Neelima Deshpande

Inspirational Others

3  

Neelima Deshpande

Inspirational Others

नभं उतरू आलं... ©®

नभं उतरू आलं... ©®

4 mins
187


हो...नभं उतरू आलं

चिंब थरथरलवं, अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात, हिरव्या बहरात....

"दिव्या येतेस का एकदाची आता घरात? किती वेळ अंगणात रमणार आहेस अजून? किती मोठ्याने गाणे म्हणत फेर धरतेस! एका लेकराची आई झालीस तू आता, विसरलीस का?" दिव्याची आई तिला एकीकडे आवाज देत होती आणि दुसरीकडे तिच्या सासूबाई दिव्याची ८ महिन्यांची लेक सांभाळत होत्या. दिव्या आत येताच, आईने तिचा अवतार पाहून विचारलं,

" दिव्या लेक थोडी मोठी झाल्यावर कर ग हे सगळं. अशी पावसात भिजण्याची कितीही आवड असली तरी ती अशा वेळी विसरता आली पाहिजे. बाईच्या जातीला काही गोष्टी विसरण्याची सवय लावावी लागते, जबाबदारी नीट सांभाळायची असेल तर ! निदान तुझ्या सासूबाई आणि मी घरात असताना तरी तू जबाबदारीने वाग."

"फार नाही ग, चार शिंतोडे आलेत माझ्या अंगावर... या उकाड्यात सतत घरात बसून कंटाळा आला होता. तुम्ही दोघी आहात घरी म्हणून आज बाहेर आले. नाहीतर इतके दिवस घरातच होते. बाहेर आभाळ आलेलं दिसलं म्हणून मस्त गिरक्या घेत होते तर लगेच किती आवाज दिलेस मला? शेवटी आले मी घरात. मी वाटल्यास फक्त तुझ्या समाधानासाठी कोरडे असले तरी केस पुसून घेते. मग तर झालं?"


लेकरू झाल्यापासून दिव्या खूप अडकून पडली होती. कोविडमुळे न ती माहेरी जाऊ शकली न सासरी! आणि त्यांच्यापैकी देखील कोणी येऊ शकले नाही. त्यामुळे आधी लेकरू आणि घरकाम आणि मग वर्क फ्रॉम होम घेऊन ऑफिसही सुरु झाले. नाही म्हणायला समीर होता मदतीला पण शेवटी ते दोघेही नुकतेच पालक झाले होते. पण एकमेकांना साथ देत त्यांनी सात आठ महिने कोणाच्याही मदतीशिवाय निभावून नेले होते. आठ दिवसांपूर्वी सासूबाई आणि आई दोघी तिच्या मदतीसाठी आणि नातीसोबत वेळ घालवता यावा म्हणून आल्या होत्या. सासूने कालच बाळाचे सगळे घरभर पसरलेले कपडे धुवून गच्चीत वाळत घातले होते आणि आईने गहू ऊन दाखवायला ठेवले होते! त्या दोघींना असे काम करताना पाहून दिव्याला वाईटही वाटत होते पण तिचे मन तिला आराम मिळाला यात जास्त खुश होत होते. स्वत:ची कामे इतके दिवस करत होतो तशी स्वत:च करायची असे ठरवून सुद्धा अधूनमधून आळशीपणा येत होता आणि ती ठरवलेले विसरत होती.


दिव्या घरात आली तरी, केस पुसताना गाणे गुणगुणतच होती...


"नभं उतरू आलं..."


आणि अचानक सासूने काहीतरी आठवण आली म्हणून तिला,


"दिव्या तू पटकन गच्चीवर जातेस का?" विचारलं तशी ती खुश होत आईला म्हणाली, "बघ तुझ्यापेक्षा याच माझे मन जास्त जाणतात. मला परत पाठवत आहेत! पण गच्चीवर कशाला? इथेच जाते ना अंगणात?" त्यावर तिच्या सासूला आणि आईला हसू आले आणि काळजी देखील वाटली. त्यांनी एका सुरातच तिला विचारले?


"बाहेर पाऊस सुरु होतोय म्हंटल्यावर जसे भिजणे आठवते तसे आणखी काही आठवते का तुला? की विसरलीस या पावसाच्या नादात?"


"दिव्या चांगलीच बुचकळ्यात पडली. आपण काहीतरी विसरतो आहोत हे लक्षात येऊनही आठवण्याचा प्रयत्न करून पाहण्याऐवजी बाहेर जाण्यासाठी लहान मुले उत्तरं देतात आणि वेळ मारुन नेतात तशी ती म्हणाली,


"आत्ताच शिकवलं ना आई तू की, काही गोष्टी विसरता आल्या पाहिजेत... आता मला काही आठवत नाहीए!"


तिच्या या उत्तरावर मात्र हिचे कसं होणार? ही चिंता आईच्या चेहऱ्यावर उमटली. तिला काही उमजावे म्हणून त्यांनी आणखी एक संधी दिली...


"काल मी आणि तुझ्या सासूबाई गच्चीवर कशाला गेलो होतो काही आठवते का? तुला संध्याकाळी बाळाचे सगळे कपडे आणि उन्हात टाकलेले धान्य खाली आण म्हणून आठवण दिली होती, पण तू आळस केला आणि सकाळी आणेल म्हणून काम राहून गेले. आम्ही आज सकाळी आणत होतो तेंव्हा देखील आणू दिले नाहीस! तेच ओले होत असेल आता. समीर पळत वर गेलेला आहे ते आणायला पण पाऊस वाढण्याआधी त्याच्या मदतीला म्हणून तुला गच्चीवर पाठवत होतो."


दाताखाली जीभ चावत आणि त्या दोघींना पाहून आपण आठ दिवस फारच निवांत होत स्वत:ला लागलेल्या चांगल्या सवयी या आळसापायी विसरलो हे तिने कबूल केले आणि समीरच्या मदतीला गेली.


आई आणि सासू या दोघी या सगळ्यातून एकेकाळी गेलेल्या होत्या. समीरच्या मदतीने आणि अनेकदा एकटीने दिव्या तिचे पहिले मातृत्व, सारे व्याप सांभाळून नीट पार पाडत होती. हक्काची माणसे सोबत आली की चार निवांत क्षण जगावेसे वाटतात. त्यातून प्रसंगी काही क्षणापुरता आलेला हा आळशीपणा आहे आणि तिचा मुळचा स्वभाव असा नाही हे जाणत असलेल्या दोघींनी त्यांना जमेल ती सारी तयारी करुन देत आणि घरात बाळ आल्यावर अनुरुप होतील असे बदल करत दिव्याला मोठा मानसिक आधार दिला. बाळ झाल्यावर नैसर्गिकरित्या एक प्रकारचे नैराश्य स्त्री अनुभवत असते. ते हार्मोनल बदलांमुळे आणि सभोवताली, झालेल्या अनेक बदलांना अचानक समोरे जावे लागते. यातून जसे येते तसेच जाते देखील! पण तो काळ जर जवळच्यांना समजून घेता आला तर खूप सुखद अनुभव आणि आठवणी देऊन जात एकमेकांशी असलेले नाते घट्ट करुन जातो. योग्यवेळी योग्यजागी राहून घरातल्या वडिलधाऱ्यांनी मदतीचा हात दिला तर, त्यांचे प्रेम, त्या नव्याने आई झालेल्या स्त्रीच्या मनात व हृदयात चिरकाल जागा देऊन जाईल हे निश्चित!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational