मी व माझा वारा
मी व माझा वारा
वारा असा सोकावला
सुर्रकन माझ्या मनात शिरला
मनात होतं आठवांचं पुस्तक
न विचारताच वाचू लागला
पहिल्या पानांवर होतं बालपण
अवखळ, अल्लड गोड आठवण
आईची माया, बाबांची पप्पी
भावंडांशी दंगा, सख्यांशी दोस्ती
जरा थांबेल तर वारा कसला
तिथून अलगद पुढे सटकला
कौमार्यावस्थेतल्या पानावर पोहोचला
फारच अगोचर मुजोर कुठचा
तिथे होती साधीभोळी फुलराणी
हरिततृणांवर डोलत होती
माझीच मी ती जपलेली
वाऱ्याने कौतुकाने न्याहाळली
तेथून तो पुढे सटकला
क्षणात माझ्या तारुण्यात शिरला
तेथे होते काही
ठसे
व्यक्तअव्यक्त प्रीतीचे
वाऱ्याने ते सहजच वाचले
मी जमिनीवर अंगठ्याने खरडले
तिथूनही तो सर्रकन सुटला
पुढची पानं पलटू लागला
म्हटलं त्याला कसली घाई
जरा धीर आहे की नाही
ऐकतो तो वारा कसला
चाळीशीचं पान ओलांडून गेला
इथे मी होती मोकळीढाकळी
माझी मला गवसलेली
वाऱ्याने मला कौतुकाने न्याहाळलं
पाठीवर मायेने हळुवार थोपटलं
म्हणाला मला अशीच राहा
हसतखेळत मजेत राहा
येतो गं पुन्हा मला म्हणाला
क्षणात आला तसा निघून गेला
आठवांचं पुस्तक चाळून गेला
वडिलकीने आशिष देऊन गेला