वारी
वारी
मुखी तुझे गोड नाम
ध्यास तुझा लागला
भेट घेण्या सावळ्याची
वारकरी चालला...
जय जय विठ्ठल
जय हरी विठ्ठल!धृ!
जन्मोजन्मीची पुण्याई
आज बहु फळांसी आली
पूर्वसंचिता कारणे
वारी पंढरीची घडली
टाळ मृदुंगाचा नाद
गगनासी असा हो भिडला
भेट घेण्या....!१!
साऱ्या तीर्थांचे आगर
असे वसिले पंढरपूर
भूलोकींचे वैकुंठ
असे निर्मळ, सुंदर
पंढरीची पावन माती
भाळीचा अबीर शोभला
भेट घेण्या....!२!
सावळी ती सुंदर मूर्ती
दोन्ही कर कटेवरती
सूर्याची प्रभा झळकती
प्रसन्न त्या वदनावरती
दर्शने शीण सारा
क्षणमात्रे दूर झाला
भेट घेण्या....!३!
साऱ्या विश्वाची माऊली
प्रेम पान्हा पाजू घाली
त्याच्या दर्शने नेत्रांची
काहिली ही शांत झाली
आर्तपणे साद देता
जगजेठी उभा ठाकला
भेट घेण्या....!४!
पाश मायेचे तोडीले
सारे गण, गोत्र सोडिले
सारी झुगारून बंधने
विठूशी हे नाते जोडीले
षड्रीपूचा करुनी काकडा
ओवाळले विठूरायाला
भेट घेण्या....!५!
आता नको येणे-जाणे
जन्म-मरण पुन्हा भोगणे
तुझ्या पायिशी मागणे
नामस्मरण अखंड घडणे
तुझे नाम घेता घेता
जीव माझा असा रंगला
भेट घेण्या....!६!
