पावसाचा ओरखडा...
पावसाचा ओरखडा...
काळ्या आईच्या गर्भावर पावसाचा ओरखडा
नख लावूनी खुडला काळजाचा की तुकडा
बळीराजा पांढरीत रातंदिस राबियला
त्याच्या घामाचं ना मोल जीव मातीमोल झाला
काळ्या आईनं कुशीत पोशियला कोंब कोंब
बेईमान पावसानं वाहूनिया नेला लांब
बघा मायलेकरांची कशी ताटातूट केली
गर्द हिरव्या गर्तीनीची आज कूस सुनी झाली
घामाचं पाजून पाणी शिवार फुलविला
निर्दयी पावसानं बांध सारा नासविला
इपरित कसं झालं जीव लागं झुरणीला
डोळ्यादेखत पाहिलं देवा माझ्या मरणाला...
