Neelima Deshpande

Tragedy Inspirational

2  

Neelima Deshpande

Tragedy Inspirational

येस बॉस...

येस बॉस...

7 mins
68


"वीणा, मला तू जरा आपल्या उपराष्ट्रपतींचे नाव सांग पाहू? माहिती आहे ना तुला?"


मोठ्या दिराच्या या खोचक प्रश्नावर स्वयंपाकघरात सकाळच्या घाईत कामे आटोपत असलेली वीणा गोंधळून जात पाहतच राहिली. थोड्या वेळापूर्वी निवांत पेपर वाचताना तिने त्यांना पाहिले होते त्यामूळे ते त्यातली काहीतरी मोठी बातमी वाचून आपल्याकडे आलेत आणि चौकशी करत आहे इथवर तिने अंदाज बांधलेला असला तरी तिला त्याक्षणी त्यांनी जे विचारले त्याचे उत्तर आठवत नव्हते म्हणून,


"नाही, म्हणजे नेमके नाव आता काही डोळ्यासमोर येत नाहीए दादा,पण मी सांगते पाच दहा मिनिटात आठवून! चालेल? काय झाले, काही बातमी आली आहे का त्यांच्याबद्दल?"


असे वीणानेच दादाला विचारले. वीणाच्या या उत्तरावर मोठ्या दिराला म्हणजे ज्यांना सगळे आदराने दादा म्हणायचे त्यांना संधी मिळाली आणि ती त्यांनी घेतलीही,


"यासाठीच म्हणतो पेपर वाचत जा.जगात काय चालले आहे याचा पत्ताच नसतो तूम्हाला कधी.ते काही नाही, आजपासून संपूर्ण पेपर वाचून झालाच पाहीजे. मी रोज त्यातून 'आज काय महत्वाची बातमी आली आहे?' हे सकाळीच विचारत जाईल तुला आणि सगळ्यांनाच!"


"येस बॉस! म्हणत सासू,जाऊबाई आणि वीणाचा नवरा समर यांनी दादापुढे मान हलवली आणि स्वत:चे आवरायला ते निघूनही गेले.. आजवर त्याघरात हेच होत आले होते. दादाचा शब्द कोणी खाली पडू देत नाही हे वीणा गेल्या दोन वर्षात लग्नं होवून आली तेंव्हापासून बघत आली होती. तिनेही कधी आजवर यावर विरोध केला नव्हता आणि तिचा काही आक्षेपही नव्हता पण आताशा तिच्यावर खुपच ताण पडत होता तरी ते सगळे ती घर आणि आपली माणसे आहेत म्हणून हसत हसत करीत होती. दिवसेंदिवस तिच्याकडून असलेल्या अपेक्षांच्या यादीत भर पडत गेली आणि त्या अपेक्षा हव्या तशा पुर्ण न झाल्यावर नाराजगी दर्शवली जात होती. इतके सगळे कमी होते का की त्यात आज हे पेपर वाचणे नवीन काम करायचे, तेही सकाळीच! रोज आपल्याला हे कसे शक्य होईल? याचा विचार करत वीणा गप्प उभी होती. दादाही तिथेच उभे राहून वीणाच्या होकाराची वाट पाहत होते.


"आणि तुझे काय वीणा? मी तुझ्याही 'हो' या उत्तरासाठी वाट पाहत इथे उभा आहे अजून! एक साधी गोष्ट सांगितली तर पटकन होकार द्यावा माणसाने..."


खूप काही बोलावे असे मनात येवूनही वीणाने एक मोठा जमेल तितका दीर्घ श्वास घेत स्वत:ला शांत केले आणि मुद्देसूद भाषेत उत्तर देत यावर तोडगा काढला...


"नक्कीच दादा. मलाही तुम्ही सगळे सकाळीच पेपर वाचता तसा पेपर वाचायला आवडले असते किंवा अजुनही मार्ग निघाला की नक्की जमवेल मी ते करणे. त्यासाठी मला खरतर तुमची मदत हवी आहे.


घरात जवळपास सगळेच नोकरीला जातात त्यामूळे प्रत्येकाला सकाळी घरातून जाण्याआधी पेपर वाचायची आणि स्वत:चे आवरण्याची घाई असते. तुमचा बिजनेस आहे त्यामूळे तुम्ही जरा निवांत असू शकता पण तरी तुमच्याही कडे फक्त स्वत:चा व्यायाम, तयार होणे आणि पेपर वाचणे इतकाच वेळ तुम्ही शिल्लक ठेवलेला असतो रोज.


ताईंना बाळ छोटे आहे म्हणून गेले दीड वर्षे आपण स्वयंपाकघरात पाऊल टाकू दिलेले नाही. त्यांनाही गरज लागणारे सगळे मी तुमच्या रुममधे अगदी हातात नेवून देते आणि तूम्हालाही प्रत्येकाला हातात चहाचा कप हवा असतो. तो चहाचा कप चहा पिऊन झाला की तुम्ही सारे सिंकमधे आणून ठेवायचेही कष्ट घेत नाहीत.जिथे चहा घेतला त्या जागेवर पडू देता जे मी नंतर शोधून गोळा करते आणि उचलून आणून वाळून गेलेले कप घासून साफ करते.


"देवाची पुजा करायला वेळ काढत नाही"


म्हणून बाबा रोज माझ्यावर नाराज होत मला ऐकवणार आणि त्यांना मदत करायला माझा वेळ गेला की दारात रांगोळी काढायला उशीर झाला म्हणून आई चिडणार,


"शेजारच्या दोन्ही घरांची रांगोळी आपल्या आधी काढली जाते रोज. मला नेहमी सगळ्यात पूढे राहण्याची हौस आहे पण ते तुझ्या राज्यात कधी होणार, ठावूक नाही!"


असे म्हणून त्या रुसून बसतात. ही काय स्पर्धा करायची गोष्ट आहे का? आणि जर असेल तर त्या घरातील कोण काय काम करते हेही आपण बघावे. कुणाला फुललेली बाग हवी तर कुणाला दारात आधी रांगोळी. कोणी चहा हातात दिला नाही म्हणून नाराज तर कुणाला सकाळी सगळं सोडून आधी देवपूजा महत्वाची वाटते आणि ती तुम्ही कोणी किंवा त्यांनी न करता मीच करणे गरजेचं वाटत. तसे नाही झाले की त्यांचे आणि तुमचे सर्वांचे मूड जातात व सगळेच बिनसते. माझी स्वत:ची नोकरी, मी हे आपले घरातले सगळे रूटीन आणि माझी चांगली किंवा खराब जशी तब्येत असेल तशी विसरुन जात निमुटपणे आजवर करत आले.


तुमच्या शब्दाला मान देत सगळे पेपर वाचायला "हो" म्हणून गेलेत ना मग तुम्हीच त्यांना उद्यापासून "काही स्वत:ची कामे स्वत: करायला लागा!" असे सांगून मला वेळ मिळेल असे काहीतरी करा.नाहीतर जेंव्हा तुम्ही सारे पेपर वाचाल तेंव्हा माझ्याजवळ किचनमधे बसून मोठ्याने वाचा म्हणजे माझ्या कानावर बातम्या पडतील आणि तिथल्या तिथे मी तयार केलेला चहा तूम्हा सर्वांना स्वत:ला घेता येईल."


कधी न बोलणारी वीणा त्यादिवशी अचानक बरेच काही बोलून गेली जे सत्य होते.काही न बोलता ज्याच्यासमोर सगळं घर "येस बॉस" म्हणून झुकत होतं तो दादा आज वीणाला म्हणाला,


"येस बॉस! मी आणि घरातील सगळेच आमची छोटी छोटी कामे तरी उद्यापासून स्वत:च करत जाऊ. हळूहळू आमचा सहभाग कसा वाढवता येईल हेही पाहूत. आपल्या प्रत्येकालाच सकाळी घाई असते तेंव्हा आम्ही सगळे मिळून बाळाला सांभाळत स्वत: तयार होणे शिकून घेतो म्हणजे तुम्ही दोघी जावा आणि आई स्वयंपाकघरात वेळ देवून लवकर मोकळ्या व्हाल. पेपर वाचणे ही दुय्यम गोष्ट असेल माझ्यासाठी सुद्धा!"


वीणाला हे ऐकून खुप छान वाटले. दादाचे आणि सगळ्यांनी तिला समजून घेतल्याबद्द्ल आभार मानत ती म्हणाली,


"प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मला राजकारण अजिबात आवडत नाही आणि सकाळी सकाळी पेपर घेवून बसणेही.सकाळचा वेळ आणि आपली एनर्जी जगभरातल्या वाईट, दुखा:च्या किंवा चिंतेच्या गोष्टी वाचून करावी हे मला पटत नाही. माझे काम मग ते घरातले असो वा ऑफीसचे ते अचूक करणे, वेळेवर करणे ही मी माझी पूजा समजते. मी नास्तिक नाही फक्त माझी धार्मिकता मी केवळ ह्या बाह्य कर्मकांडावर अवलंबून किंवा आधारीत न ठेवता हाताशी असलेल्या वेळेच्या आणि वेळी समोर असलेल्या गरजेनुसार निर्णय घेते. देवासमोर मला जेंव्हा निवांत मनाने बसता येते तेंव्हाच मी साग्रसंगीत पुजा करायला तयार होते. सुट्टीच्या दिवशी त्यातला आनंद, समाधान हे सगळेच मी अनुभवते पण रोज मनात अनेक चिंता आणि कामाची आखणी करत हाताने पुजा करावी असे कोणाला वाटत असेल तर मला ते अवघड जाईल. घरात लेकरु रडत ठेवून, सगळ्यांची घाई लक्षात न घेता तूम्हाला सगळ्यांना डबा देण्यासाठी स्वयंपाकाला न लागता आधी तासभर पेपर वाचणे आणि नंतर तासभर पुजा करून सगळ्यांना उपाशी ठेवणे मला पटणार नाही. अंगण सुने दिसायला नको, म्हणून दारापुढे छोटी रांगोळी काढून आणि अंघोळ झाली की न चुकता देवाला मनोभावे नमस्कार करुन मी माझ्या दिवसाची सुरुवात करते.मला ते पुरेसे वाटते. माझ्या जॉबसाठी मला ज्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे, त्याचे मी आजही पुढचे शिक्षण घेत आहे. त्याबाबतीत सगळी माहिती घेत मी स्वत:ला अपडेटेड ठेवते. या घरात सगळ्यात जास्त वाचन करणारी आणि विविध विषयांची माहिती ठेवणारी मी आहे.माझ्याकडे अनेक बाबींची माहिती असते फक्त मला राजकारण या विषयाचा तिटकारा आहे त्यामूळे जुजबी माहिती व्यतिरिक्त मी त्यात लक्ष घालत नाही किंवा अपडेट राहत नाही. रोज कोण निवडून आले आणि कोण काय आरोप करत आहे? कोणाची कामाची पद्धत कशी यावर कोण निवडून येईल या अशा विषयांवर चर्चा करण्याइतका फुकटचा वेळ माझ्या कडे नाही आणि कधी असला तरी मी तो देत नाही, देणार नाही कारण मला त्याची गरजच वाटत नाही. माझ्या दैनंदिन जगातल्या सगळ्या गोष्टी नीट करता याव्यात यासाठी जी माहिती हवी, ज्या बातम्या मला माहिती हव्यात फक्त त्यांचे अपडेट मी घेते. मध्यमवर्गीय किंवा सामान्य माणसाला राजकारणात लक्ष घालण्याचे चोचले परवडत नाहीत कारण हाच एक घटक आहे जो पूढे जाण्यासाठी सवलतींचा आधार न घेता झटत असतो.राजकारण करण्या इतका वेळ यांच्या कडे कधी असूच शकत नाही हे माझे मत असले तरी तुम्ही वयाने मोठे म्हणून आम्हाला जे काही करायला सांगाल ते आमच्या भल्यासाठी असेल असे समजून मी रोजच्या ठळक बातम्या माहिती करुन घ्यायला तयार आहे.


तुम्ही कोणी मोठ्याने बातमी वाचणार असाल तर त्या मी ऐकेन याला मी होकार देते पण त्या बातम्या फक्त देशाची किंवा कुणाची काही प्रगती झालेली असेल त्याविषयी, नव्या शोधा बद्द्ल किंवा सकारात्मक असतील तरच.नाहीतर मला अन्न शिजवताना किंवा खाताना कोणत्याच निगेटीव्ह गोष्टी ऐकायला आवडत नाहीत तेंव्हा ती काळजी सगळे घेवू शकणार नसाल तर माझ्या समोर बातम्या वाचू नका. मला जमेल तेंव्हा फक्त जगातल्या चांगल्या बातम्या मी वाचेन. कोणतीही बातमी ज्यावर मला माझा काही सहभाग देता येणार असेल किंवा स्वत:च्या नाहीतर कुणाच्या आयुष्यात चांगला बदल घडवून लावण्यात हातभार लावता येत असेल त्या गोष्टी जाणून घेण्यात मला जास्त रस असतो. केवळ चर्चा करण्यापेक्षा हातभार लावणे मला समंजसपणाचे वाटते. सामाजिक अलर्टसाठी असलेल्या बातम्या तशाही आपल्यापर्यंत येवून पोहचतातच मग त्यासाठी रोज सकाळी कामे सोडून पेपर घेवून बसणे मला जमणार नाही.


आणखी एक, देवपूजा असो वा बाग फुलवणे, रांगोळी आधी काढून अंगण सजवणे किंवा पेपर वाचून अपडेट ठेवणे ह्या तुमच्या ज्यांच्या ज्यांच्या आवडी आहेत त्यांचा त्यांना पुर्ण करताना पुढाकार यात जास्त असणे महत्वाचे आहे.लीडर बनून स्वत: ती जबाबदारी घेत इतरांना प्रेरीत करता यायला हवे आपल्याला, त्यात खरा आनंद असतो.नाहीतर स्वत:च्या आवडीच्या गोष्टीही इतरांनीच कराव्यात या अपेक्षेत आपण बसलो तर आपल्याला आनंद तेंव्हाच मिळेल जेंव्हा समोरची व्यक्ती ते काम करेल. छंद आणि आवड तरी इतरांच्या भरवशावर आपण पुर्ण करू नये असे मला वाटते. तसे आपण करत असूत तर एकदा आपल्या आवडीच्या गोष्टी खरेच आपल्याला आवडतात का याचा आपण पुनर्विचार करावा."


शांतपणे बोलून मुद्देसूद विचार करुन केलेले भाष्य ऐकून त्या घरातील बॉसची व्याख्या बदलली गेली.बॉससारखी केवळ हुकूमशाही न करता लीडरसारखे उदाहरण बनून स्वत: त्या कामाचा भाग होणे महत्वाचे असते हे सर्वांना पटले. या तत्वावर घरातला आनंद व ऐक्य टिकवणारे निर्णय त्यांनतर नेहमीच त्या घरात घेतले गेले. आता आपणही असाच विचार करून हवे ते बदल आपल्या घरात करण्याची आपली जबाबदारी पार पाडूत...हो ना?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy