स्त्री -शक्ती
स्त्री -शक्ती
नवनिर्मितीचा सोहळा
करू हिचा साजरा गं,
नवजीवाची चाहूल
हिचे डोहाळे पुरवा गं....
दिवस जाता बाई किती
जीव खालीवर होई,
जीवघेण्या त्रासातही
सुख मानिते आई....
एका जीवाचे आता
दोन झाले गं सयांनो,
मन क्षणोक्षणी चलबिचल
चटपटीत द्या बायांनो....
आंबट चिंचाचे डोहाळे
दही धपाटे पुरवा गं,
पोटामधला जीव
आईमाध्यमाने जगवा गं..
मासामागून मास सरतील
सातव्याचा करा थाट गं,
स्वागत आईपणाचे करूनी
दावू आनंदाची वाट गं.....
आज डोहाळे जेवण
करा आरास रंगीबेरंगी,
पाना,फुलांचे तोरण
सजवा मंडप चौरंगी....
आईपणाच्या साऱ्या खुणा
चेहरा उजळून कांती,
कशी गोड ,गोड लाजते
बाळा घेऊन संगती.....
छान फुलांच्या झुल्यावर
बसवा अदृश्य गं तान्हा,
हाती बाण देऊन मग
चंद्रकोर ही आणा.....
हिरवा शालू अन् बांगडीही
मांगल्याचं लेणं ऐका,
दृष्ट लागण्या रूप खुललं
मिरच्या उतरून टाका.....
फळांचा मेवा देऊनी
बाळ सुदृढ करण्या ,
मुलगा-मुलगी असो काही
जन्म निरोगी होण्या.....
डोहाळे जेवणाचा थाट
पुनर्जन्माचा कवडसा,
आईपणाचं मातृत्व
प्रारब्धाचा हा वारसा...
