अपघात..
अपघात..
"आई, मी चालोय ग मुलीची पत्रिका दाखवायला. बघतो किती गुण जुळतात आमचे....!तशी बोलणी करायला जाऊ मुलीच्या घरी, सुनील आईला म्हणाला.
मालती(आई ), "हो रे बाळा पण सांभाळून जा. मला सांग पत्रिका कशी आहे. या रविवारीच जाऊ मुलीच्या घरी. लग्नाचं वय पण झालय आता त्यामुळे वेळ नको वाया घालवायला.
सुनील आज भलताच खुश होता. शिक्षण जेमतेम झालेला सुनील शेती करत होता. बाबांचं पाठबळ त्याच्या लहानपणीच हरवलं. थोरल्या भावाचं लग्न झालं आणि तो वेगळा निघाला. कारण त्याची बायको हेटेखोर स्वभावाची होती.घरात तिला नवरा सोडून कोणाशीच जुळवून घेईच नव्हतं.आता आई आणि सुनील दोघंच. शेती करत असल्याने मुलीही सुनीलला नकार देत होत्या. तरी आईला वाटत होत कमी शिकलेली असली तरी घर सांभाळ करणारी सून मिळावी. शेत मी पाहीन.
सुनीलाही वाटत त्याच्या सगळ्या मित्रांचं लग्न झालं, पण त्याचे हात अजून काही पिवळे होत नव्हते. त्यालाही वाटत आपलाही संसार असावा. बायकोने फक्त घर संभाळलं तरी बास.
शेतात राबून आईचं आयुष्य गेलं पण वय होऊनही अजून देखील ती कष्ट करत होती. बायकोमुळे घरात जरा हातभार तरी लागेल.त्यांनी शेती करूनच गावाकडे मोठा बंगलाही बांधला होता. थोरल्या भावाने शहराकडेच प्लॅट घेतला होता. तो तिकडेच स्थायिक झाला. अधूनमधून चौकशीसाठी तो एकटा येत असे. कमी जास्त काही लागलं तर तो देतही असे.
मालतीने नवऱ्याचं पाठबळ नसतानाही एकटीने संसार ओढला. एक मुलगा शिकला म्हणून शहरात नोकरीला लागला त्याला मुलगी मिळाली. तीही हेटेखोर होती.त्यामुळे सुनीलला थोरली सून कधीच आसरा देणार नाही. त्यांना माहित होत. डोळ्यासमोर सुनिलच लग्न व्हावं एवढीच त्यांची इच्छा.सुनील खूप साधा, सरळ त्यात शिक्षणही जेमतेम असल्याने त्यांना त्याची खूप काळजी वाटत.
आज मालतीच्या भावाने सुनिलसाठी एक स्थळ आणलं होत. मुलीच जेमतेम शिक्षण होत. गरीब परिस्थितीमुळे तीच लग्न करायचं चाललं होतं. सुनील व त्याच्या आईलाही मुलीकडून तिच्या घरच्यांकडून कसलीही अपेक्षा नव्हती.
मुलीचा फोटो सुनील आवडला होता. आता फक्त पत्रिका पाहायची बाकी होती. आईचा निरोप घेऊन सुनील गाडीला किक मारून चालला.
मालती, सावकाश जा, मला फोन कर असं म्हणून मालतीताई त्यांच्या पुन्हा कामाला लागल्या.
सुनील खूप खुश होता. खूप सावधगिरीने गाडी चालवत होता. उन्हाचा चांगलाच रट झाला होता. तप्त उन्हात सुनील सावकाश गाडी चालवत होता. एखादं दुसरं वाहन रस्त्यावर होत. त्याच्या मागून एक ट्रॅक्टर येत होता. सुनील रस्त्याच्या एका साईडने गाडी व्यवस्थित चालवत होता. पण मागून येणारा ट्रॅक्टर चालक पूर्ण व्यसनाधीन होऊन गाडी चालवत होता. त्याने खूप मद्यपान केलं होत.हे मात्र सुनीलला काहीच माहित नव्हते. ट्रॅक्टरला पुढे जाण्यासाठी जागा देऊनही तो पुढे जात नव्हता. कारण तो ट्रॅक्टर चालक त्याला कसलीच शुद्ध नव्हती. बघता बघता त्याने मागून सुनिलला नशेत जोरात धडक दिली तसा सुनिल जोरात डोक्यावर पडला. एक क्षण त्याला काय झालं कळलेच नाही....!
भर उन्हात तो डांबरी रस्त्यावर पडला. डोक्याच्या मागची बाजू रक्ताने माखली. पूर्ण शर्ट रक्ताने भरला होता. तो चालक धडक देऊन निघून गेला. त्याच्या अवस्थेची त्याला किव ही आली नाही.सुनील मात्र भर उन्हात डांबरी रस्त्यावर तरमळत पडला. त्याची शुद्ध पूर्ण हरपली होती.
संध्याकाळी सहा वाजले तरी त्याच्याकडे कोणीही पाहिले नाही. आईच मन शांत होईना. अनेक विचार डोक्यात घोघांवत होते. अजून का सुनील आला नाही...?? तिच्याकडे फोन होता पण कसा लावतात हे देखील त्यांना माहित नव्हतं. त्याही अशिक्षित होत्या.
एका वाटसरूने सुनीलला पाहिले. त्याची भयंकर अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने त्याचा मोबाईल काढून कॉल केला. त्याच्या आईलाच कॉल गेला. मालती ऐकूनच एका जाग्यावर स्थब्द झाली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.
मालतीने थोरल्या मुलाला कॉल केला. तिला रडूच आवरत नव्हते. त्याला सांगून पटकन त्याला दवाखान्यात ऍडमिट केले. त्याची परिस्तिथी खूप गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
एक आठवडा झाला.सुनील निपचित आयसीयूमध्ये पडून होता. ज्याची काही चुकी नसताना तो आज खूप सहन करत होता.डॉक्टरांचे उपचार सुरूच होते. प्रतिसाद मात्र काहीच नव्हता. मालतीचे तर डोळे रडून रडून सुजले होते. मुलाच्या लग्नाचे वेद घेणारे डोळे आज काय पाहत होते...!
मोठा मुलगा राज त्याला होईल तेवढी मदत करत होता. भावाच्या उपचारासाठी काही कमी करू नका. मी लागेल तेवढे पैसे देईन पण सुनीलला वाचावा.राजही डॉक्टरांन असं म्हणत त्याच्या समोर रडत होता.
"होईल सगळं नीट धीर धरा,डॉक्टर धीर देण्यासाठी दोघांना सांगत होते.
एक आठवड्यानंतर सुनीलला शुद्ध आली. समोर आई बसली होती. तिला पाहून रडू नकोस त्याला बोलायचं होत. पण त्याची बोबडी वळत नव्हती. हाताने काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण हात हालत नव्हते. अशी झालेली अवस्था पाहून त्याला स्वतःचीच कीव येत होती. शरीर असून नसल्यासारखं झालं होत. डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. त्या अश्रूचे पाणी उशीच्या कव्हरमध्ये मुरत होते. यापलीकडे शरीर निपचित एका जागी पडून होते.त्यात संवेदना मात्र काहीच नव्हत्या.
डॉक्टरांच्या म्हण्यानुसार मेंदूला मार लागल्याने त्याचं पूर्ण शरीर संवेदना हरवून बसलं होत. त्याला फक्त आता कोणाच्या मदतीशिवाय जागेवरून हलणे अशक्यच होत. एक महिना झाला सुधारणा मात्र काहीच नव्हती. सुनिलच्या भावाने लाखो रुपये खर्च केले पण त्याच्या प्रकृतीत काही फरक पडला नाही. सुनील जिवंतपणी मरणयातना तो सोसत होता.
" चूक एकाने केली होती, शिक्षा मात्र निष्पाप भोगत होता. मद्यपान करून गाडी चालवू नका, नाहीतर कोणी निष्पाप जीव गमावेल, नाहीतर कोणाची अवस्था अशी होईल.
सावधान राहा, सतर्क राहा.

