Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

विचार

विचार

3 mins
151


प्रथम जेव्हा मी माधुरीला पाहिले तेव्हा अस्सल सौंदर्य म्हणजे हेच हे विचार माझ्या मनात आलें.एका कार्यक्रमात पाठमोरीच तिला पाहिलं.  केसाची लट, लाट जशी किनाऱ्यावर‌आदळतें तशी ती‌  लट माझ्या मनावर आदळत होती. काय तो चेहरा? चेहरा न पाहताही काही सौंदर्याचा अदमास येतो. कानाची पाळी  सुद्धा अखीव रेखीव व प्रमाणबद्ध. शरीर आखीव रेखीव असणं हे सौंदर्यच आहे.प्रथम तुज पाहता म्हणत मनात अनेक जण अनेकांच्या सौंदर्यात, सौंदर्याचा विचारात काही काळ जगत असतात. सौंदर्य जेव्हा सहवासात येतं तेव्हा सहवासाने प्रेम वाढतं पण वैगुण्यं ही कळत जातात. इच्छापूर्ती नाही झाली की पुन्हा विचारांची मालिका सुरू होते.कितीही विचार करायचं नाही म्हटलं तरी विचार येतच राहतात. पाण्यावरचे तरंग काही काळाने आपोआप नाहीसे होतात पण मानवी विचारांचं तसं नाही. घर झाडलं तरच स्वच्छ राहतं, तसेच मनातले नको ते विचार त्या त्या वेळेला कचऱ्याप्रमाणे उचलून दूर टाकावे लागतात,नाहीतर मनात अनेक गोष्टी साचलेल्या राहतात, तसंच विचारांचही आहे.

अचानक माझ्या विचाराची तंद्री भंग पावली.

“अहो कसल्या विचारात आहात एवढं?”

“कसल्याही नाही”?

“मी तुम्हाला चांगलीचओळखते. लग्नाआधी आपण भेटत होतो तेव्हाचे तुम्ही आणि आताचे तुम्ही यात जमीन आसामानाचा फरक पडलाय”.

“माणसं बदलतात पण त्यांचे विचारही बदलतात कां?”

“एकच माणूस वेगवेगळ्या प्रसंगी आपल्याला वेगवेगळे विचार देऊन जातो. कालचें शत्रू आज मित्र होतात हे विचार बदलल्यामुळे असेल कदाचित पण स्वार्थ आला की विचारही बदलतात.”

“माणसाला बरेच दिवसांनी भेटल्यानंतर त्याच्या परिवर्तनात त्याच्या विचारात बदल झालेला आढळतो. आपण म्हणतोय तो किंवा ती किती बदललें आहेत, पूर्वी असें नवहतें.”

मी म्हणालो  माधुरी “मला असं वाटत नाही पण प्रत्येक वेळी आपण अगदी विचार करून  बोलतो असं थोडंच आहे.”

त्यावर माधुरी म्हणाली “मला माहित आहे तुम्ही जे मनातलं आहे ते बोलता आणि दुसऱ्यांचा विचार करतच नाही. गोवऱ्या थोपल्याप्रमाणे विचार थोपता येत नाहीत.”

हो “असेल कदाचित पण प्रत्येकाचे विचार करणे हा ज्याचा त्याचा प्रांत आहे. लहान मुलाला थोपटवून झोपवता येतं, पण मोठ्यांवर विचार थोपटवता येत नाहीत.”

“अहो विचार करण्यावर कुणाचं बंधन असू शकत नाही पण विचार व्यक्त करण्यावर कोणाचातरी आक्षेप असू शकतो, हे मला म्हणायचंय.”

आमच्या संभाषणात  माझ्या लक्षात आलं की फार तात्विक विचार करूनच बोलायला हवं. आपण प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनावर, त्याच्या हालचालीवर त्याच्या वागण्यावर त्याच्या हसण्यावर त्याच्या अपेक्षित बोलण्यावर विचार करतच राहतो.

लोक कधी ठरवून वागतात, कधी कधी सहज वागतात पण त्या प्रत्येकामुळे विचारांचं वर्तुळ अनेकांच्या मनात विस्तारात जातं.

पाण्यावरचे तरंग उठायला कुणीतरी कारणीभूत असतं जसं दगड ,हवा. आपोआप तरंग उठत नाहीत तसेच विचारांचं आहे,काहीतरी निमित्त होतं आणि विचारांची मालिका सुरू होते. केवळ संस्कारच आपल्याला वळण लावत नाहीत तर आपलेच विचारही आपल्याला वळण लावतात.एखादा विषय नावडीचा असल्याने आपण विषय बदलतो किंवा एखादी लक्षवेधी गोष्ट करतो, त्याप्रमाणे मी टी.व्हीचा रिमोट हातात घेतला व मालिका पाहायला सुरुवात केली. घरात आम्ही दोघेच सोफ्यावर वर बसून टी.व्ही पाहत होतो ,पण माझी एक सवय  अशी असते की पाहताना त्याच्यावर विविध प्रकारच्या कॉमेंट्स  मी करतो. ते माझे विचार असतात ते दुसऱ्याला पटतील असं नव्हे. काही विचार विरोध निर्माण करतात तर काही विचार संस्कार देतात.

रिमोट आपल्या हातात असल्यामुळे टी.व्ही.हीचालू बंद करता येतो पण मनातल्या विचारांचा रिमोट कुठे आपल्याकडे असतो?आपण  विचार व्यक्त करतो पण कालांतराने ते मनपटलावरून अदृश्य होतात किंवा एखाद्या घटनेबद्दलचे विचार कायम आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहतात.

विचारांना कबुतरासारखं हातात पकडून न ठेवता आकाशात  उंच जायला  उडण्यासाठी सोडायचं असतं. आपल्यालाही कबुतराला स्वातंत्र्य दिल्याचा आनंद मिळतो व विचारही कबुतरासारखे भुरकन उडून जातात.

चांगले ,वाईट विचार आपल्या मनात सतत येत राहतात. योगामध्ये ध्यान करताना असं म्हटलं जातं की विचार येत असेल तर येऊ द्या चांगले किंवा वाईट आपण फक्त तटस्थ राहायचं ते आपोआप निघून जातात.

उठा आता नुसता विचार करून कुणाचं पोट भरलंय. उठा ऑफिसला जाण्याची वेळ होते आहे. आधी काम मग विचार. 

भिंतीवरची पाल बराच वेळ स्तब्ध असते व मग शिकार करतें. स्तब्ध असणं एक प्रकारे विचार करणंच असतं.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract