वसुंधरा
वसुंधरा
सरसर पडती पाऊस धारा, हिरवळ ह्या झाडांची दाटली चोहीकडे
हिरवे गार थेंब ही पानांवरती ओथंबले
सरसर थेंब पडता झुलती सारी पानफुले...
विविध रंगाचा श्रृंगार करून वसुंधरा आज बहरली
विलक्षण आनंद होई मना बघूनी
हिरवेगार गालीचे मखमली घनघोर या वृक्षवेली
सौंदर्य वसुंधरेचे रंगाची उधळण करणारी फुले अन् पाने
पशु पक्षी ही गाऊन गाणी हळूवार चोचीत टिपती दाणे
सर्व विश्वाची भूक शमवणारी
माता ही अन्नदात्या शेतकऱ्याची
हिरे रत्नाची खाण
झरा ही सृष्टी सौंदर्याची
प्राण अर्पण करावे जिच्या रक्षणासाठी
मातृभूमी ही त्या शूर वीर सैनिकांची
विशाल सागर, सरिता, जन्मदात्री ही डोंगर दर्यांची
अन्न-वस्त्र-निवारा तुझ्यामुळे जलधारा
ओल्याचिंब जलधारांनी गंधीत होते तुझी माती
सुकोमल असे फुले उमलती विविध रंगानी तुला सजवती
अगणित असे उपकार तुझे माते मानव जातीवरती
साऱ्या विश्वाचा पेलून भार ओझ्याखाली जाते दबून
मुके अश्रू ढाळीत बसते पर्यावरणाचा तू ऱ्हास बघून
वसती तुझ्यामध्ये पंचमहाभूते सृजनतेचे असे वरदान
सजीव असो वा निर्जीव तुझ्याविण अस्तित्वहीन
वाढते आहे प्रदूषण पण मानवाला नाही याची अजून जाण
वैश्विक तापमान वाढ होईल वसुंधरेचा होईल विनाश म्हणून माणसा आता तरी जागा हो
लाव एक तरी झाड ठेवून वसुंधरेचा तू मान...
