व्रण
व्रण
सगळेच दिसत असतात वरवर शांत
पण ज्वालामुखी खदखदत असतो आत मध्ये
अनेक भळभळणार्या जखमा घेऊन
कधीतरी तो ज्वालामुखी फुटण्याची वाट बघत
अंतरातल्या वेदने बरोबर जगण्याची सवय घेऊन
कधी कधी ही सवय 'सहज' होऊन जाते
मग त्या जखमा सुद्धा जुन्या होऊन जातात
कधीच न भरता येणाऱ्या.
काहींना जमतं ते व्यक्त होणं
मनावर उमटलेल्या व्रणांवर फुंकर घालणं
अवघड असतं ते,
पण अव्यक्त राहून कुढण्यापेक्षा नक्कीच सोपं असतं
स्वतःच्या मनाचा विचार नेहमीच करावा
मळभ दाटून आल्यावर
आभाळ झाकोळल्यावर
मोकळे होऊन जावे,
पुढचे वादळ झेलायला
नेहमीच तयार असावे
