Neelima Deshpande

Inspirational

4  

Neelima Deshpande

Inspirational

आठवणी बाप्पाच्या !

आठवणी बाप्पाच्या !

3 mins
227


पोलीस कॉलोनीतले आमचे कौलारु घर दरवर्षी गणपतीच्या काळात दोन दिवस आधीच सजून धजून तयार असायचे. गणपती येणार म्हणजे प्रत्यक घरात एक वेगळा उत्साह आणि त्याला साथ देण्यासाठी शेजारच्या घरातलीही जय्यत तयारी आम्ही करू लागायची हे ठरलेले असायचे. नवीन लायटिंगच्या माळा, वेगळ्या पद्धतीने सजवलेली मखर आणि दरवेळी नव्या कल्पनांना वाव देत उभे केलेले देखावे! या सगळ्या सोबत आज आवर्जून आठवण झाली ती ऊदय आणि शफीकची! शफीक म्हणजे माझ्या आई वडिलांचा मानस पुत्र. तो माझ्या लहान भावाच्या उदयच्याच वयाचा! आमच्या घरा जवळच त्यांचे घर होते. माझ्यासोबत गणपती सजावटीसाठी हे दोघे दरवर्षी असत. कायम एका हाकेबरोबर मदत करायला हे तयार असायचे. उत्साहात आमची वानरसेना अनेक घरच्या गणपतीच्या सजावटीसाठी झटायची.

कार्डबोर्डच्या कट आऊटला कधी रंगवून तर कधी रंगीत कागदांनी चिकटवून वर आरसे, टिकल्या, वेलवेटच्या कागदाचे वेगळे आकार लावून देखावे आवडतील असे देखावे सजवायचो. सगळीकडे विकत आणलले सामान पुर्ण असेलच असे नसायचे. मग स्वत:च घरी आम्ही त्रिकोणी आकारात कागद कापून दोरा लावून बनवलेल्या पताका, वॉल पीस, काय काय नाही प्रयोग केले ते वापरून सजावट पुर्ण करुन द्यायचो. कधी रंगीत ओढण्या यांनी माझ्यासाठी ऊंच चढून छान सजवून बांधल्या तर कधी मोठे बॉक्स प्लेन रंगीत कागदाने सजवले. त्यात आहेत त्या खेळणीच्या आणि हाताने काढलेल्या चित्राच्या आधारे देखावे तयार केले होते. यात मोठी अडचण ही असायची की, देखावा, सजावट छान झाल्यावर जसे कौतुक व्हायचे तसे इतरांना अधिक चांगला करुन दिला देखावा ही त्या घरातल्या लहान पोरांची पोटदुखी देखील समोर यायची, पण मोठे सांभाळूंन घेत.

अनेक वर्षे आमच्या दोन्ही घरी गणपतीचे आगमन झाले आणि एकत्रितपणे मदत करत हा सण साजरा झाला आहे. शफीकला खूप हौस होती गणपती बसवण्याची आणि त्याच्या घरातल्या सगळ्यांनी देखील ती मोठ्या मनाने, आनंदाने स्वीकारली. मग आणखी काय हवे होते? एक वर्ष सगळी तयारी बघून आणि शिकून त्याने पुढच्याच वर्षी गणपती बसवायचा हे जाहीर केले आणि त्याप्रमाणे तो नेमाने न चुकता इतके वर्ष बसवला देखील.

कॉलनीत सगळे एकमेकांकडे आरती करायला जात. निदान मुले तर हमखास रोज जात असत. प्रत्येकाच घर भरून जाई. अगदी ठरवून सगळे एका पाठोपाठ एकमेकांच्या घरी जायचो आणि आरती म्हणायचो. तो आवाज आजही कानात घुमतोय असे वाटते आणि ते हसरे चेहरे डोळयासमोर येताहेत.

आज महाराष्ट्राबाहेर गणपतीचा सण साजरा करताना तो अनेक वर्षे कानात आणि मनात साठलेला लहानपणीचा "गणपती बाप्पा मोरया" चा जयजयकार खूप तीन माणसात सौम्य वाटतोय. घरात प्रसाद वाटताना पुढे आलेले हात आणखी वाढायला हवेत असे नेहमी वाटतं. आपण शेजारी प्रसाद वाटणे आणि प्रसाद मिळावा म्हणून हक्काने कोणी आरतीच्या वेळी हजर रहावे यातलं अंतर समजलय.आई, काकू जेंव्हा प्रसाद वाटत असत तेंव्हा कोणी लाजून हात पुढे करून घाई न करता शांतपणे उभे राही, तर कोणी गर्दीत आणखी एकदा हात पुढे करुन मिळालेल्या त्या खिरापतची पुन्हा आनंद लुटण्यासाठी धडपड करी.

हे कुठेतरी मागे सुटलेले आज परत परत आठवतं आहे. या गोष्टीचा आनंद कायम राहील की, मनातली भक्ती आणि या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मिळालेल्या सर्वधर्म समभावाच्या जिवंत अनुभवाने आमचे जीवन खरच समृद्ध झाले. आजही एक हांक दिल्याबरोबर शफीक अर्ध्या रात्री उदयच्या मदतीला धावून जातो आणि एकाला दोघे काळजी घेणारे एका शहरात आहेत याचा आम्हांला आनंद होतो.

गणपतीचे मोदक आणि ईदचा शीरखुर्मा एकाच गोडीने आणि भक्ती भावाने आमच्या दोन्ही घरांतील सदस्यांनी अनेक वर्षे ग्रहण केलाय यापेक्षा सार्वभौम भारत पहायला मी आणखी कुठे कशाला जावू?


* सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखिकेकडे राखीव आहेत.आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय खुप महत्वाचा, तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधे आपले मत जरूर कळवा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational