वारकरी
वारकरी
दिंडी चालली चालली
चालली पायी डौलत,
टाळ,मृदंग साथीला
साथीला घेऊन नौबत.
बुक्का कपाळी लावून
लावून भाळी चंदन,
नाम विठ्ठलाचे मुखी
मुखी अमृत शिंपून.
भेटगाठ माऊलीची
माऊलीची सेवा करू,
जीवनात समाधान
समाधान मनी स्मरू.
माऊली,माऊली नाद
नाद एकमुखी असा ,
वारकरी भक्त थोर
थोर भक्तीचा वारसा.
दिव्य सोहळा गजर
गजर नामाचा जागर,
विठूराया चरणास
चरणास भक्तीघर.