अहंकार
अहंकार
आपल्यासारख्या सामान्य , प्रपंच करणाऱ्या लोकांचा जगण्यातला मुख्य अडथळा कोणता असेल तर तो अहंकार. अहंकारामुळे माणूस ना व्यवस्थित परमार्थ करू शकतो ना ही प्रपंच. अहंकार सारखी व्याधी नाही अहंकार अर्थातच गर्व. मानवी जन्मा मागचे दोन प्रमुख कारणे म्हणजे प्रारब्ध भोग भोगण्यासाठी जन्म आणि दुसरे म्हणजे त्याच चक्रात अडकणे. चांगले कर्म केले म्हणजे या हाताचे त्या हाताला कळू नये परंतु त्याचा ही सामान्य जीवाला अहंकार होतो. आणि ते जग जाहीर होते. अहंकाराच्या उलट नम्रता जन्म घेते . जेवढी अंगी नम्रता तेवढे अहंकार मुक्त जगणे.
आपण सामान्य जीव प्रपंचात अडकलेले असतो. त्यामुळे स्वत:च्या देहा विषयीचा अहंकारच जास्त असतो. मुळात देहा विषयीच अहंकार असेल तर प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टीविषयी अहंकार येतो. जिथे मी पणा आहे तिथे अहंकार आहे. हे माझे ते माझे, मी केले म्हणून, माझेच प्रयत्न ,माझ्यामुळेच झाले अशा कितीतरी गोष्टी मीपणा मध्ये येतात. अहंकार दूर झाला तरच सामान्य माणसाला परमार्थाची वाटचाल ही अव्याहत व निर्विघ्न करता येते. आणि संत लोक हीच गोष्ट साध्य करून घेतात. कारण ते प्रपंचामध्ये अडकलेले नसतात.कोणतेही कार्य केले तरी कर्तुत्व स्वतः कडे न घेता त्याचे श्रेय देते ईश्वराला देतात त्यामुळे त्यांना अहंकार होत नाही.
"निराभास निर्गुण ते आकळेना !! अहंतागुणे कल्पिता ही कळेना!!"
अर्थात तो निर्गुण निराकार परमेश्वर नुसती कल्पना करून कळत नाही तसेच अहंकार बाळगूनही कळत नाही. मी खूप धार्मिक आहे मी खूप देवाची सेवा करतो, म्हणून माझ्यावर देवाची पूर्ण कृपा आहे असे होत नाही. अहंकार दूर होण्यासाठी गुरु बोधच आवश्यक असतो.
"कर्मफलाते अर्पून मजला ,सोड अहंता वृथा" असे श्रीकृष्णही अर्जुनाला सांगतात. कर्म तर मला अर्पण करच पण त्यापासून मिळणारे फलही मला अर्पण कर. आणि स्वतः विषयीचा हा व्यर्थ अहंकार सोडून दे.
अहंकाराची वृत्ती असली की तोंडातून येणारे शब्दही उद्धट होतात. मग वाद होऊन संवादा ऐवजी विसंवाद सुरू होतो. त्यामुळे भांडणतंटा निर्माण होऊन पदरी फक्त दुःख येते. म्हणूनच अहंकार समूळ नाहीसा केला पाहीजे.याउलट वृत्ती विनम्रतेची असली की बोलणेही मृदू होते. संवाद घडून सुखसंवाद निर्माण होतो.
"जनी हित पंडित सांडीत गेले ,!!अहंतागुणे ब्रह्मराक्षस झाले !!"
काही लोक नुसतेच शब्द ज्ञानी असतात. अर्थ सांगून ते केवळ आपले ज्ञान दाखवतात. पण प्रत्यक्षात त्यांना अनुभव नसतो. त्यामुळे स्वतःचे हित न साधतात ते या जगातून निघून जातात. अशा शब्द ज्ञानी पंडितांना आपल्या विद्वत्तेचा अहंकार होतो. आपले ज्ञान ते दाखवत फिरत असतात. कधी प्रसंगी इतरांशी स्पर्धा , पैजाही मारतात. अहंकाराचा दर्प त्यांच्या बोलण्याला ,वागण्याला येत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा चांगदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःची विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुक्ताबाईने त्यांना कोरा पेपर पाठवून त्यांचे गर्वहरण केले. आणि चौघे भावंडे भिंतीवरून त्यांना भेटायला गेले.पण जे आत्मज्ञानी असतात अर्थातच अनुभवी असतात, ते स्वतःच्या ज्ञानाबद्दल कधीही वाच्यता करत नाहीत. "मला काहीच येत नाही" अशी विनम्रतेची त्यांची भाषा असते. ते सदैव ईश्वराच्या चरणी लीन होतात. ते आत्मज्ञानी लोक कसे असतात? त्याविषयी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात,
"जगात पिशाच्च, अंतरी शहाणा , सदा ब्रम्ही जाणा, निमग्न तो"
जगाच्या दृष्टीने तो पिशाच्च असला तरी स्वतःमध्ये मग्न होणारा तो शहाणा असतो. मी कर्ता नाहीतर ईश्वरच कर्ता आहे या भूमिकेतूनच त्यांचे कार्य सुरू असते. जे मला अनन्यभावाने शरण येतील त्यांचा योगक्षेमं मी चालवेन. योग म्हणजे परमार्थ आणि क्षेम म्हणजे प्रपंच. प्रपंचा सहित परमार्थ चालविण्याची हमी देवाने दिली आहे . फक्त त्याच श्रद्धेने प्रपंच आणि परमार्थ केला पाहिजे. म्हणजेच अहंकार सोडून आणि विनम्रता अंगी बाळगून.
