वधूपरिक्षा
वधूपरिक्षा
मला बघायला आले वीस पंचवीस जण,
समजेचना त्यांच्या पैकी नवरा मुलगा कोण ?
या या बसा म्हणत स्वागत त्यांचे केले,
सर्व मंडळी हाॅलमध्ये विराजमान झाले,
इकडच्या, तिकडच्या झाल्या गप्पागोष्टी सुरू,
दोस्त मात्र नवर्या मुलाची मस्करी लागले करू,
"मुलीला पाठवा" बाबांचा आदेश असा आला,
"घाबरू नकोस मुली" आईने सल्ला दिला,
एवढ्या घोळक्यात मध्यभागी बसवले मला,
विचारले "काय काय येते, सांग पोरी तुला",
पहिल्याच प्रश्नाने माझी, बोबडी अशी वळली,
वधू परीक्षा कशी असते ती या क्षणी कळली,
भेदरलेल्या सशावानी झाली माझी गत,
बाबा म्हणे "उत्तर दे" नाहीतर जाईल पत
चहा पोह्यावर पाहुण्यांनी असा मारला ताव,
खात खात विचारले त्यांनी "काय तुझे नाव ?"
चोरट्या नजरेने मी जेव्हा वर पाहिले,
पाहताक्षणी एकदम माझे होशच उडून गेले,
प्रश्न विचारणारा होता माझा म्हातारा बाॅस,
हसत हसत खुलून म्हणाला, जोडी जमेल खास,
म्हणे "काय काय आवडते" सांग मुली तुला,
मी म्हणाले "वधू परीक्षा" सोडून सर्व आवडे मला,
"घाबरू नको प्रतिभा अग आहे तूच खास,
वधू परीक्षा होता बहाणा त्यात झालीस तू पास.
