वात्सल्यमूर्ती
वात्सल्यमूर्ती
एका वनात विहरत होती
आपल्या पाडसासमवेत ती हरिणी
लुसलुशीत गवताची पाती
खाण्यात लक्ष होते, स्वच्छंदी, हिरकणी
तरीही होती सतर्क ती , घेत चाहूल भोवतालीची
कावरी बावरी नजर तिची
कसलीशी चाहूल जाणवे तिला
काळीज धस्स झाले, सावली ती भीतीची
घाबरा घुबरा झाला जीव
काळजाचे झाले पाणी पाणी
दोन चित्ते रोखुनी पाहत होते त्यांच्याकडे
एका क्षणात गलितगात्र झाली हरिणी
धाव देवा धाव आता
आर्त धावा केला तिने
मनात एक निर्धार करुनी
लागले पळावया गतीने
पाडसे तिची छोटी छोटी
वेग ना सापडे तयांस
आर्त धावा सतत करी ती
धाव देवा धाव आता, सोबत घेऊन त्यांस
बेभान झाली सैरावैरा, काहीच काय सुचेना
धडधडू लागे आई चे काळीज , भीतीने ती थथरली
पिल्लांना वाचवं आता, जीवदान दे देवा आता
पिल्लांना मागे सारून वेगाने ती पळू लागली
दोन चित्ते वेगाने पाठलाग तिचा करिती
वेगाने घेऊन गेली ती त्या यमांना आपल्या सोबती
नजर मात्र तिची तिच्या पिल्लांवर होती
पिल्लांसाठी जिवाच्या आकांताने ती पळत होती
आता ना कोणता देव येणार, ना कोणता देवदूत
जाणीव होताच अधिक ती वेगावली,
एक क्षणभर श्वास रोखुनी जागीच मग उभी ठाकली
डोळे भरून एकदा बाळे माझी पाहू दे, मनोमनी हेलावली
जणू गंगा यमुनेचा बांध फुटला
प्रेम त्यांचे डोळ्यात साठवू दे माझ्या
नजरेत तिच्या माया, ममता, करुणा
वाचवं देवा आता सुरक्षित ठेव पिल्लांना माझ्या
निर्धार आता केलाय मी ही तुमचा घास व्हायला
यम ही क्षणभर थांबला स्तंभित होऊन पाहुनी तिला
घ्या पशूनो घ्या माझ्या नरडीचा घोट घ्या आता
यमानेही केले वंदन आईच्या वात्सल्य मूर्तीला
शेवटचा हा निरोप घेते साश्रू भरल्या नयनांनी
मनोमनी निश्चिंत झाली, माझी पिल्ले सुखरूप झाली
राहिली निपचित आता, मृत्युला ही सिध्द मी
दोन यमदूत चित्त्यांपुढे ती निर्धाराने उभी ठाकली
निःशब्द मी, निश्चल मी, काय बोलावे, अबोल मी
मुले जेव्हा म्हणती, काय केले सांग मजसाठी तू आई
जगी न असा वीर निपजे जो आईचे पांग फेडी
काय सांगावे त्या मातेने ,धनवान ही मातेविना भिकारी होई
काय सांगावे आईच्या हृदयात सामावले काय असे ?
या जगात तिच्यासारखी त्यागमुर्ती दुसरी न मिळती
प्रणाम त्या मातेला , कोटी कोटी प्रणाम कर जोडोनी
काय सांगावी आईची महती शब्द अपुरे तिच्यापुढती
