Neelima Deshpande

Action Inspirational

3  

Neelima Deshpande

Action Inspirational

आग्रा: गौरवगाथा व इतिहास !  ©

आग्रा: गौरवगाथा व इतिहास !  ©

4 mins
349


उत्तर प्रदेशातील मोठ्या शहरांमधील एक नाव अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे आग्रा ! आग्रा शहराचे नाव घेतले की सर्वात आधी डोळ्यासमोर उभा राहतो तो पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडात बांधलेला, अनेक वर्षे दिमाखात उभा असलेला ताजमहल! शाहजहानने अनेक देशांतून मागवलेल्या जडजवाहिऱ्याचा वापर करुन सजावट केलेला व मुमताजच्या आठवणीत बांधलेला ताजमहाल !

जगातल्या अनेक आश्चर्यांमध्ये आणि आणि कलाकुसर व आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून सर्वोत्कृष्ट व सुंदर समजला जाणारा ! खरंतर आपली कहाणी याच्या पुढची आहे. ज्याने हा सुंदर ताजमहाल बांधला त्या शहाजहानचा मुलगा औरंगजेब ह्याने त्याच्या वडिलांना कैदेत टाकून त्यांची सत्ता बळकावली होती. सत्तेवर आल्यानंतर त्याने मुघल साम्राज्याची राजधानी पुन्हा एकदा आग्र्याला आणली. ज्याने खुद्द स्वत:च्या वडिलांना धोका देऊन त्यांची सत्ता काबीज केली होती तो औरंगजेब इतर कुणाशी सरळ मार्गाने राहीला असता तर नवलच!

1666 मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना भेटीसाठी आग्र्याला बोलावले. त्यावेळी शिवाजीराजे, बाळराजे संभाजीला सोबत घेऊन गेले होते.12 मे 1666 रोजी, स्वत:च्या दरबारात औरंगजेबाने त्याच्या कनिष्ठ सरदारांच्या मागे महाराजांना उभे केले. औरंगजबाने दिलेल्या अशा अपमानास्पद वागणुकीमुळे राजे खवळले व त्यांनी त्याच क्षणी दरबार सोडण्याचा निर्णय घेतला.पण ती संधी न दवडता धुर्त औरंगजेबाने त्यांना त्वरित अटक करून कैदेत टाकले. संभाजीराजांसह महाराज तिथे तीन महिने कैदेत राहिले.

काही दिवसांनी स्वत:च्या सुटकेचा मार्ग शोधताना 'शक्ती पेक्षा युक्ती मोठी!' ह्या म्हणीला सार्थ करत शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचे नाटक करत लवकर बरे वाटावे म्हणून जनतेला त्यांच्या कडून मिठाई व फळे वाटावी यासाठी परवानगी घेतली.

सुरुवातीला कडक तपासणी करुन पाठवले जाणारे पेटारे नंतर ढिलाई देत कधीकधी न तपासताच पाठवले जावू लागले. त्याच संधिचा फायदा उचलत पुत्र संभाजीसह 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यात बसून बाहेर पडत कैदेतून सुटका करुन घेतली.


ही ऐतिहासिक घटना आपल्याला सर्वांनाच ठावूक आहे.तरी ती आज मला परत नमुद करावीशी वाटली कारण तो आपला अजरामर इतिहास आहे, ती एक शौर्यगाथा आहे.


आग्र्याहून सुटका हा महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग मानला जातो. पोटच्या लेकराला सोबत घेऊन गेलेल्या वडिलांना अचानक शत्रूने घात केल्यावर त्यांच्या काळजाचे काय झाले असेल हा विचारही आपल्याला आज करवत नाही.आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांदेखील आपली मुले,बाळे,घरातील सारे सुरक्षित असावेत असे वाटते. मग एक वडील म्हणून औरंगजेबाने धोक्याने कैद केले त्यादिवशी व नंतर तिथून सुटका होईपर्यंत महाराजांची काय अवस्था झाली असेल? याही पलिकडचा विचार म्हणजे आपल्या माघारी जनतेची काळजी घेत निर्माण केलेल्या स्वराज्याची धुरा ज्यांच्यावर भविष्यात सोपवली जाऊ शकते ते राजे संभाजी देखील त्यांच्या सोबत शत्रूच्या तावडीत अडकलेले होते.


पेटाऱ्यांमध्ये बसून सुटका करवून घेत यमुनेच्या तिरी महाराज पोहचले तरी पुढच्या प्रवासात मधेच रस्त्यात पकडले गेलो तर, याभितीने राजे काही निवडक माणसांसोबत वेश बदलून मजल दरमजल करीत गडावर सुरक्षित पोहचले.त्यांनी संभाजी राजांना वेगळ्या मार्गाने सुरक्षित ठेवत घरी पोहचवण्याची व्यवस्था केली होती. हा सगळा प्रवास पुर्ण होऊन बाप लेक सुरक्षित एकमेकांच्या समोर पोहचेपर्यंत त्या दोघांनाही स्वत:च्या आणि एकमेकांच्या सुरक्षित असण्याची किती काळजी वाटली असेल? ती जीवघेणी काळजी त्यांना रात्री नीट झोपू देत असेल का?असे अनेक विचार मनात आजही येतात जेव्हा आपल्या घरातले बाहेर गेलेले वेळेत पोहचत नाहीत कधी कधी!


थोड्या अवधीसाठी आपण घराबाहेर पडू शकलो नाही किंवा कधी जर मोकळेपणाने फिरायला जाता आले नाही तर आपण कंटाळतो, वैताग करून घेतो...मग आग्रा ते महाराष्ट्रात परत येण्याचा हा प्रवास संपे पर्यंत ते दोघेही जगापासून स्वत:ला लपवत,कोंडून घेत कसे राहिले असतील?कठीण काळात जे मिळेल ते खाऊन, आहे त्या परिस्थितीत मोठी माणसे समजूतदारपणे स्वत:ला बदलवतात,जुळवून घेतात...पण राजे संभाजी तर अगदीच लहान होते त्यावेळी! त्यांच्या बालमनाला त्यांनी स्वत: व महाराजांनी ह्या सगळ्यासाठी कसे तयार केले असेल?आपण घाबरलो की जवळच्या व्यक्तीला बिलगतो, त्यांच्या जवळ असण्याचा प्रयन्त करतो. मग एक वडील म्हणून संभाजी राजांना सोडून त्यांच्या बालमुठीतून स्वत:ची सुटका करून घेत, त्यांना सोडून जाताना त्या दोघांच्या मनात त्या क्षणाला काय विचार येवून गेले असतील?


हे असे अनेक निरुत्तर करणारे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहिले की शिवाजी महाराजांबद्दल व बाळराजे संभाजी यांच्याबद्दल मनात अपार आपुलकी, प्रचंड आदर, अमाप प्रेम, मनापासून गर्व जागतो. त्यांच्या तेजापुढे आग्रा शहराच्या सगळ्या इतर कथा-भुषणे यापेक्षा मग आपल्या मनात देशाभिमान, स्वराज्यप्रेम, त्या पितापुत्रानी केलेला त्याग, देशभक्ती, त्यांचे देशप्रेम, त्यांच्या सवंगड्यांची एकी, आपसात असलेला विश्वास, महाराजांचे चातुर्य, त्या सगळयांचे धाडस-साहस आठवून उर अभिमानाने भरून येतो.वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन योजना बनवण्याची व अंमलात आणण्याची शिवाजी महाराजांची हुशारी,त्यांची प्रखर बुद्धीमत्ता, सभोवताली बारकाईने लक्ष देऊन संधीचे सोने करण्याची हातोटी ह्या अनेक गोष्टींचा विचार केल्यावर शिवाजी महाराजांना सार्वभौम राजा, छ्त्रपती म्हणून का गौरविले गेले असेल याचा अंदाज सहज येतो. जागतिक इतिहासात ज्याने आपले स्थान निर्माण केले, आजही ज्यांची युद्धनिती सर्वश्रेष्ठ समजली जाऊन जगभरात शिकवली जाते त्या महाराजांच्या भूमित जन्मलो याचा खुप अभिमान वाटतो!


जय भवानी! जय शिवाजी!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action