#सोन्याचा हार...
#सोन्याचा हार...
एक आटपाटनगर नगर होतें. सगळे लोक त्या नगरात एकजुटीने, प्रेमाने राहत. ऐकाला दुःख झालं की दुसरा मदतीला धावून येत. त्या नगरातील एकमेकांचे प्रेम पाहून बाकीच्या गावातील लोकांनाही आश्चर्य वाटत.
त्या नगरातील मंदा मावशी फुलं विकणारी चेहऱ्यावर तेज, ठसठशीत लालभडक कुंकू, प्रत्येकाशी प्रेमाने, आपुलकीने वागणारी, पण आज तिच्या चेहऱ्यावरील तेज नाहीस झालं होतं.
आज तिला उदास बघून राणे काकांनी चौकशी केली. त्या उदासीमागच कारण म्हणजे मंदा काकीचा चार तोळ्याचा हार आणि पैसे चोरीला गेले होते .घरोघरी फुलं विकून किती मेहनतीने तिने तो सोन्याचा हार बनवला होता.आज मात्र तो हार घरात दिसेनसा झाला.
बाहेर जमलेल्या गर्दीतून पुढे येत शारदा ताईंनी विचारले, " अग मंदा तू तर सकाळपासून घरात आहेस, हार कसा चोरीला जाईल...?
" मी काय खोट बोलतेय का...? मावशी म्हणाल्या.मी मगाशी दळण आणायला बाहेर पडले. लगेच जाऊन येईच म्हणून दाराला कडी लावली.येऊन पहाते तर दाराला कडी नव्हती.कपाट तसंच उघडं.मला संशय आला म्हणून मी कपाटात पाहिलं तर हार नव्हता, पैशाच्या पाकिटाले सगळे पैसे काढून घेतले माझे.
हे बघ मोकळं पाकीट.
"किती कष्टाने केलं होतं सगळं मंदाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. गर्दीतले लोकही हळहळ व्यक्त करत होतें. त्यात छोट्या बालगोपाळाची मंदाकाकी खूप लाडकी.तिला अस रडताना पाहून मंगू, दिनेश, शोभा, अजय, नीता,चिंटू याना खूप वाईट वाटत होतें.
"राणे काकांनी पुढे मंदा मावशीला सल्ला दिला. हे बघा झालं ते झालं आता रडून काही उपयोग नाही. आपण पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवू. चोर नक्कीच सापडेल. त्या गर्दीतुन पुढे येऊन माधव म्हणाला, " चला मी पण येतो तुमच्या बरोबर...!गर्दी हळू हळू वसरली. मंदा मावशीने डोळे साडीच्या पदराला पुसून त्यांच्या मागोमाग चालली.
चिंटू म्हणाला, "आपण पोलिस असतो तर किती बरं झालं असतं ना ....!आज मावशीला अस रडूच दिलं नसतं. मंगू म्हणाला," आपण लहान आहे म्हणून काय झालं.आपण ही चोराला पकडू शकतो.
नीता म्हणाली,"काही पण काय बोलताय आपल्याला खेळायला आईबाबांनी पाठवलंय.असले काही तरी नको ते उद्योग करायला नको. नाहीतर आपल्याला घरा बाहेर पाठवणार नाही कोणी...!
दिनेश म्हणाला,"या मुली तर खूप भित्र्या स्वभावाच्या असतात.
नीता म्हणाली, "आपली मावशी आहे ती.न चुकता आपल्याला रोज चॉकलेट देते. तिला मी मदत करणार. मी खूप अशा गोष्टी वाचल्या आहेत. चोराला कसं पकडायचं. आपण हार नाही मानायची. कोण मला यात साथ देणार....? दिनेशने पुढे हात करून विचारलं. मंगू,शोभा, अजय,चिंटू सगळ्यांनी त्यांच्या हातावर हात ठेवला. निताकडे सगळे पाहत होतें. शेवटी तिनेही छोटया दोस्ताना मदत करायची ठरवलं.
चला तर आपण सगळे तयार आहोत. पण सुरुवात कोठून करायची दिनेश...?, " मंगू म्हणाला.
दिनेश म्हणाला, मी खूप गोष्टी पुस्तकात वाचल्या आहेत.पोलिस ज्यात चोराला कसं पकडतात . आपण पोलिसांन सारखा विचार करूयात,म्हणजे चोर आपल्या हाती लागेल.
पुढे दिनेश बोलला, हे बघा आधी आपण आज सकाळी आटपाट नगरात कोण कोण आलं याची चौकशी करूयात. दिनेश तू बरोबर बोलतोस. आपण असच करू सगळे बोलले.
चला तर मंदा मावशी राहते तेथील लोकांकडे आधी चौकशी करूयात. तिथेच हेमंत काका पेपर वाचत बसले होतें. मुलं त्यांच्याकडे गेली.
दिनेश म्हणाला , "काका आज सकाळी आपल्या नगरात कोण कोण आलं होतं तुम्ही सांगता का....?
हो सांगतो, हे बघा सकाळी दुधवाला भैय्या, आणि पेपरवाला पेपर टाकून निघून गेला. त्यानंतर कोण आलेलं माहित नाही, तुम्ही का विचारताय हे मला...? काही नाही काका असच विचारतोय.
दिनेश म्हणाला, दूधवाला, पेपरवाले काका अशी चोरी करणार नाहीत.मुलं तिथून निघणार तर लगेच शेजारी बसलेले आजोबा म्हणाले, मुलांनो आज सकाळी एक नवीन अनोळखी बाई आपल्या मुलाला घेऊन पिना, टाचण्या, क्लिपा, बांगड्या विकायला घेऊन आली होती. ती पुन्हा काही दिसली नाही मला. तीला मी या नगरात पहिल्यांदाच पाहिलं होतं.
दिनेशला बाजूला घेऊन शोभा म्हणाली, दिनेश मीही सकाळी तिच्याकडून क्लिप घेतल्या आहेत.
चला तर ठरलं या बाईलाच शोधून काढूयात. शोभा तुला तिचा चेहरा आठवेल ना..?
हो, शोभा म्हणाली.
पुढे दिनेश म्हणाला,दोन रस्ते असल्याने दोन्ही बाजूला शोधूयात. आपले दोन ग्रुप तयार करूयात . मंगू तुझ्या ग्रुप मध्ये नीता आणि चिंटूला घे. माझ्याबरोबर शोभा, येईल.
मुलं आपापल्या मार्गाने निघाली. डोळ्यात अंजन घालून ती त्या बाईचा शोध घेत होती. रस्त्यावरील वाहतूक, झाडांच्या गर्द हिरवाईत,रणरणत्या उन्हात त्या बाईचा शोध सुरु झाला होता.
थोडंसं पुढं आल्यावर दिनेश थांबला. तिथेच रस्त्याच्या कडेला थंड पाणी पिऊन दोघांनी मन तृप्त करून घेतलं.
दिनेश ते बघ ज्वेलरीच्या दुकानात सकाळची बाई आहे. त्याच बाईकडून मी क्लिप घेतल्या, "शोभा म्हणाली.
दिनेश,तुला नक्की आठवतंय ना शोभा....?
हो रे तिचं आहे. आणि तिच्या हातात तो बघ हार तो मावशीचाच असेल. ती सोनाराला दाखवतेय.
शोभा तू तिच्यावर लक्ष ठेव. आपल्या मदतीसाठी मी कोणालातरी घेऊन येतो.
दिनेश रस्त्यावरून कोण दिसतंय का पाहत होता. थोडं पुढं आल्यावर मंदा मावशी आणि तिच्याबरोबर पोलिस दिसतं होतें.
दिनेशने पळत जाऊन त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. पोलीसांनी दुकानाच्या आतमध्ये जाऊन त्या बाईची चौकशी केली. मंदा मावशी तिच्या हातातील हार पाहून ओरडलीच,हाच माझा हार.पोलिस पाहताच त्या बाईची बोबडीच वळाली. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. लेडीज कॉनस्टेबलने लगेच तिला पकडले.
"माफ करा मला, अस ती बाई ओरडत होती.पण काही उपयोग झाला नाही.पोलिसांनी त्या बाईला पकडून नेलं.
सर्वजण नगरात आले, घडलेला प्रसंग अख्या नगराला समजला. सगळे मुलांच कौतुक करत होतें. मंदा मावशीने मुलांना चॉकलेट देऊन तोंड गोड केले.
पोलीसांकडून मुलांचा सत्कार झाला,पण एक गोष्ट त्यांना सांगितली. कोणतही जोखमीच काम करताना आधी मोठयाना सांगायचं त्यांचा सल्ला घेयचा . मुलं हो म्हणत जोरात ओरडली.
पुन्हा एकदा आटपाटनगरात आनंद पसरला. ती मुलं शूर म्हणून ओळखली जाऊ लागली . त्यामुळे त्यांच्या आईबाबांच्या माना गर्वाने ताठ झाल्या.
*********समाप्त ********
