संतोष तळपट्टी या शिक्षकांची घेतलेली मुलाखत), दिनांकांचा पाढा, लेझिम पथक, स्नेहसंमेलनातून निधीसंकलन (सात लाख रुपये), खाऊगल्लीची लज्जत (सहा हजार रुपयांची कमाई), शाळेची कंपाउंड वॉल... लोखंडेबार्इंनी असे विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले. त्यामुळे मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली.
रोहिणी राजेंद्र लोखंडे यांचा जन्म पुण्याचा. त्या डी एड झाल्या. त्यांनी काही काळ पुण्याच्या हुजूरपागा शाळेत काम केले. त्यांना जिल्हा परिषद शाळेत १० जुलै १९९५ रोजी नेमणूक मिळाली. तेव्हापासून त्या विविध ठिकाणी अध्यापनाचे काम करत आल्या आहेत. त्या दरम्यानच त्यांनी अध्यापनाबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. सध्या त्यांची नेमणूक पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील नांदूर येथे आहे. त्यांचे सर्वात लक्षणीय काम म्हणजे शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांना शाळेत आणणे. स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोहिणी लोखंडे गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहेत. नांदूर परिसरातील शुभम साळवे व नंदिनी राठोड या दहावीच्या विद्यार्थ्यांना लोखंडेबार्इंच्या सहकार्यामुळे परीक्षा देणे शक्य झाले. शुभम साळवे हा ऊसतोडणी मजुराचा मुलगा, तर नंदिनी राठोड ही रस्ते बांधकाम करणाऱ्या मजुराची मुलगी आहे. लॉकडाऊनच्या काळात दोघांच्याही शिक्षणाची वाताहात झाली होती. दहावीच्या परीक्षेचे फॉर्म भरणेही त्यांना शक्य नव्हते. ते समजताच लोखंडे यांनी त्या दोघांना फॉर्म भरण्यासाठी मदत केली.
लॉकडाऊनमुळे समाजातील सर्वच घटक कमीअधिक प्रमाणात भरडले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या तर अधिकच तीव्र बनल्या आहेत. कित्येकांना ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून घेणे शक्य नाही. महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी हाय स्पीड इंटरनेट सुविधा तर दूरच, पण चांगले नेटवर्कदेखील नाही. अशा विद्यार्थ्यांच्या मदतीला काही प्रयोगशील शिक्षक धावून आले आहेत. दौंड तालुक्यातील नांदूर येथील रोहिणी राजेंद्र लोखंडे या त्यापैकीच एक. नांदूर गावाजवळ ऊसतोड कामगारांचे फड असल्याने त्यांची मुले सहा महिन्यांहून अधिक काळ तेथे वास्तव्यास असतात. दरवर्षी त्या मुलांना शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवले जाते, पण करोनासदृश परिस्थितीमुळे ती मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती होती. शिवाय त्यांच्याकडे ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारी गॅजेट्स नसल्याने ऑनलाईन शिक्षणही शक्य नव्हते. त्यावर लोखंडे यांनी नामी उपाय शोधला. त्यांनी गावातील एका महिलेच्या मदतीने त्या मुलांचे शिक्षण सुरू केले. त्यासाठी त्यांनी पुण्यातील 'अक्षर मानव' या सामाजिक संस्थेकडून जुने स्मार्टफोन मिळवले. फोनच्या साहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांना साय
ंकाळी सात ते रात्री साडेनऊ या काळात शिकवण्यास सुरुवात केली. ग्रामस्थ व शाळा समिती यांच्या मदतीने त्या मुलांसाठी एका स्वयंसेविकेची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, कानटोपी, रुमाल, पॅड, रंगीत पेन्सिल, पाटी अशा शालोपयोगी साहित्याचे व दैनंदिन उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोखंडे यांनी महिला सहकाऱ्यांच्या मदतीने घराच्या अंगणात वर्गांची व्यवस्था केली आणि मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. तो उपक्रम गेले वर्षभर सुरू आहे. त्यामुळे विविध तांड्यांवरील सतरा मुले शाळेत दाखल झाली. त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होऊन ती शाळेत टिकून राहिली आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांचा आणि शाळेतील शिक्षकांचा उत्साह वाढला आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा राज्य सरकारचा कार्यक्रम राबवला जात असताना तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून ‘बालरक्षक चळवळ’ जन्माला आली. शालाबाह्य, स्थलांतरित व अनियमित विद्यार्थ्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे शाळा प्रगत करायच्या असतील तर अगोदर शंभर टक्के विद्यार्थी शाळेत दाखल झाले पाहिजेत असे त्यांच्या लक्षात आले. ती समस्या एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सोडवण्यापेक्षा राज्यभरातील लाखो शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने बालरक्षक बनून काम केले तर विद्यार्थीगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर रोखता येऊ शकेल या विचारातून बालरक्षक संकल्पनेचा उदय झाला.
लोखंडे यांच्या प्रयत्नांचे आणखी एक उदाहरण नमूद करण्यासारखे आहे. शाळा बंद असल्यामुळे सातवीच्या वर्गातील दोन मुले ऊस तोडणीच्या कामाला जाऊ लागली होती. मुलांना साध्या मोबाईलवरही शिकता येईल हे रोहिणी लोखंडे यांनी त्यांच्या पालकांना पटवून सांगितले. त्यांच्या योजनेप्रमाणे संध्याकाळी ऊस तोडणीच्या कामावरून घरी आल्यावर त्या मुलांचा फोनवर वर्ग सुरू झाला. पाठ्यपुस्तके त्यांना मिळाली होतीच. त्यातील एकेका पाठाचे त्या वाचन घेत. छोटे-छोटे घटक वाचून त्यांना समजावून सांगत. त्यावर प्रश्न विचारत. दोघेही त्यांची उत्तरे देत. शिवाय, वहीत प्रश्न लिहिण्यास सांगत आणि लिहिलेली उत्तरे वाचण्यास सांगत. अशा प्रकारे दररोज एक तासभर ती ‘त्यांची शाळा’ सुरू होती.
रोहिणी लोखंडे युट्युबवरही 'यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन' हे चॅनल चालवतात. त्यासाठी त्यांनी खुरपणी करतानाचे, खते व बियाण्यांची माहिती देणारे, सिंचनाच्या पद्धतींचे, नद्या व धरणे याबद्दलची माहिती प्रत्यक्ष धरणाच्या जवळ जाऊन सांगणारे, वनस्पतीचे प्रकार आणि वर्गीकरण याबद्दलचे, प्राण्यांच्या अधिवासासंबंधीचे, तसेच शेती अवजारे, सुधारित शेतीच्या पद्धती समजावून सांगणारे व्हिडिओ बनवले आहेत. त्यावरील स्वाध्यायाची उत्तरे त्यांनी विद्यार्थ्यांकडून व्हॉट्सअपवर मागवली. शेतातील आंब्याच्या झाडाला व्हाईट बोर्ड लावून त्यावर त्यांनी गणिताच्या पाठाचे व्हिडिओ तयार केले. ते सर्व व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. विशेषतः शेतात खुरपणी करतानाचा व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झालेला आहे.
त्यांच्या कार्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घेतली आहे. राज्यातील ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांपुढे अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी कल्पक आणि प्रयोगशील शिक्षक हवेत, तरच शैक्षणिक चित्र पालटेल. रोहिणी लोखंडे यांच्यासारख्या शिक्षिकांमुळे आशेला वाव आहे.