स्त्रीत्व हाच गुन्हा?
स्त्रीत्व हाच गुन्हा?
काव्यप्रकार अष्टाक्षरी
शीर्षक स्त्रीत्वं हाच गुन्हा ?
अनंतशा कालौघात
तिचं दुःख वहातंय
कधी थोडं सुकतंय
कधी भळभळतंय (1)
नाही सुरक्षित कन्या
नाही सुरक्षित नारी
जो तो उपभोग्य मानी
सदा नि कदा माजोरी (२)
गुंड मवाली रोमिओ
एकतर्फी प्रेम करी
प्रतिसाद नाकारता
आम्ल फेके तोंडावरी (३)
लग्न ठरतानाही हो
मला दुय्यमच स्थान
भाराभार खर्चामुळे
वडीलांची मोडे मान (४)
पैसे , फ्लॅट , सोनंनाणं
अरेरावी मागणीची
काय करावं उमजेना
मनी धास्ती अखंडचि (५)
मिळवती असूनही
हुकमत तिच्यावर
काही विरुद्ध बोलता
हात टाकी अंगावर (६)
माझं स्त्रीत्वं हाच गुन्हा ?
कधी खरी समानता ?
मनी विचारांचा गुंता
कुणी उत्तर सांगता ? (७)
