ती व तिचा पाऊस
ती व तिचा पाऊस


नवरा कामावर गेलेला
ती नुकतच न्हाऊन
देवपूजा करुन
खिडकीत बसलेली
हाच अर्धा एक तास
तिचा निवांत असा
इतक्यात तो आला
अवचित न कळवता
सर सर सर सर सर
टप्पोरे थेंबमोती
अंगणात पडू लागले
तिचे डोळे सुखावले
बघता बघता
अंगणात तळं झालं
एकटक पाहात होती
पाण्याचे बुडबुडे
काय मनात आलं
कुणास ठाऊक
सरकन अंगणात गेली
हातांवर थेंबमोती झेलू लागली
पाऊस तिच्या गालांवर ओघळला
ओठांवर स्थिरावला
तिने तोंडाचा आ केला अन्
त्या अमृतधारांचं रसपान केलं
तिची गात्रं न् गात्रं शहारली
ओलेते केस, ओलेते अंग
पातळशी साडी अंगाला बिलगली
केसांच्या बटा मोत्यांनी लगडल्या
चाळीशीतली ती
वय ठेवलं अडकवून पागोळीला
रिमझिम धारांसोबत तिची पावलं
थिरकू लागली
ती बेभान होऊन नाचू लागली
आत्ता तिथे कोणीच नव्हतं
होते फक्त ती आणि तिचा पाऊस
तिचा पाऊस...