तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं
तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं
शरीरकांती तेज देह माझा,
हळद मात्र तुझ्याच नावाची,
तळहात नितळ माझे,
मेहंदी मात्र तुझ्याच नावाची,
डोक्यावरचा पदरही माझा
तुझ्याच नावाचा अन्
तुझ्याच नावाचं कुंकू भांगात माझ्या
सरळसोट सुंदर मान माझी,
मंगळसूत्र मात्र तुझ्याच नावाचं,
हात लांबसडक माझे,
हिरवाकंच चुडा मात्र तुझ्याच नावाचा,
पाय माझे मीच लक्ष्मी, अन्
जोडवी पैंजण तुझ्याच नावाचं
थोरामोठ्यांचा आशीर्वादही
मीच वाकून झुकून घ्यायचा, अन्
बदल्यात सदा सौभाग्यवतीचं
वरदान मात्र तुझ्याच नावाचं,
वटपौर्णिमेच्या व्रताला उपवास माझा,
अन् सात जन्म नात्याचं वरदान तुझ्याच नावाचं,
नऊ महिने उदर माझं,
मासाच्या गोळ्यात रक्त माझं,
त्याच्या पोषणालाही दूध माझं,
तरी लेकरूही माझं तुझ्याच नावाचं,
घराच्या आपल्या दरवाज्याच्या
पाटीवरही नावं तुझंच,
सप्तपदी सात फेऱ्यांची माझी,
अन् नावापुढं माझ्या गोत्र तुझं,
सर्वकाही तुझंच आहे,
विनम्रतेसह मला एकच कोडं आहे
की तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं...
