ती
ती
ती माणूस म्हणून जगू म्हणते;
तुला काय दिक्कत आहे?
थोडं आकाशात उडू पाहते;
तुला काय दिक्कत आहे?
केवढं विस्तीर्ण आकाश हे..!
अस असताना सारं...
कशाला ओढायचे पाय एकमेकांचे?
कशाला छाटायचे पंख, आनंदी मनाचे ?
अगदी पंखांना तिच्या बळ दे,
असं मी नाही म्हणत,
अगदी हात पकडून सारे शिकव
असंही, मी म्हणत नाही.
काहीच नको तिला, तुझ्याकडून
बस... थोडी उसंत दे !
तिच्या वाटणीचा तिला,
जरा...मोकळा श्वास दे .
स्वातंत्र्याची मक्तेदारी;
तुझ्या एकट्याची नाहीच रे .
तुला तसं वाटत असेल ,तर ;
केवढा मोठा अज्ञान हे!
दूर सार डोळ्यांवरची झापडं,
संस्कृती अन परंपरेने जी बांधली.
माणूस म्हणून जगण्याची मजा,
जरा तिलाही घेऊ दे..!
