वृक्षलता
वृक्षलता
असतील हीने पाहिली कितीतरी उन्हे
उन्हाचे चटके तसेच पौर्णिमेचे चांदणे,
चटक्यात उन्हाच्या भाजत असतील अंग
तर कधी शीतदवाने..
केले असतील गोड स्वप्न भंग,
श्रावणात निसर्गाने नेसविला असेल हिरवा शालू
आनंदाने तेव्हा ही धुत असेल रोज अंग,
म्हणुनच तेव्हा ही दिसायची खुलून
जशी चंचल नववधूच...
पण अरे ! हे काय आता झालंय तिला ?
द्रोपदीला विवस्त्र केल्यागत ही भग्न का?
श्रावणात नेसलेला शालू कुठे आहे?
वाटतं उन्हाळ्याने हिरावला असावा,
बघवला नसेल त्याला, आनंद तो तिचा
तरीही चेहरा तिचा मात्र,जराही सुखला नाही,
अजूनही ती वाऱ्याला प्रतिसाद देतच आहे
अजूनही तीला श्रावणाची आस आहे
खरं तर,थकलेल्यांना सावली द्यायची कास आहे,
हीच इच्छा जगण्याची, हाच तिचा ध्यास आहे.
खूपच कष्ट करतेय ती सहन..
नाही तरीही वेदनेचा हुंकार
नाही त्यागाची व्यर्थ ललकार,
सांगतही नाही दुःख कुणाला
कुणाला? आहे हाच तिचा प्रश्न,
'त्याला'..ज्याने स्वार्थासाठी स्वत:च्या
छाटले जिचे अंग प्रत्यंग,
सुंदर काया जीची,केली ज्याने भंग,
उपदेश करत बसण्यापेक्षा जीने
दुनियेसाठी स्वत: आदर्श होऊन बसणे पसंत केलं..
अशी ही वृक्षलता !
