वास्तवातील बालपण.
वास्तवातील बालपण.
गावाकडची पोर आम्ही
मातीमध्ये लोळली .
विटीदांडू , लिंगुरच्या
खेळता खेळता मात्र
पायांची बोटं सुद्धा फोडली ....
बापरे....! रक्त येतय म्हणून
हार कधी ना मानली .
डाव पूर्ण करायचाय म्हणून
पुन्हा तीच माती बोटांवर सोडली ...
गमती, जमतीचे खेळ सारे
कधी लंगडी तर कधी आराधरी .
धावत सुटायचो मोकाट्यान
हाती मात्र आमच्या टायरची गाडी....
धडपडायचो , पडायचो
तरी पुन्हा उठायचो .
ह्या कमकुवत शरीराला मात्र
धडधाकट बनवायचो ....
कवड्या , गोट्यांचा डाव मात्र
अंगणात रंगायचा.
गल करून करून पडलेल्या खड्यांतून
पाय मात्र जपून टाकावा लागायचा ....
लपाछपीचा खेळ आमचा
तासोंन तास रंगायचा .
एक एकाला शोधत मात्र
सारा गाव हुंदडायचा...
गल्ली गल्लीत मांडलेले डाव
अख्खा गाव पोरांनी भरलेला असायचा .
आता ओसाड पडल्या त्या गल्ल्या
तेव्हा तुडुंब भरलेल्या असायच्या ....
शेवटची पिढी ठरतोय आपण
ज्यांनी मनसोक्त अनुभवल .
वास्तवातील बालपण
आता एकच प्रश्न येतोय मनी
पुढच्या पिढीच काय पण ..?