तू पाऊस बनून ये..
तू पाऊस बनून ये..
प्रेम अधुरं रहात नसतं
असं तू म्हणाली होतीस
कवितेच्या ओळी अधुऱ्या
रहातील कदाचित....
पूर्ण करण्या ओळींना त्या
तू शब्द बनून ये...
स्वप्नात कायम भेटत असतेस
खरोखरची कधी भेटणार आहेस
स्वप्न खरी होतात का...?
प्रश्नाच्या या उत्तरादाखल
पूर्ण करण्या स्वप्नांना त्या
तू अस्तित्व बनून ये...
कसं सांगू तुला मी
कधीतरी डोळ्यात माझ्याही
ढग दाटून येतात वियोगाचे..
आता बरसायचं आहे खूप
तुझ्या प्रेमात तुझ्यावरच
बरसून जाण्या डोळ्यांना त्या
तू पाऊस बनून ये...

