शब्द बोलावे जपून...
शब्द बोलावे जपून...
आज खऱ्या अर्थाने सुनील आणि प्रीती विवाहबंधनात अडकले. दोन वर्षांपासून दोघ एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते. प्रीती सुनिलच्या मामांची मुलगी ती दोघंही उच्चपदावर होते. प्रीतीला सुनीलने आधी बालपणी पाहिलं होतं. त्यानंतर एका लग्नात. जेव्हा ती तारुण्यात आली होती. एका लग्नात जेव्हा तिला पाहिलं तेव्हा त्याचा विश्वासच बसत नव्हता कीं ही प्रीतीच आहे. इतकी ती चारचौघीमध्ये उठून दिसत होती. तिला पाहताच तो त्याचं हृदय हरवून बसला. त्यात तिचा स्वभाव शांत, सुस्वभावी असल्याने त्याला अशाच मुलीशी लग्न करायचं होतं. जी त्याच्या परिवाराला जोडून ठेवेल.
त्यामुळे सुनिलने घरी सांगितलं,जर केल लग्न तर प्रीतीशीच करेन नाहीतर कोणाशी नाही. त्याच्या आईबाबांनी त्याच्या निर्णयावर होकार दाखवला. आजीनेही पाठ थोपटली कीं माझ्या मनासारखं केलस हा. आजी अस म्हणत हसत हसत निघून गेली. सुनीलही मनातल्या मनात हसत होता. घरात आनंदाच उधाण आलं. वळचीच तारीख पाहून दोघांचं लग्न अगदी मॉडर्न पद्धतीने, राजेशाही थाटात लावून देण्यात आलं. दोघंही लग्नात अगदी उठून दिसत होते. दोघेही सुंदर दिसत असल्याने सगळ्यांचं लक्ष वधुवरानकडे वेधलं होतं.लग्न सोहळा आनंदात पार पडला. घरामध्ये पूजेची तयारी सुरु झाली. पूजा झाल्यावर दोघांनाही कुलदेवतेच्या पाया पडायला पाठवलं. देवाच्या आशीर्वादाशिवाय कोणतंही कार्य अपूर्णच नाही का? दोघंही खूप खुश होते. अखेर सर्व काही मनासारखं झालं होतं. सुनिलच्या आईची (मालतीताईची )घरामध्ये कामाची आवारावर चालली होती. काही पाहुणेही थांबले होते. काम करण्यात सुनीलची आई व्यस्त होती. पण घरातील काही बायका त्यांच्या सुनानविषयी एकमेकींना सांगत होत्या.
आजकालच्या सुनांशी खूप सांभाळून वागावं लागत बाई...! ते मालतीताईही काम करता करता ऐकत होत्या. त्यांच्या पुढे पुढे केल तर आयते बसूनही खायला लाजत नाहीत. फक्त फिरायला जायला, शॉपिंग करायला सांगा. घरातल काम करायला भोपळा...!सासवाणीच यांच्या पुढ करायचं जमाना खूप बदलाय बाई..! त्यावर दुसरी बाई म्हणाली, माझं नशीब चांगलंय त्याबाबतीत मी हिकडचा तांब्या तिकडे करत नाही. माझी सून माझ्या पुढ पुढ करते. उठल्यापासून झोपेपर्यंत तिच सगळी कामं करते. मी कोणत्याच कामाला हात लावत नाही. स्वयंपाक, केर, नाश्ता, लादी पुसणे, भाजी निवडण्यापासून तिच करते. मी फक्त आयत बसून खाते.
यावर तिसरी बाई म्हणाली," आहो किती तुमची बारीक सून तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही...! तुम्ही नकाहो शिकवू मला त्या बाईने नाकडोळे मुरडले,आणि वरून म्हणाली, लोकांना तर माझं सुखच बघवत नाही. चौथी बाई यांच्या गप्पा ऐकत होती. तिला तिच्या दोन्ही सासरी असणाऱ्या मुली आठवल्या. त्यांची खूप तिला काळजीही वाटत होती.त्या मुली काबाडकष्ट करून जगत होत्या. त्यांची ओढाताण जास्त पण काळजी करणार कोणी नव्हतं.
दोननंबरची बाई पुन्हा बोलली, मालतीताई तुम्ही सावध राहा हा . तुमची तर सुन नात्यातील आहे. जास्त पुढं पुढं करून डोक्यावर चढवून ठेऊ नका. नाहीतर तिच तुम्हाला कामाला लावल. तुम्ही बरोबर बोलताय, "मालतीताई म्हणाल्या. उद्यापासून कोणत्याच कामाला हात लावत नाही. नाहीतर मीच मोलकरीण होयची. अशा प्रकारे झणझणीत मिरचीची फोडणी त्या बाईने दुसर्याच्या घरात दिली.
देवदर्शन झालं आता घरातील येणाऱ्या जबाबदाऱ्या दोघांनाही पेलायच्या होत्या. प्रीतीचा आज किचनमधील पहिलाच दिवस होता. तीने माहेरी किचनमध्ये काहीच केले नव्हते. साधा चहा कसा करायचा हेही तिला माहित नव्हते.तिने कसा तरी चहा बनवला पण त्याला चव लागलीच नाही. म्हणून कोणी चहा घेतलाच नाही.
प्रीतीला आता कस काय पेलणार ही जबाबदारी याच फार टेन्शन आलं. सांगायलाही तिला कोणी नव्हतं.
मालतीताई बेडरूममध्ये निवांत झोपल्या होत्या. प्रीतीने चहा त्यांना बेडरूममध्ये नेऊन दिला. चहाला काहीच चव नसल्याने त्या बोलल्याच, "काय ग कसला चहा बनवला आहेस. 'काय त्याला चव ना धव' नाक मुरडत म्हणाल्या, काय तुम्ही आजकालच्या मुली. शिकून काही उपयोग नाही. "साधी साधी कामं जमत नाहीत तुम्हाला...!"
सख्या आत्याचं हे सासूतील रूप पाहून प्रीती घाबरलीच. ती त त प प असं तिच्या तोंडून होऊ लागलं. आधी किती छान वागत होती आत्या आता अचानक असं काय झालं आत्या एवढी बदलली. प्रीतीचा चेहरा पूर्ण पडला. तिच्या चेहऱ्यावरच तेजच निघून गेलं. सुनिलच्या नजरेतूनही ही गोष्ट सुटली नाही. तो न राहवून आईला बोललाच. "आई काय चालय तुझं, दोन दिवस झाले मी बघतोय.
"तू काय हे टिपिकल सासूचं रूप घेतलंय. प्रीतीने तुझी भीतीच घेतलीये. तिला समजून घेयच ठेवून तिला घाबरवतेस. अग करेल ती हळू हळू तीला वेळ तरी दे.
मालती चुकतंय तुझं,आज्जसासूबाई म्हणाल्या. तू अशी वागशील असं वाटलंही नाही. तू आठव तुझं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुलाही काही येत नव्हतं मीच तुला समजून घेतलं तेव्हा त्यामुळेच आपले ऋणानुबंध चांगले जुळले. मी जर तुला असच धूसफूस केली असती तर तुला माझ्या बदलचा रागच भरला असता नां...!
मी तुला समजून घेतल म्हणूनच आपलें ऋणानुबंध चांगले टिकलेत नाहीतर एक घर दोन तोंड झाली असती. तुझ्या मुलाच्या संसाराचा विचार कर. अजुन वेळ गेली नाही लक्षात ठेव. आज्ज सासूबाई आज खूप चिडल्या होत्या. त्यांचं असं रूप पहिल्यांदाच मालतीताईनी पाहिलं होतं. तिला शिकवायचं ठेवलं आणि कसली तिची परीक्षा घेतेस. असच वागलीस तर घरामध्ये फूट पडायला वेळ लागणार नाही मालती. मालती बंद डोळे उघड अजून वेळ गेली नाही. सुसकारा टाकत आज्जसासूबाई बोलायच्या थांबल्या.
मला माफ करा आत्याबाई, "मालतीताई म्हणाल्या. काल त्या बायका आल्या होत्या त्यांच्याकडून काहिबाही ऐकत बसले, आणि माझे विचारही तसेंच झाले. तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. नवीन सुनेला समजून घेतलं पाहिजे. तिच्या मनामध्ये चांगली जागा तयार केली पाहिजे अशी कशी वागले मी, काय विचार करत असेल प्रीती आत्या किती खडूस आहे.
मालतीताई "सुनील प्रीतीला बोलाव..." प्रीती काय झालं असं अविर्भावत होती. तीला काय चालय याची काहीच कल्पना नव्हती. प्रीती तू घाबरू नकोस, तुला काही अडलं तर मला विचार, तुला नाही जमलं तर मी करेन. आज्जसासूबाई, "प्रीती तुझी सासू खूप स्वभावाने छान आहे. तू ही तिला समजून घे बाळा. दोघीच नातं घट्ट करा. एकीला लागलं तर दुसरीच्या डोळ्यात पाणी येईला पाहिजे. असं म्हणत आज्जसासूबाई हसत होत्या.
पुढे त्या म्हणाल्या, आम्ही दोघीनीही एकमेकींना समजून घेतलं म्हणून तर अजून नातं चांगल आहे. सासू सून घराच्या भिंती असतात, त्या मजबूत,बनवायच्या दोघींच्या हातात असत. तेव्हाच ते घर भक्कम होतं.
"आज एका शब्दाने घर तुटता तुटता वाचलं,म्हणून कोणच्याही घरी गेल्यावर घरात ठिणगी पडेल असं बोलू नका. कारण पसरवलेली नकारात्मकता एखाद्याच घर अथवा आयुष्य उद्वस्त करू शकते.
*******समाप्त *******
